शरीरातील पेशींचे कार्य सुलभ नसेल तर काही समस्यांना सामोरे जावे लागते. असा त्रास टाळण्यासाठी वेळीच पेशींची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले तर? आता हे कसे करायचे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर अतिशय सोपे आहे. मृदंगासन हा यावरील उत्तम उपाय आहे. हे दंडस्थितीतील आसन आहे. या आसनाला काही जण मुद्रा मानतात. हटयोगात मृदंगबंध म्हणून त्याचे वर्णन आहे. पण त्याचा आणि या आसनाचा तसा संबंध नाही. प्राचीन ग्रंथात तशी नोंदही आहे.

मृदंगासन करायला अतिशय सोपे आहे. डावा पाय उजव्या पायापासून साधारण एक ते दीड फुट अंतरावर ठेवावा. मग दोन्ही पायांचे तळवे विरूद्ध बाजूने बाहेर काढून एका सरळरेषेत ठेवावे. या अवस्थेत पायाच्या दोन्ही टाचा एका रेषेत आणि चवडे मात्र विरूद्ध दिशेत हवेत. दोन्ही गुडघ्यामध्ये थोडेसे वाकावे आणि किंचित बसल्यासारखी स्थिती घ्यावी. दोन्ही हात कमरेपासून किंचित लांब नेऊन पुढे काढून हाताचे पंजे जणू काही मृदंग वाजवत आहे अशा स्थितीत घ्यावेत. या आसनामध्ये तोल सांभाळणे गरजेचे आहे. सुरुवातीला आसन पंधरा सेकंदापर्यंत टिकवता येते, पण अधिक सरावाने हे आसन दोन मिनिटांपर्यंतही टिकवता येते.

गुडघे, पोटऱ्या आणि मांडीच्या स्नायुंवर ताण आल्यामुळे त्यांचे कार्य सुधारते. सांध्यावर एकाचवेळी ताण आणि पीळ येतो त्यामुळे सांधेदुखी कमी होते तसेच मलसंचय कमी होतो. या आसनाने स्नायूंचा रक्तपुरवठा वाढतो आणि शरीरातील सर्वच पेशी अधिक कार्यक्षमतेने काम करू लागतात. आसन सोडताना प्रथम हात खाली घ्यावेत मग गुडघ्यात सरळ व्हावे, मग चवडे समोरच्या दिशेने नेऊन डावा पाय उजव्या पायाच्या जवळ आणावा व दंड स्थिती घ्यावी.

या आसनात दोन्ही चवडे बाहेरच्या दिशेने वळवल्यामुळे कमरेच्या स्नायूंना पीळ पडतो. चवडा आणि टाच दोन्ही एका सरळ रेषेत असल्यामुळे शरीराचा तोल सांभाळणे थोडे कठीण असते. मात्र, हात पुढे घेतल्यामुळे हा तोल सांभाळणे सोपे जाते. आपल्या कमरेपुढे जणुकाही मुदंग बांधला आहे आणि तो आपण हाताने वाजवतो आहे अशी मृंदगासनाची कल्पना आहे. ज्यांचे गुडघ्याचे सांधे दुखावलेले आहेत किंवा कडक झालेले आहेत त्यांनी योगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करावे. करायला आणि टिकवायलाही सोपे असे हे आसन दिवसातून एकदा करावेच.

 

सुजाता गानू-टिकेकर, योगतज्ज्ञ