कोणत्याही औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या जीवाणूंचा नायनाट करण्याची क्षमता असलेली औषधे ऑस्ट्रेलियाच्या शास्त्रज्ञांनी तयार केली आहेत. त्यामुळे अशा स्वरूपाचा क्षयरोग बरा होण्यासाठी आता चार महिन्यांऐवजी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.  
कोणत्याही औषधांना दाद न देणारा क्षयरोग  बरा करण्यासाठी डॉक्टरांनी औषधांचा एक गट तयार केला आहे. यालाच त्यांनी ‘कोम्बो ड्रग्ज’ म्हटले आहे. याचेच त्यांनी ‘पीएएमझेड’ असे नामकरण केले आहे. क्षयरोगावरील प्रमाणित उपचार पद्धतीपेक्षा जास्त जीवाणूंना नष्ट करण्यात ही औषधे अधिक सरस आहेत. शिवाय औषधांनाही दाद न देणाऱ्या क्षयरोगावर मात करण्याची क्षमता या औषधांमध्ये आहे, असे संशोधनातील निष्कर्षांवरून स्पष्ट झाले आहे. आंतरराष्ट्रीय एड्स परिषदेत या औषधांसंबंधी नुकतेच एक सादरीकरण झाले. औषधांना दाद न देणाऱ्या आणि औषध संवेदनशील क्षयरोगासंदर्भात माहिती देण्यात आली. या दोन प्रकारांत मोडणाऱ्या औषधांची क्षमता सिद्ध करण्यात आली आहे, असे डॉ. मेल स्पायजेलमन यांनी सांगितले. स्पायजेलमन हे न्यूयॉर्कस्थित ग्लोबल अलायन्स या टीबी औषध विकसन संस्थेचे सीईओ आहेत. आजवर ७१ टक्के लोकांवर ‘पीएएमझेड’ उपचार पद्धती करण्यात आली आहे. यात त्यांच्या शरीरातील क्षयाचे जीवाणू नष्ट झाले आहेत. अर्थात, सर्वात संवेदनशील निदान पद्धतीचा अवलंब करून त्यांच्यावर हे उपचार करण्यात आल्याने त्यांनी क्षयावर दोन महिन्यांच्या आत मात करण्यात यश मिळविल्याचे स्पायजेलमन यांनी या वेळी सांगितले. तर ३८ टक्के लोकांना प्रमाणित उपचारपद्धतीनुसार औषधे देण्यात आल्यानंतर त्यांनी आठ आठवडय़ांत प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले. यातील काही औषधांचा उपचार पद्धतीत वापर करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही, असे एका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. याआधीच्या अभ्यासात ‘पीएएमझेड’ पद्धतीनुसार उपचार पद्धतीत काही रुग्णांच्या शरीरात फार कमी कालावधीत जीवाणूंचा नायनाट होण्यास मदत झाली होती. या वर्षीच्या अखेरीस आफ्रिका, आशिया, पूर्व युरोप आणि लॅटिन अमेरिकेत या औषधांचा वापर तिसऱ्या टप्प्यातील उपचारपद्धतीत करण्यात येणार असल्याचे डॉ. स्पायजेलमन यांनी स्पष्ट केले.