बदललेल्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याने आता प्रत्येकानेच आपल्या हृदयाची काळजी घेण्याची गरज असून अनारोग्यकारक खाण्यावर नियंत्रण ठेवा आणि व्यायाम करून जीवनशैली ‘हार्ट फ्रेंडली’ ठेवा, असा सल्ला डॉक्टरमंडळींनी देत आहेत.
२९ सप्टेंबर हा दरवर्षी जागतिक हृदय दिन (वर्ल्ड हार्ट डे) म्हणून साजरा केला जातो. सध्या जगभरात हृदयरोगांमुळे सर्वाधिक मृत्यू होत आहेत. वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या आकडेवारीनुसार दरवर्षी १ कोटी ७३ लाख लोक हृदयरोगाने मृत्यूमुखी पडतात. भारतातील एकूण मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू हृदयरोगाने होत असतात. गेल्या काही दशकांपासून हृदयरोगाचे प्रमाण तरुणांमध्ये वाढत असल्याचे दिसून आले आहे. पाश्चिमात्य जगाच्या तुलनेत भारतामध्ये वयाची १० वर्षे आधी हृदयरोग होताना दिसू लागले आहेत. ज्यांना हृदयरोग होतो, अशा लोकांपैकी एक चतुर्थाश लोक हे ३० ते ५० वर्षे वयोगटातील आहेत. हृदयविकाराचा धोका असलेल्यांचा वयोगट ज्यारितीने कमी होऊ लागला आहे, त्यावरून यापुढे वयाच्या विशीतच हृदयरोग झाल्यास नवल वाटू नये अशी परिस्थिती आहे. जीवनशैलीत हळूहळू, पण मोठय़ा प्रमाणावर बदल झाल्यामुळे हृदयरोग लहान वयात होताना दिसत आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे अनारोग्यपूर्ण खाण्याची सवयही त्याला कारणीभूत असल्याने लहान मुले आणि मध्यम वयातील लोकांमध्ये याचे प्रमाण वाढत आहे. लहान मुलांमधील स्थूलता मोठय़ा प्रमाणावर वाढू लागल्याने त्यांच्यातही हृदयरोगाचे प्रमाण वाढू लागले आहे.आपण ज्या पर्यावरणात राहतो, त्याचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होत असतो. त्यामुळे या वर्षीच्या जागतिक हृदय दिनाचा विषय आपले पर्यावरण हे ‘हार्ट फ्रेंडली’ बनवणे हा आहे. त्या दृष्टीने काही बाबी पाळणे इष्ट असल्याचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण कुळकर्णी यांनी सांगितले. कामाचे ठिकाण (कार्यालय) धूरविरहित ठेवावे, तेथे दिले जाणारे खाद्यपदार्थ आरोग्यकारक असावे, शक्यतो लिफ्टचा वापर टाळून जिने चढून जावेत, कर्मचाऱ्यांना हृदयरोगाबाबत जागरूकता निर्माण करावी. शाळकरी मुलांमध्ये स्थूलतेचे वाढते प्रमाण लक्षात गेऊन शाळेने पालक, शिक्षक व मुलांनाही हृदयरोगाविषयी जागरूक करावे. त्यासाठी भाषणे आणि संभाषणात्मक कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.  मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल यासारख्या घातक गोष्टींवर लक्ष ठेवावे.  नियमित व्यायाम करावा. श्रमदायक व्यायाम करायचा नसेल, तरी दररोज किमान २५ ते ३० मिनिटे वेगाने चालणे हृदयरोग टाळण्यासाठी उपयुक्त आहे. सकारात्मक राहून  ताण कमी केल्यास आनंदी राहणे शक्य आहे, अशी सूचनाही डॉ. कुळकर्णी यांनी केली.