पॅनकार्ड हे एक महत्त्वाचे ओळखपत्र म्हणून ओळखले जाते. अनेक महत्त्वाच्या व्य़वहारांसाठी पॅनकार्ड आवश्यक असते. साधारण एक वर्षापूर्वी मोदी सरकारने केलेली नोटाबंदी आणि बेहिशेबी मालमत्तेवर निर्बंध यावेत यासाठी यासंदर्भातील नियम आणखी कठोर करण्यात आले. तेव्हापासून पॅनकार्डला महत्त्वाच्या कागदपत्रात समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे अनेक महत्त्वाची कामे करणे आता काही प्रमाणात कठीण झाले आहे. त्यामुळे तुमच्याकडे अजूनही पॅनकार्ड नसेल किंवा हरवले असेल तर लगेचच काढून घ्या. पॅनकार्ड नसल्यामुळे तुमची कोणती कामे अडू शकतात ते पाहूया…

कार खरेदी

कार खरेदी ही त्या मानाने मोठी खरेदी आहे. यामध्ये आर्थिक व्यवहारही काही प्रमाणात मोठा असल्याने याठिकाणी तुमच्या पॅनकार्डची मागणी होऊ शकते. खरेदीच्या प्रक्रियेतील फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे पॅनकार्ड असणे आवश्यक असते. याशिवाय तुम्ही कार खरेदी आणि विक्रीही करु शकत नाही.

हॉटेलचे बिल

तुम्ही सुटीसाठी कुठे फिरायला गेलात किंवा आपल्याच गावात एखादी पार्टी असेल तर आपले बिल ५० हजारांच्या वर जाऊ शकते. अशावेळी तुम्हाला संबंधित हॉटेल व्यवस्थापनाकडून तुमच्या पॅनकार्ड क्रमांकाची मागणी होऊ शकते. त्यामुळे हॉटेलशी मोठा व्यवहार करायचा असल्यास पॅनकार्ड जवळ बाळगणे महत्त्वाचे आहे.

बॅंक खाते

तुम्ही नोकरी बदलली की तुम्हाला नव्या नोकरदाराच्या सांगण्यानुसार विशिष्ट बॅंकेत खाते उघडावे लागते. याशिवाय बॅंकेत खाते उघडण्याची इतरही अनेक कारणे असतात. अशावेळी तुमच्याकडे पॅनकार्ड असणे अतिशय आवश्यक असते. याशिवाय बॅंकेत ५० हजार किंवा त्याहून जास्त रक्कम एकावेळी भरायची असल्यास बॅंकेकडे पॅनकार्डची माहिती द्यावी लागते. यामुळे तुमचे काम सोपे होते.

फोन कनेक्शन

तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी नवीन सिमकार्ड घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुमच्याकडे पॅनकार्ड असणे बंधनकारक आहे. मोबाईलच्या व्यवहारातील सुरक्षा वाढण्यासाठी अशाप्रकारे तुमचा पॅनकार्ड क्रमांक आवश्यक असतो. पॅनकार्डचे डिटेल्स तुम्हाला सिमकार्ड घेण्याच्या फॉर्ममध्ये भरावे लागतात.