गेल्या वर्षी पश्चिम आफ्रिकेत अनेक बळी घेणाऱ्या इबोला या रोगावर नवीन औषध तयार करण्यात आले असून, त्याचे प्रयोग उंदरांवर केले असता ते ९० टक्के प्रमाणात यशस्वी झाले.
डिसेंबर २०१३ पासून इबोलाचा संसर्ग २५ हजार लोकांना झाला व त्यात दहा हजारांहून अधिक बळी गेले. अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाने अजून इबोला संसर्गावर लस किंवा औषध याला मान्यता दिलेली नाही. असे असले तरी काही संशोधकांनी औषधांवर, तर काहींनी लस तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मलेरिया व फ्लूच्या औषधांसाठी वापरल्या जाणाऱ्या संयुगांचा विचार केला जात आहे.
अमेरिकी लष्करी वैद्यकीय संस्थेच्या संसर्गजन्य रोग संस्थेत काम करणाऱ्या रेखा पांचाळ यांनी इबोलावर औषध शोधून काढले आहे. त्यांनी डायाझाख्र्ोसेनेस नावाचे रेणू इबोलावर वापरले आहेत. हे रेणू बिनविषारी असून, बोटय़ुलिनम न्यूरोटॉक्सिन या जीवाणूंच्या विषावर प्रभावी उपाय म्हणून त्यांचा वापर केला जातो. प्रयोगात या संयुगांच्या वापराने ७० ते ८० टक्के उंदरांमधील इबोलावर इलाज झाला आहे, त्यात तीन संयुगे वापरली होती, त्यातील एकाचा चांगला परिणाम दिसून आला आहे. शिवाय त्यात इतर दुष्परिणाम म्हणजे साईड इफेक्टस दिसलेले नाहीत. ‘एसीएस इनफेक्शियस डिसीजेस’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
मनोज गंभीर यांचे संशोधन
मोनाश युनिव्हर्सिटीच्या संसर्गरोगशास्त्र व प्रतिबंधक औषधे विभागाचे सहायक प्राध्यापक मनोज गंभीर हे आणखी एक भारतीय संशोधक इबोलावरच्या लशीसाठी काम करणाऱ्या पथकात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. टेक्कास ऑस्टिनचे संशोधक स्टीव्ह बेलान यांच्या नेतृत्वाखाली व अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या केंद्राच्या सहकार्याने हे संशोधन सुरू आहे. सिएरा लिओन येथे लशीच्या चाचण्या करण्यात येत आहेत, असे  ‘द लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीजेस’ या नियतकालिकात म्हटले आहे.सीडीसीने लायबेरिया व गिनी बरोबर आता सिएरा लिओन येथे चाचण्या सुरू केल्या आहेत.
प्रा. गंभीर यांनी सांगितले की, सिएरा लिओन येथे नमुना पद्धतीने लोकांची निवड करण्यात येऊन लस दिली जाईल, ही लस सुरक्षित व प्रभावी आहे. सिएरा लिओन येथे पुढील सहा महिन्यात क्लस्टर पद्धतीने लस देण्यात येणार आहे. यादृच्छिक नियंत्रण चाचण्या (आरसीटी) पद्धतीत नमुना निवडीत चुका होण्याची शक्यता कमी आहे.