मानवाची जितकी प्रगती झाली तितक्याच जोमाने विज्ञान, संशोधन आणि वैद्यकशास्त्रालाही वाकविणाऱ्या काही प्राणघातकी आजारांचा बागुलबुवा त्याच्यासमोर सातत्याने धरला. १९९०चे दशक एड्सच्या (एचआयव्ही) दहशतीमध्ये राहिले. त्यानंतर सार्स, बर्ड फ्लू आणि आता आधीच्या सर्व रोगांच्या घातकपणाला मागे टाकणाऱ्या ‘इबोला’ या रोगाचा बोलबाला सर्वत्र वेगाने पसरला आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये हजारांहून बळी घेणाऱ्या या आजारावर अक्सीर इलाज शोधून काढता आलेला नाही. तो  ज्या व्यक्तीला होतो त्याचा तो शेवटचा आजार ठरतो. त्यामुळे या रोगाची सध्याची जीवघेणी घोडदौड पाहून जागतिक आरोग्य संघटनेने ‘आरोग्य आणीबाणी’ घोषित केली आहे. सध्या या रोगाबाबत झळ न पोहोचलेल्या राष्ट्रांनी सुरू केलेल्या चुकीच्या भयचर्चाना टाळून, या आजाराविषयी ज्ञानविस्तार..
‘इबोला’ हा विषाणू नवीन नाही त्याचे अनेक आविष्कार आतापर्यंत जगाने पाहिले आहेत. या विषाणूने पहिल्यांदा १९७६ मध्ये काँगोतील यामबुकटू व सुदानमधील नाझरा येथे संसर्ग पसरवला होता.  त्यावेळी तेथील लोकसंख्याही तशी कमी होती. केवळ ५० रुग्ण आढळून आले . गेली पंधरा वर्षे हा इबोला विषाणू दबून होता, पण आता त्याने परत डोके वर काढले आहे. हा विषाणू जेव्हा गायब होतो तेव्हा तो निसर्गाच्या सान्निध्यातच असतो. तो वटवाघळे व माकडे यांच्यात राहतो पण विशेष म्हणजे त्यांना त्याचा काही त्रास होत नाही. काँगोमध्ये इबोला नदीकाठच्या प्रदेशात तो प्रथम आढळून आला म्हणून त्याला इबोला विषाणू असे म्हणतात.आफ्रिकेत या विषाणूच्या वेगवेगळ्या प्रजाती तयार झालेल्या आहेत. २०१४ मधील इबोलाची साथ ही इतिहासातील सर्वात मोठी साथ असल्याचे मानले जात आहे.
इबोला विषाणू रोगाची (ईव्हीडी) साथ सध्या पश्चिम आफ्रिकेतील देशात असून त्याने सातशेवर बळी घेतले आहेत, सिएरा लिओन, लायबेरिया, गीनी तसेच नायजेरिया या देशांमध्ये तो पसरला आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. सध्याची जी साथ आहे त्यात मृत्यूचे प्रमाण ९० टक्के असून, इबोला विषाणूची झैरे या देशात सापडलेली प्रजाती नवीन आहे.
संसर्गातही काहीजण जिवंत कसे राहतात?
याचे एक कारण म्हणजे त्यांची प्रतिकारशक्ती विषाणूशी लढते व विषाणूचा हल्ला परतवते. जर गंभीर संसर्ग नसेल तर आजार कमी प्रमाणात होतो. रोग कुठल्या टप्प्यात असलेल्या व्यक्तीशी किंवा प्राण्याशी तुम्ही संपर्कात आलात यावर ते अवलंबू असते. काही व्यक्तींच्या शरीरात या विषाणूशी ओळख पटवणारे मार्कर नसल्याने त्यांना पेशीत प्रवेश मिळत नाही. इबोलाविषयीचे संशोधन अजून बाल्यावस्थेत आहे. पेशींमध्ये या विषाणूच्या अनेक आवृत्त्या निघू न देणे हाच खरा त्यावरचा उपाय आहे. या विषाणूविरोधातील प्रतिपिंड शरीरात तयार होणे आवश्यक असते त्यासाठी प्रतिकारशक्तीला बाहेरून बळ द्यावे लागते.
इबोला शरीरावर विजय कसा मिळवितो?
इबोला विषाणू हवेतून शरीरात येतो. प्राण्यांच्या संपर्कात आले तरी तो माणसाच्या शरीरात येऊ शकतो. माणसाच्या शरीरातील बाहेर पडणाऱ्या द्रावांमधून त्याचा प्रसार होतो. ज्या व्यक्ती रुग्णाच्या संपर्कात येतील त्यांना तो होतो. नाक व तोंडातून विषाणू शरीरात येतो. नेहमीच्या तापमानाला तो दोन दिवस जिवंत राहू शकतो त्यामुळे त्याचे नियंत्रण अवघड असते. यात रुग्णाला वेगळे ठेवावे लागते व संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागते. एकदा इबोला विषाणू शरीरात प्रवेश करता झाला की, तो पेशींमध्ये घुसतो व स्वत:च्या प्रती काढत सुटतो. त्यामुळे पेशी फुटतात व त्यामुळे एक प्रथिन तयार होते त्याला ‘इबोलाव्हायरस ग्लायकोप्रोटिन’ असे म्हणतात. ते पेशींना व रक्तवाहिन्यांना आतून चिकटते.  त्यामुळे रक्तवाहिन्यांना धोका निर्माण होतो व त्या फुटून शरीरात अंतर्गत रक्तस्राव सुरू होतो. रक्त घट्टही होते. रक्तस्रावामुळे लोक दगावतात. शरीरातील न्यूट्रोफेलिस पेशींवर हे विषाणू हल्ला करतात. या पांढऱ्या पेशी असतात व प्रतिकारशक्तीचे नियंत्रण करीत असतात, त्याच हल्ल्यास बळी पडल्याने प्रतिकारशक्ती धोक्यात येते. त्यामुळे यकृत, मूत्रपिंड, प्लीहा व मेंदू यांना धोका निर्माण होतो. प्रत्येक संसर्गानंतर पेशी फुटतात व त्यातील द्रव बाहेर पडतो त्यामुळे सायटोकिन रेणू कार्यान्वित होतात, सायटोकिनमुळे शरीराची आग होते, सूज येते व इबोलाचा हल्ला कळू लागतो. इबोलात पहिली जी लक्षणे दिसतात ती फ्लू सारखीच असतात. त्यानंतर उलटय़ा, डायरिया, कमी रक्तदाब दिसून येतो. अगदी शेवटी शरीरात रक्तस्राव होतो. रक्त गळू लागते.
इबोलावर लस का नाही ?
हा विषाणू गरीब देशात वास्तव्य करणारा आहे त्यामुळे तिथल्या लोकांच्या प्राणांची किंमत श्रीमंत देशांच्या दृष्टीने गुंतवणुकीच्या लायकीची नाही असा एक आक्षेप घेतला जातो पण आता अमेरिका व प्रगत देशांनाच या रोगाचा फटका बसू शकतो.टेकमिरा फार्मास्युटिकल कंपनी त्यावर लस तयार करीत आहे, मोन्सॅटोने त्यांना पैसे दिले आहेत.इबोलामध्ये लोक वाचू शकतात. फक्त काळजी घ्यावी लागते.इबोलाचा विषाणू एडसच्या विषाणूप्रमाणे सतत रचना बदलत नाही त्यामुळे उपचार करण्यास सोपा असतो.
रूग्णाची काळजी
इबोलावर कुठलीही लस उपलब्ध नसली तरी अनेक लशींची चाचणी  घेण्यात आली आहे फक्त ती माणसांवर घेतलेली नाही. इबोला हा रोग १-१० विषाणू शरीरात गेले तरच होतो. रूग्णाच्या शरीरात निर्जलीकरण होते त्यामुळे तोंडावाटे जलीकरण द्रव द्यावेत, त्यात इलेक्ट्रोलाइटसचा समावेश असावा. या रोगात क जीवनसत्व कमी पडत असल्याने रोज ५ लाख मिलीग्रॅम सी जीवनसत्व घेतल्यास विषाणूशी शरीर सामना करू शकते.
निदानासाठी चाचण्या
*अँटी बॉडी कॅप्चर एनझाइम लिंकड इम्युनोसॉरबंट अ‍ॅसे (एलिसा)
*अँटीजेन डिटेक्शन चाचणी
*सिरम न्यूट्रलायझेशनरिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेझ पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन (आरटी- पीसीआर) अ‍ॅसे
*इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी
*सेल कल्चरच्या मदतीने विषाणू वेगळा करणे
इबोला विषाणूचे प्रकार
*बुंडीबुगयो इबोलाव्हायरस
*झैरे इबोलाव्हायरस
*रेस्टन इबोला व्हायरस
*सुदान इबोला व्हायरस
*ताय जंगलातील इबोला व्हायरस