रजोनिवृत्तीनंतर वजन वाढलेल्या स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग  पुन्हा होण्यापासून रोखण्याचे काम अ‍ॅस्पिरिन व आयब्रुफेनसारख्या वेदनाशामक गोळ्या करू शकतात, असे वैज्ञानिकांना दिसून आले आहे.  
टेक्सास हेल्थ सायन्स सेंटरचा कर्करोग उपचार व संशोधन विभाग व ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठ यांनी केलेल्या संशोधनानुसार अ‍ॅस्पिरिन घेणाऱ्या  स्त्रियांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याचा अभ्यास करण्यात आला.  त्यांनी मेदपेशीतील स्त्राव घेऊन त्यांची तपासणी केली. या मेदपेशी इस्ट्रोजेनची निर्मिती करीत असतात. नंतर हा स्त्राव स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींवर टाकला असता ज्या स्त्रियांचे वजन वाढलेले होते त्यांच्यात वजन वाढले नसलेल्या स्त्रियांपेक्षा कर्करोग पेशींची वाढ जास्त दिसून आली.  
    हे घडून येण्यामागे शरीरातील प्रोस्टॅग्लंडिन ही वेदना निर्माण करणारी रसायने कारण ठरत असतात असे कर्करोग वैज्ञानिक अँड्रय़ू ब्रेनतर यांचे म्हणणे आहे. या माहितीच्या आधारे वैज्ञानिकांनी कॉक्स-२ इनहिबिटर्स ( अ‍ॅस्पिरिन व आयब्रुफेन) घेणाऱ्या व न घेणाऱ्या स्त्रियांमध्ये प्रोस्टॅग्लँडिनचा परिणाम तपासला.
   ज्या स्त्रिया कॉक्स २ इनहिबिटर्स म्हणजे अ‍ॅस्पिरिन व आयब्रुफेन घेत होत्या त्यांच्यात दोन वर्षांच्या काळात स्तनाचा कर्करोग पुन्हा होण्याच्या शक्यता ५०  टक्क्य़ांनी कमी झाली. एस्ट्रोजेन या संप्रेरकाच्या जास्त प्रमाणामुळे अनेकदा कर्करोग पुन्हा बळावण्याची शक्यता असते, असे ७५ टक्के स्त्री रूग्णांमध्ये दिसून आले आहे. हे निष्कर्ष प्राथमिक असले तरी महत्त्वाचे आहेत असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. ‘कॅन्सर रीसर्च’ या नियतकालिकात हे  संशोधन प्रसिद्ध झाले आहे.