अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात एनडीएम ४ हा महाजिवाणू सापडला आहे. हा जिवाणू कोणत्याही प्रतिजैविकांना (अँटिबायोटिक्स) दाद देत नाही. या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यात वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासात त्यांना हा जिवाणू सापडला असल्याचे ब्रिटनच्या जर्नल ऑफ
मेडिकल बायॉलॉजी या नियतकालिकाने म्हटले आहे.
प्रतिजैविकांना दाद न देणारा महाजिवाणू भारतात आढळण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. रुग्णालयाच्या जनरल वॉर्डमधून १० मीटर परिसरातील सांडपाण्याचे नमुने तीन ठिकाणाहून घेतले व त्याची तपासणी केली असता महाजिवाणू सापडला असे आंतरविद्याशाखीय जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेचे मुख्य समन्वयक डॉ. असद उल्ला खान यांनी म्हटले आहे. खान हे संशोधन पथकाचे प्रमुख होते. शाहदाब परवेझ यांचाही या चमूत समावेश होता त्यांनी सांगितले की, आतापर्यंत हा महाजिवाणू कॅमेरून, डेन्मार्क, फ्रान्स, झेक प्रजासत्ताक येथे आढळून आला आहे. असे असले तरी घाबरण्याचे कारण नाही. फक्त देशातील आरोग्याचे निकष बदलले पाहिजेत, पिण्याचे स्वच्छ पाणी व भेसळमुक्त अन्न सेवन केले पाहिजे. एचआयव्ही व कर्करोगाचे रुग्ण या जिवाणूला तोंड देऊ शकत नाहीत कारण त्यांची प्रतिकारशक्ती आधीच कमी झालेली असते.
या महाजिवाणूचे मूळ नेमके कुठे आहे यावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर वाद सुरू झाला असून खान यांच्या मते एनडीएम ४ या जिवाणूचा हा अलिकडचा नवीन प्रकार आहे. अनेक औषधांना तो दाद देत नाही. एनडीएम १ हा जीवाणू मात्र ईशान्य भारतात व जगाच्या इतर भागात आढळतो.
घातक जिवाणू
५२ नमुन्यांपैकी एका नमुन्यात एनडीएम ४ सापडला असून तो वेगळा काढण्यात आला आहे. या जिवाणूंची संख्या फार वेगाने वाढते. अलिगडमध्ये सापडलेला हा जिवाणू घातक असून नवी दिल्ली येथे एका स्वीडिश रुग्णात २००९ मध्ये सापडलेल्या एनडीएम १ जिवाणूपेक्षा घातक आहे.