सामायिक बाथरुमचा वापर करताना आपला टुथब्रश कोठे आणि कशाप्रकारे ठेवावा याची काळजी घेणे आवश्यक आहे कारण या टुथब्रशच्या माध्यमातून संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याची शकता संशोधकांनी वर्तवली आहे.

आपण वापरत असलेल्या टुथब्रशमध्ये आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थांचा समावेश असतो. जेव्हा या टुथब्रशचा दुस-या व्यक्तीच्या तशाचप्रकारच्या टुथब्रशशी संपर्क येतो तेव्हा संसर्गजन्य रोगांचा प्राधूर्भाव होण्याची शक्यता असते. कारण दुस-या व्यक्तीच्या टुथब्रशमधील टाकऊ पदार्थांमध्ये दडून बसलेले जिवाणू, विषाणू तसेच रोग पसरवणारे घटक तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकत असल्याची माहिती अमेरिकेतील क्युनीपाय विद्यापिठाचे लॉरेन अबेर यांनी दिली.

याविषयाचा अभ्यास करण्यासाठी क्युनीपाय विद्यापिठात सामायिक बाथरुमाचा वापर करणा-यांकडून टुथब्रशचे नमुने गोळा करण्यात आले होते. यातील साठ टक्के टुथब्रशमध्ये दुषित घटकांचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. टुथब्रशला संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी त्याला कव्हर लावण्याची पध्दत उपयुक्त नसल्याचे सांगत, वाळण्यासाठी हवा न मिळाल्याने टुथब्रश ओलसर राहतो ज्यायोगे जिवाणू आणि विषाणूंवाच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते असे अबेर म्हणाले.

रोगाचा प्रसार आणि प्रादुर्भाव होण्यास टुथब्रश हे महत्वाचे माध्यम असू शकते अशी शक्यता वैज्ञानिकांनी 1920 मध्ये वर्तवली होती. तसेच बाथरुममध्ये उघड्यावर ठेवलेल्या टुथब्रशचा बाथरुममधील दुषित घटकांशी संपर्क होण्याचा धोका मोठ्याप्रमावर आहे असे या संशोधनातून समोर आले आहे. या संशोधनाचा अहवाल अमेरिकन सोसायटी ऑफ मायक्रोबायोलॉजीच्या वार्षिक सभेत सादर करण्यात आला होता.