मलेरियावरील जगातील पहिली लस ऑक्टोबपर्यंत विक्रीस उपलब्ध होणार आहे, आतापर्यंत या लसीच्या अनेक चाचण्या आफ्रिकेत घेण्यात आल्या असून लाखो रुग्णांमध्ये मलेरियाविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी या लसीचा उपयोग होणार आहे.
संशोधकांनी सांगितले की, पहिल्याच मात्रेत ही लस ५ ते १७ महिन्यांच्या एकतृतीयांश बालकांमध्ये यशस्वी ठरली आहे, जगात १९.८ कोटी बालकांना मलेरिया होतो व त्यातील अनेक दगावतात त्यामुळे या लसीची आवश्यकता होती.
डासांमुळे होणाऱ्या या रोगाने दर वर्षी सहा लाख लोक मरण पावतात त्यात जास्त संख्या पाच वर्षांखालील मुलांची असते. आरटीएस, एस/एएसओ १ ही लस इंग्लंडच्या ग्लॅक्सोस्मिथक्लाईन (जीएसके) कंपनीने बिल व मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने दिलेल्या निधीतून तयार केली आहे व ती जगातील आजची सर्वात प्रभावी लस आहे. या लसीच्या चाचण्या २००९ मध्ये सुरू झाल्या व १५,५४९ मुलांना व बालकांना सहारन आफ्रिकेत ही लस देण्यात आली. बुर्किना फासो, गॅबॉन, घाना, केनिया, मलावी, मोझांबिक व टांझानिया या देशांचा या भागात समावेश होतो. लॅन्सेट मेडिकल जर्नलने याबाबत निष्कर्ष प्रसिद्ध केले असून एक हजार मुलांना ही लस चार वर्षांत देण्यात आली, त्यातील सरासरी १३६३ मुलांमध्ये मलेरिया रोखला गेला, ज्या मुलांना आणखी मात्रा देण्यात आली त्यांच्यात मलेरियापासून वाचण्याचे प्रमाण सरासरी १७७४ होते. जीएसके या कंपनीने आधीच या लसीची निर्मिती करण्याची परवानगी मागितली असून युरोपीय औषध संस्थेने या लसीला मंजुरी दिल्यास जागतिक आरोग्य संघटना या लसीचा समावेश आफ्रिकेतील लोकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी करण्याची शक्यता आहे. साधारणपणे ऑक्टोबरमध्ये या लसीचा वापर सुरू केला जाईल. या लसीची चाचणी सहा ते १२ आठवडय़ांची मुले व पाच ते १७ महिन्यांची मुले अशा दोन गटांत घेण्यात आली. त्यांना सुरुवातीला तिमाही लस देण्यात आली व नंतर १८ महिन्यांनी देण्यास आली. अगदी लहान बालकांमध्ये या लसीचा परिणाम कमी दिसला पण तीन वर्षांच्या मुलांपर्यंत रोगाचा धोका २६ टक्के कमी झाला. अगदी गंभीर स्वरूपाचा मलेरिया झालेल्यांमध्ये ही लस प्रभावी ठरलेली नाही. जरा जास्त वयाच्या लोकांमध्ये गंभीर स्वरूपाच्या मलेरियात ही लस व बूस्टर डोस यामुळे रोगापासून ३२ टक्के संरक्षण मिळाले आहे, लंडन स्कूल ऑफ हायजिनचे प्राध्यापक ब्रायन ग्रीनवूड यांनी सांगितले की, या लसीचे खरोखर फायदे आहेत.
आजाराचे बळी
*२०१३ मलेरियामुळे मृतांची संख्या ५,८४,०००
*सर्वात जास्त ९० टक्के  मृत्यू आफ्रिकेत
*मरण पावलेली पाच वर्षांखालील मुले – ७८ टक्के
*आफ्रिकेत दर वर्षी मरणाऱ्यांची संख्या ४३००००