शिओमी या चिनी कंपनीने अगदी कमी काळात भारतीय बाजारात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. शिओमीच्या एमआय नोट ४ च्या प्रचंड यशानंतर या महिन्यात शिओमी आपला आणखी एक फोन लाँच करणार असल्याची चर्चा मागील कित्येक दिवसांपासून सुरु आहे. मात्र सध्या कोणताही फोन लाँच होण्याआधीच त्याची फिचर्स लिक होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे बहुप्रतिक्षीत शिओमी रेडमी नोट ५ फोनची फिचर्स लीक झाली आहेत. सोशल मीडियावर त्याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे.

या फोनला ४ हजार मिलीअॅम्पियरची बॅटरी देण्यात आली असून त्यात ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यातला एक कॅमेरा १६ मेगापिक्सेल आणि दुसरा ५ मेगापिक्सेल असण्याची शक्यता आहे. या फोनचा डिस्प्ले ५.९९ इंचांचा असेल. ३ जीबी रॅमचा ३२ जीबी मेमरी असलेला आणि ४ जीबी रॅमचा ६४ जीबी मेमरी असलेले असे दोन क्षमतांचे फोन उपलब्ध आहेत. याशिवाय १२८ एक्स्पांडेबल मेमरी असेल असेही सांगण्यात आले आहे. काळा, रोज गोल्ड, निळा, लाल, ग्रे आणि सिल्व्हर या रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे.

शिओमीचा नोट ४ ग्राहकांत खूपच लोकप्रिय झाला. स्वस्त, मजबूत आणि टिकाऊ या ग्राहकांच्या तिन्ही गरजांची पूर्तता या फोनने केली. विशेष म्हणजे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात स्मार्टफोन उपलब्ध असल्याने एमआयच्या खपात बरीच वाढ झाली. चीनमध्ये सर्वाधिक विक्रीचा टप्पा गाठल्यानंतर शिओमी भारतीय बाजारपेठेत सॅमसंगलाही टक्कर देताना दिसत आहे. याप्रमाणेच शिओमीचा रेडमी नोट ५ लाही प्रतिसाद मिळेल अशी चर्चा आहे