येत्या दोनशे वर्षांत माणूस व यंत्र एकमेकात विलीन होऊन ते सायबोर्ग बनतील व नंतर अनंत काळ जगतील, असा अंदाज हिब्रू विद्यापीठाचे प्रा. युवाल नोहा हरारी यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मते श्रीमंत व्यक्ती यंत्रांच्या मदतीने स्वत:ला अमर करण्याचा प्रयत्न करतील. जीवन-मृत्यूच्या चक्रावर विजय मिळवतील. माणसाचे असमाधानच त्याला यंत्राशी एकजीव होण्यात प्रवृत्त करील व सायबोर्ग तंत्रज्ञानाने ते शक्य होईल, सध्याही काही सायबोर्ग व्यक्ती जगात आहेत. ज्यांच्या शरीरात यंत्रे बसलेली आहेत, त्यांच्या मदतीने त्यांची सर्व कार्ये चालतात. सध्याचा माणूस म्हणजे होमो सेपिएन्स हा दोनशे वर्षांनी यांत्रिकतेच्या मदतीने अमर होईल किंवा जैविक दुरुस्त्या, जनुकीय दुरुस्त्या करून अमर होईल. त्यात सायबोर्गच्या रूपानेही तो अमर होऊ शकतो कारण त्यात काही भाग नैसर्गिक व काही यांत्रिक असतील, असे हरारी यांनी ‘द टेलिग्राफ’ला सांगितले. जीवन अस्तित्वात आल्यानंतर जीवशास्त्रात सायबोर्ग तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. खरे सांगायचे तर गेल्या चार अब्ज वर्षांत जीवशास्त्रात काहीही बदल झाला नाही पण आता यापुढची माणसे आपल्यापेक्षा वेगळी असतील. जसे आता आपण चिंपाझीपासून वेगळे व प्रगत आहोत.हरारी यांनी असा दावा केला, की धर्मापासून दूर जाण्याने मानववंशात बदल होईल, सिलिकॉन व्हॅली हे त्याचे उदाहरण आहे कारण तेथील लोकांना धर्म महत्त्वाचा वाटत नाही. तंत्रज्ञान आपले सगळे प्रश्न सोडवील असा त्यांचा विश्वास आहे. अनेक कंपन्यांनी माणूस व यंत्रे यांना विलीन करण्याच्या योजना आखल्या आहेत. याची मर्यादा एक असेल ती म्हणजे श्रीमंत लोकच असे करू शकतील.
सायबोर्ग केविन वॉरविक
इंग्लंडमधील द युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगचे प्राध्यापक केविन वॉरविक हे जगातील पहिले सायबोर्ग ठरले.