ग्राहकांना आता थेटपणे त्यांच्या मोबाईलवर इंटरनेटसेवा मिळविण्याचा किंवा नाकारण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. अनेकदा ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवरील इंटरनेट सेवा बंद करण्यासाठी संबंधित कंपनीला हजारदा विनवणी करावी लागते. आपल्याला कंपनीची इंटरनेटसेवा नको आहे, असे सांगूनही कंपन्या त्यासंबंधी टाळाटाळ करतात. मात्र, यापुढे ग्राहक १९२५ या क्रमांकावर कॉल करून किंवा एसएमएस पाठवून थेटपणे त्यांचा निर्णय अंमलात आणू शकतात. पुढील महिन्यापासून मोबाईल ग्राहकांसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आपला महसूल वाढविण्यासाठी इंटरनेटसेवा सुरू किंवा बंद करण्यात मोबाईल ऑपरेटर्स दिरंगाई करत असल्याच्या अनेक तक्रारी गेल्या काही दिवसांत ट्रायकडे आल्या होत्या. त्यामुळेच शनिवारी ट्रायकडून सर्व ऑपरेटर्सना १ सप्टेंबरपासून आपापल्या ग्राहकांना मोबाईल सेवा सुरू किंवा खंडित करण्यासाठी १९२५ या टोल फ्री क्रमांकाची आणि एसएमएसची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आता ग्राहक मोबाईलवर इंटरनेट सुरू किंवा बंद करण्यासाठी अनुक्रमे ‘START’ आणि ‘STOP’ पर्याय निवडू शकतील. त्यानंतर ग्राहकांना तत्काळ त्यासंबंधीची माहिती पुरविण्याचे आदेशही ट्रायकडून मोबाईल ऑपरेटर्सना देण्यात आले आहेत. या सेवेसाठी ग्राहकांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.