एचआयव्ही किंवा लैंगिक आजारांचा धोका टाळण्याच्या दृष्टीने जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक संस्था आणि उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असतात. त्यासाठी अगदी शालेय वयापासूनच लैंगिक शिक्षण सक्तीचे करावे, असे एक ना अनेक पर्याय पुढे येताना दिसतात. मात्र, सार्वजनिक जीवनात अचानकपणे या गोष्टींचा उल्लेख झाला तरी, आपल्यापैकी अनेकजणांना धक्का बसल्यासारखे किंवा गोंधळून जायला होते. त्यामुळे अनेकजण हा विषयावरील बोलणे टाळणेच पसंत करतात. या सगळ्याची प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल साईटसवर फिरताना दिसत आहे. असुरक्षित शरिरसंबंधांमुळं होणारे आजार तसेच एड्सबाबत प्रबोधनाच्या दृष्टीने हा व्हिडिओ ‘व्हिडिओ डॅडी’ने तयार केला आहे. लैंगिक विषयांवर सहजपणे बोलण्याची मानसिकता अजूनतरी भारतीय समाजाच्या अंगी रूळलेली नाही, हेच या व्हिडिओतून दिसून येते.  
या व्हिडिओत एक तरुणी रस्त्याने ये-जा करणाऱ्या लोकांना कंडोम कुठे मिळेल असे विचारते. तरूणीच्या या अनपेक्षित प्रश्नाने अनेकजण गोंधळून गेले, तर काही जणांनी न बोलताच तिथून निघून जाणे पसंत केले.