येवा मालवण आपलोच असा…मालवणचो निसर्ग आणि मालवणी माणूस जगात शोधून सापडाचो न्हाय.. हे प्रत्यक्षात अनुभवायचा योग आला. खरंतर स्कूबा डायव्हिंग आणि पॅरासेलिंग करण्याच्या तळमळीने मालवणला जाणे झाले. मूळचा मालवणचा असूनही आजवर एकदाही जाणं न झाल्याने ही मालवणवारी माझ्यासाठी खास होती. या संपूर्ण प्रवासात प्रत्येक ठिकाणं आणि त्याचं सौदर्यं माझ्यासाठी नवं होतं विशेष म्हणजे स्कूबा डायव्हिंग आणि पॅरासेलिंगचा अनुभव माझ्यासाठी खूपच वेगळा आणि हुरूप आणणारा ठरला.
तारकर्लीच्या सुंदर पण तितक्याच भयाण समुद्रात खोलवर केलेली बोट सफर आठवणींच्या तिजोरीत कायमची बंदीस्त राहील यात शंका नाही. उंचच उंच लाटांवर हिंदोळे घेत समुद्रात मार्गक्रमण करणारी बोट ‘आम्ही खलाशी जणू या अथांग सागराचे राजे’ असल्याचा फिल देणारी. पण, भयाण लाटांना छेदताना थेट बोटीत येऊन अंगावर धडकणारं समुद्राचं पाणी तितकंच धडकी भरवणारं होतं.
पॅरासेलिंगच्या बोटीवर लाईफ जॅकेट घालून पॅरासेलिंगचा थरार अनुभवण्यासाठी सज्ज होतो. बोटीवर एकामागून एक प्रत्येक जण पॅरासेलिंग करण्यासाठी जात होता… प्रत्येकाच्या चेहऱयावर दडपण जाणवत होतं खरं पण पक्ष्याप्रमाणे गगनात स्वच्छंदी फेरफटका मारून परत आल्यानंतरचे आनंदी चेहरे पुढच्यांची उत्सुकता वाढवणारे ठरले. त्यात बोटीवरचा मालवणी प्रशिक्षक..अहो घाबरता कशाक…काही होऊचा नाय..मी असा तुमची काळजी घेवाक, असं अगदी विश्वासानं म्हणला. पॅरासेलिंग करण्यास गेलेल्या व्यक्तीला बोटीवरून आकाशात वर जाण्यापासून अगदी बोटीवर परत येईपर्यंत प्रशिक्षक नजरेआड होऊ देत नव्हता. पॅरासेलिंगसाठी चांगली हवा मिळावी म्हणून समुद्रात भर वेगात बोट फिरत होती. जिथवर नजर जाईल तिथवर पसरलेला अथांग सागर आणि आकाशातल्या स्वच्छंदी सफरीने मन प्रसन्न झालं. घार जशी सुरूवातीला थोडंस हिंदोळे घेऊन नंतर पंख पसरवून मोकळ्या आकाशात स्थिर होते. तसंच काहीसं पॅरासेलिंगचा पॅराशूट आकाशात स्थिर झाल्यावर होतं आणि घारीच्या पंखांप्रमाणेच हात पसरवण्याचं मनं होतं.
दुसऱया दिवशी सकाळी स्कूबा डायव्हिंगसाठी समुद्रात प्रवाळ बेटं (कोरल्स) उपलब्ध असलेल्या मालवण किल्ला ठिकाणच्या समुद्रात गेलो. स्कूबा डायव्हिंगमध्ये तरबेज असलेला एक मालवणी पठ्ठ्या डायव्हिंग इन्स्ट्रक्टर म्हणून सोबत होता. ऑक्सिजन सिलिंडर असलेलं जॅकेट घातल्यानंतर बोटीवरून पाण्यात उतरण्याआधी डायव्हिंग इन्स्ट्रक्टरने सुचना देऊ केल्या आणि त्या तंतोतंत पाळण्याची काळजी घेण्यास सांगितले. नाकात पाणी जाऊ नये आणि उघड्या डोळ्यांनी समुद्राखालचं सौंदर्य पाहता यावं यासाठी चेहऱयावर मास्क लावावं लागतं. या मास्कमुळे नाकावाटे श्वास घेणं पूर्णपणे बंद होऊन गेलं. फक्त तोंडावाटेच श्वसनक्रिया सुरू ठेवावी लागली. तशी सवय नसल्यामुळे सुरूवातीला थोडं अवघडल्यासारखं झालं. त्यात खोल पाण्याची भिती मनात असल्याने वाढणारी धडधड आणखी काळजीचा विषय… या सर्वांचा अंदाज डायव्हिंग इन्स्ट्रक्टरला जणू आधीच आल्याने त्याने माझी रुखरुख ओळखली आणि काही महत्त्वाच्या सुचना देऊन सुरूवातीला थोडा सराव करून घेतला. पाण्याखालची परिस्थितीशी जुळवून घेणं मला जमत असल्याचं लक्षात आल्यानंतरच त्याने माझ्या स्कूबा डायव्हिंगच्या सफरीला होकार दर्शवला. यानंतरचा अनुभव हा अविस्मरणीय होता. इन्स्ट्रक्टरच्या निर्देशांचे पालन करत मार्गक्रमण करत होतो…आजूबाजूने जाणारे मासे आणि कोरल्सचे सौदर्यं डोळ्यांना थक्क करणारं….पण, त्यावर व्यक्त होणं शक्य नव्हतं. कारण, तोंडावाटे श्वास घेण्याची क्रिया सुरू होती. त्यामुळे डोकावून बघणारे लहान रंगीबेरंगी मासे, एनसीसीच्या परेडप्रमाणे समान रंगाचे घोळक्याने फिरणारे मासे…रंगीबेरंगी जिवंत प्रवाळांच्या जवळपास पोहणाऱ्या माशांबरोबर पोहण्याची संपूर्ण सफर डोळ्यांत भरून ठेवत होतो.
थोडं पुढे जाऊन सुंदर मखमली रंगांचे शिंपल्यांचा खच पाहून पिशव्या भरभरून सोबत न्यावेत अशी इच्छा होणं साहजिकच होतं, पण तो मोह इथं आवरावा लागला. इतक्यात अगदी चेहऱयासमोर डायव्हिंग इन्स्ट्रक्टरने ब्रेडचा तुकडा टाकला आणि रंगीबेरंगी माश्यांची पलटण ब्रेडच्या तुकड्यावर तुटून पडली…माशांची झुंबड चेहऱयासमोर जमा झाल्याने त्यांना हात लावण्याची सुप्त इच्छा झाली. त्यांना स्पर्श करणार तितक्यात मासे मोठ्या चपळाईने कोरल्समध्ये जाऊन दडायचे. चेहऱयावरील मास्कसमोर येणारे मासे जणू मला निरखून पाहत होते. सारं मनाला भावून जाणारं होतं… मात्र, इन्सट्रक्टरने सांगितल्यानंतरी तिथून पाय निघत नव्हता. अजून काही तास तरी याच दुनियेत रहावं, असं वाटतं होतं..पाण्याखालचं हे स्वच्छंदी जग आणखी न्याहाळून घ्यावंस वाटलं.. इन्स्ट्रक्टरने मार्ग दाखवत बोटी जवळ आणले…बोटीच्या शिडीवर वर चढत पाण्याबाहेर आलो ऑक्सिजन मास्क काढला आणि… “भन्नाटटट” अशी माझी पहिली प्रतिक्रिया होती…बोटीवर परत अाल्यानंतर मग उगाच ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटातील दृश्याचा फिल येत होता. आपण काहीतरी ग्रेट केलयं याची जाणीव पूर्ण शरीरात आणि मनात भरून राहिली होती. या धुंदीत तरंगत असतानाच आमची बोट किनाऱ्याकडे निघाली..पण, बोट किनाऱयावर येईपर्यंत माझं लक्ष त्या समुद्राच्या पाण्यात होतं.. पाण्याखालच्या एका नयनरम्य जगाला मी अवघ्या अर्धातासात सोडून जात होतो. पण, माघारी येताना माझ्या आठवणींची पोतडी मात्र काठोकाठ भरून घेऊन आलो याचं समाधान मनात होतं.

– मोरेश्वर येरम
moreshwar.yeram@expressindia.com

himanshu tembhekar dhule upsc
फूड डिलिव्हरीचा स्टार्टअप ते ‘यूपीएससी’ परीक्षेत यश, धुळ्याचा हिमांशू टेंभेकर देशात ७३८ वा
NASA captures mysterious ‘surfboard-shaped’ object orbiting moon
चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?
Loksatta viva Services and travel Volunteer Tourism Tourism
सफरनामा: सेवा आणि प्रवास!
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?