जे तरुण १८ ते ३६ या वयादरम्यानचे आहेत, ते सध्या तीव्र वेदनांना दूर करण्यासाठी आरोग्यपूर्ण जीवनशैलीला पसंती देत आहेत. यासाठी ते व्यायाम करणे आणि योग्य प्रमाणात आहार घेत असल्याचे अमेरिकेतील एका अभ्यासामध्ये आढळून आले आहे.

अनेकदा तरुण त्यांचा दिवस मोबाइल, टॅबलेट किंवा संगणक यावर घालवतात. यामुळे शरीरामध्ये वेदना होण्यास सुरुवात होते. या तीव्र वेदना घालवण्यासाठी नवी पिढी मोकळ्या वेळेत व्यायाम आणि खेळ खेळण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या अगदी लहान वयामध्येही तीव्र वेदनेला सामोरे जावे लागत आहे.

अमेरिकन सोसायटी ऑफ अ‍ॅनेस्थेशिओलॉजिस्टने (एएसए) याबाबत एक सर्वेक्षण केले. यामध्ये तीव्र वेदना कमी करण्यासाठी सध्याची तरुण पिढी आवश्यक प्रमाणात व्यायाम, योग्य आहार, धूम्रपान सोडणे आणि वजन कमी करणे यासारखे बदल आपल्या जीवनशैलीमध्ये करत असल्याचे त्यांना आढळून आले

सर्वेक्षणातील निम्म्या तरुणांनी तीव्र वेदना कमी करण्यासाठी वापरले जाणारे ओपिओयडस् स्वत:पासून दूर केले. तसेच निम्म्या तरुणांनी अधिक प्रमाणात वेदनाशमक गोळ्या घेण्याचे व्यसन दूर केले. अनेक तरुणांना  ओपिओयडस्चा वापर अयोग्य असल्याचे दिसून आले.

अधिक प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर केल्याने तरुणांना तीव्र वेदना होत असून, यामध्ये डोळ्यावर ताण येणे, मान दुखणे, हात आणि हाताची बोटे यांना वेदना, मनगट किंवा हाताला वेदना होण्याचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. हय़ा वेदना त्यांना तीन महिन्यांपर्यंत होत्या.

तीव्र वेदना दूर करण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये आवश्यक तो बदल करणे हा यावरील सर्वात मोठा उपाय आहे. शक्य आहे तेथे प्रतिबंध करणे सर्वोत्तम असल्याचे संशोधकांनी सांगितले.

आरोग्यपूर्ण जीवनशैली करण्यासाठी व्यायाम, योग्य पोषण आहार, वजन नियंत्रित करणे आवश्यक आहे. आरोग्यपूर्ण जीवनशैलीमुळे तीव्र वेदना दूर केल्याचा आपल्या पालकांनी आणि आजीआजोबांनी अनुभव घेतला असेल, असे संशोधकांनी सांगितले.