पहिला : डीड यू हियर ट्रोल्स?

दुसरा : यप.. इट्स ऑसम..

यादरम्यान तिसऱ्याचा गुगलवर सर्च चालू झालेला आहे..! कारण आपल्याला या गाण्याबद्दल माहीत नाही असं होऊन कसं चालेल?

xxx

पहिला : मला खूप झोप येतेय. काल रात्री ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे दोन सीजन पाहून संपवले.

दुसरा : इट्स काइंड कुल माय बॉय

xxx

‘‘काय? तू फ्रेंड्सचा एकही एपिसोड पाहिलेला नाहीस?’’ (मनातल्या मनात : असं कसं होऊ शकतं? यू आर सो आऊटडेटेड)

xxx

‘‘ला ला लँड, मून लाइटला ऑस्कर मिळालाय आणि आता चर्चा तर होणारच, ते तर पाहायला हवंच!!

हे आहेत सो कॉल्ड ‘प्रो’ लोकांमध्ये चाललेले काही संवाद. या आणि अशा अनेक गोष्टी ज्या त्यांच्या दृष्टीने फार साध्या आहेत, त्या तुम्हाला माहीतच कशा नाहीत हा प्रश्न काही स्वयंघोषित प्रो लोकांना पडतो. त्याचं असं आहे की, मातृभाषेवरचं प्रेम, मराठी अस्मिता, मराठी बाणा याची काही कुठे कमी नाही. पण आपल्याला पाश्चिमात्य, इंग्रजाळलेल्या गोष्टीचं कितीही नाही म्हटलं तरी अप्रूप हे असतंच! आणि काही लोकांच्या नजरेत या साध्या आणि खासकरून मनोरंजन क्षेत्रातल्या तिकडच्या मोठय़ा कलाकारांबद्दल, गाजलेल्या चित्रपट, वेबसीरिज, गाणी यांबद्दल आपल्याला माहीत नाही म्हणजे आपल्याकडे तुच्छ कटाक्ष टाकले जातील असं वाटतं. आजकाल आपण कसे प्रो आहोत हे दाखवण्यासाठी जणू हुकमी एक्का म्हणूनही या गोष्टीकडे पाहिलं जात आहे.

आता तुम्ही म्हणाल, प्रो कबड्डी तर आम्ही ऐकलंय, पण प्रो असणं म्हणजे काय? तर ज्याला आपण शहाणा म्हणतो किंवा एखाद्या विषयातलं ज्याला जास्त ज्ञान आहे त्याला प्रो अर्थात प्रोफेशनल म्हणतात. पण प्रो हा शब्द एक प्रकारचा स्लँग म्हणूनदेखील वापरला जातो. आपण काही तरी जास्त जाणतो हा त्यामागचा उद्देश आहे.

ज्यांना आपल्या मातृभाषेत काय चाललंय याचा थांगपत्ता नसतो, मात्र इंग्रजी गाणी, वेबसीरिज, चित्रपट, त्यांतील कलाकार, गायक मंडळी आणि अन्य क्षेत्रांतली नावं माहीत आहेत म्हणून ते प्रो ठरलेले असतात. इंग्रजी ही एक भाषा आहे, त्यामुळे ती आली म्हणजे तुम्ही हुशार किंवा पाश्चिमात्य गोष्टी माहीत नाहीत म्हणजे तुम्ही अडाणी असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. कोणत्याही भाषेचं ज्ञान यावरून तुमची बुद्धिमत्तेची तपासणी होऊ शकत नाही. अनेक वेळा हा वैयक्तिक आवडीनिवडीचा देखील प्रश्न असतो. एखाद्याला हॉलीवूडपेक्षा बॉलीवूड किंवा आपल्या प्रादेशिक भाषेतल्या गोष्टी जास्त आवडत असतील तर त्यात काही चुकीचं किंवा कमीपणाचं नाही.

या प्रो होण्यामागे एक प्रकारचं पीअर प्रेशर जाणवत असतं, ज्याला आपण फोमो अर्थात फिअर ऑफ मिसिंग आऊट म्हणतो. जे आपल्या मित्रमंडळींना माहीत आहे ते आपल्यालादेखील माहीत हवं असा त्यामागे अट्टहास दिसून येतो. आणि आपण कुठे कमी पडायला नको म्हणून ही सगळी माहिती ठेवून स्वतला अपडेट ठेवलं जातं. आणि जर एखादी गोष्ट माहीत नसेल तर ती जाणून घेण्यासाठी गुगलबाबांचा आधार घेतला जातो. हे गुगलवरचे शहाणेच म्हणा ना!

आता सगळेच काही आव आणतात किंवा हे माहीत असणं आणि इतरांना ते सांगणं यात काही चूक आहे असं मुळीच नाही. तुम्ही त्यातले खरेखुरे प्रो असाल, तुमची आवडच ती असेल तर त्यावर कुणाचा आक्षेप नाही. तेवढं तर व्यक्तिस्वातंत्र्य आहे अजून आपल्याकडे! पण ज्याला यातलं काही माहीत नाही तो अडाणी ठरत नाही हे यातून सांगायचंय. कदाचित त्याची आवड वेगळी असेल आणि तुम्हाला माहीत नाही त्याबद्दल त्याला माहीत असेल पण ते आपलं आहे म्हणून त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलेलं असेल.

हा मुद्दा प्रो असण्याचा मुद्दा मातृभाषेतल्या गोष्टीविषयी मात्र फारसा येत नाही हेदेखील तितकंच खरं. म्हणजे एखादं मराठी किंवा िहदी गाणं, चित्रपट याबद्दल किंवा मातृभाषेत असणारं अज्ञान याचं कुणाला फारसं वाईट वाटत नाही. त्यासाठी कुणी धडपडताना दिसत नाही. उलट ते काय जाणून घ्यायचं असा दृष्टिकोन पाहायला मिळतो.

प्रो आहोत हे भासवण्यासाठी काही शोधू किंवा जाणून घेऊ नका. स्वतला चारचौघांत कसं मला माहीत आहे हे दाखवण्यात कसली आलीये मज्जा? तुम्हाला जे आवडतं, तुम्हांला ज्यातून आनंद मिळतो, ते तुम्ही करा. उगाच या प्रो कॅटेगरीत बसण्यासाठी जो प्रयत्न होतो त्यात फजिती होण्याचादेखील संभव असतो. त्यामुळे आपलं अज्ञान लपवायच्या नादात केलेल्या प्रयत्नातून आपलंच हसं तर होणार नाही ना, याची खबरदारी जरूर घ्यायला हवी.

response.lokprabha@expressindia.com

सौजन्य – लोकप्रभा