बदलत्या जीवनशैलीमुळे समाजात दिवसेंदिवस रक्तदाबाचे प्रमाण वाढत असून ब्रेन हॅमरेज आणि हृदयविकाराचा जास्त धोका आहे. तसेच किडन्या निकामी होण्यासही रक्तदाब कारणीभूत ठरत आहे त्यामुळे चांगल्या आणि सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम आणि आहार वेळोच्यावेळी घ्यावा, असे आवाहन नेफ्रोलॉजिस्ट डॉ. धनंजय उखळकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
जागतिक उच्च रक्तदाब दिनाच्या निमित्ताने सिप्लातर्फे रक्तदाबाच्या जनजागृतीविषयी माहिती देण्यात आली. डॉ. उखळकर म्हणाले, दैनंदिन काम किंवा कार्यालयात काम करताना रक्तदाब वाढत असला तरी आपल्याला काही कळत नाही. कधी घाम सुटतो आणि जीव घाबरल्यासारखे होते. त्यावेळी काहीतरी झाले याची जाणीव होते आणि त्यानंतर डॉक्टरकडे जात असतो. रक्तदाबाकडे आपण लक्ष देत नाही. त्यामुळे अनेकदा धोका निर्माण होऊ शकतो. वारंवार रक्तदाब तपासणे गरजेचे आहे. त्यासाठी फार वेळ द्यावा लागत नाही. मात्र, आपण दुर्लक्ष करीत असतो आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात. सिंगापूरचे उदाहरण देताना डॉ. उखळकर म्हणाले, सिग्नलवर वाहन थांबताच तेथील तरुणी रक्तदाब तपासतात. तपासणीत रक्तदाब वाढल्याचे दिसताच त्या तरुणी रुग्णालयाचा पत्ता देऊन तपासणी करण्यास सांगतात. भारतात मात्र अशा पद्धतीची प्रक्रिया नाही. उच्च रक्तदाबाची समाजात जागृती केली जात रक्तदाब वाढल्यास अनेकदा किडनी कामातून जाण्याची शक्यता असते. किडनीचा आजार होणे याला जेनॅटिक कारणासह बदलती जीवनशैली ही कारणीभूत आहे. जेवनात मिठाचे जास्त प्रमाण असल्यामुळे रक्तदाब वाढतो. याशिवाय जसजसे वय वाढते तसा रक्तदाबाचा त्रास होतो. जेवणामध्ये मिठाचे प्रमाण कमी केले तर रक्तदाबाचा त्रास कमी होतो. रक्तदाब वाढल्यानंतर किडनीच्या आजाराने होणारे मृत्यूचे प्रमाण १६ टक्के, हृदयविकाराचे प्रमाण १२ टक्के असल्याचे डॉ. उखळकर म्हणाले. या सर्व आजारापासून किंबहुना मृत्यूपासून वाचायचे असल्यास वेळ काढून वारंवार रक्तदाबाची तपासणी करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
हृदयविकारतज्ज्ञ डॉ. नितीन देशपांडे म्हणाले, सध्या प्रत्येकाच्या जीवनात कुठल्या ना कुठल्या कारणावरून ताणतणाव वाढतो आहे. पूर्वी माणसांचा चालण्यावर जास्त भर होता. मात्र, आता साधने उपलब्ध झाल्यामुळे पायी चालणे बंद झाले आहे. त्यामुळे शरीराचे आजार वाढले आहेत. शहराच्या नागरिकरणामुळे माणसाची ताकद कमी होत आहे. पायी चालणे बंद झाल्यामुळे रक्तदाब, मधुमेह, तणाव आदी आजार शरीरात घर करून बसले आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात प्रत्येकजण व्यस्त असला तरी आरोग्य सुदृढ राहावे यासाठी प्रत्येकाने व्यायामासाठी वेळ द्यावा आणि बदलेली जीवनशैली रुळावर आणावी, असे आवाहन डॉ. देशपांडे यांनी केले. यावेळी डॉ. अश्विनी उखळकर आणि डॉ. अंजनकर यांनी किडनी आणि आहारासंबंधी माहिती दिली.