जर जागतिक आरोग्य संघटनेकडून विहित दंडकांचे पालन होत असल्यास मोबाइल टॉवरद्वारे होणारा किरणोत्सर्ग हा आरोग्यास अपायकारक ठरणारा नाही आणि ‘प्रदूषक’ म्हणून चिंतेचा विषयही ठरत नाही, असा निर्वाळा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरणीय संरक्षणविषयक निर्णय घेणारी शिखर संस्था राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) दोहोंनी स्वतंत्रपणे दिलेल्या आदेशांद्वारे दिला आहे. राष्ट्रीय स्तरावरील या दोन सर्वोच्च पर्यावरणविषयक संस्थांनी या वादाच्या विषयावर अभिप्राय देऊन दूरसंचार विभागाची पाठराखण केली आहे. मोबाइल टॉवरशी निगडित समस्या नोंदविण्यासाठी दूरसंचार विभागाची टेलिकॉम एन्फोर्समेंट अँड रिसोर्स मॉनिटरिंग (टीईआरएम) हा विभाग तयार करण्यात आला असून, या समस्या हाताळण्यास हा विभाग पुरेसा समर्थ असल्याचे या आदेशातून स्पष्ट होते.