तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मानवाने खूप मोठी मजल मारली असली तरी, मानवी मनात सुरू असलेल्या घडामोडींचा अंदाज लावणे आजसुद्धा तंत्रज्ञानासमोरील मोठे आव्हान आहे. मात्र, आता स्मार्टफोनवरील ‘स्टुडंट लाईफ अॅप्लिकेशन’च्या माध्यमातून ही गोष्ट साध्य होणार आहे. तुमचा स्मार्टफोन आता तुम्ही निराश आहात, तणावाखाली आहात किंवा तुमच्या मनात एकटेपणाची भावना दाटून आली आहे, अशा निरनिराळ्या मनस्थितीची माहिती देणार आहे. ‘स्टुडंट लाईफ अॅप्लिकेशन’ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती आणि वर्तणूकीचीसुद्धा माहिती देणार आहे.  
विद्यार्थ्यांच्या मनातील आनंद, तणाव, निराशा आणि एकटेपणाच्या भावनेचा त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होणाऱ्या परिणामाची तुलना करण्यासाठी हे अॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. मात्र, या अॅप्लिकेशनचा वापर करून मानसिक स्वास्थ्य, एखाद्या कामात व्यत्यय येण्याचे कारण असलेल्या मनस्थितीचे निरीक्षण करून नोकरदार वर्गही आपली कार्यक्षमता वाढवू शकतो.
‘स्टुडंट लाईफ अॅप्लिकेशन’चे वैशिष्ट्य म्हणेज हे अॅप्लिकेशन दिवसाचे २४ तास तुमच्या मानसिक स्थितीचे निरीक्षण करू शकते. यामुळे मानवी मनस्थितीच्या मुल्यांकनासंदर्भातील प्रक्रियेला नवी दिशा प्राप्त झाली आहे. ही अतिशय महत्त्वाची आणि उत्साहवर्धक बाब असल्याचे वॉशिंग्टनमधील डार्टमाऊथ महाविद्यालयामधील संगणकीय विज्ञान विषयाचे प्राध्यापक अँड्य्रू कॅम्पबेल यांनी सांगितले. एखादा विद्यार्थी दिवसभरात किती वेळ झोपतो, किती काळ संभाषणात व्यस्त असतो, शारीरिक हालचाल, तणाव, सकारात्मक वृत्ती, खाण्याच्या पद्धती अशा घटकांचे मुल्यमापन  हे अॅप्लिकेशन करणार आहे.