spring-rolls-main‘स्प्रिंग रोल’ हा प्रसिध्द चायनीज स्नॅक्स प्रकार भारतात आवडीने खाल्ला जातो. यात नुडल्स घातल्यास त्याची लज्जत आजूनच वाढते. जाणून घ्या ‘नुडल्स स्प्रिंग रोल’ची रेसेपी.

साहित्य

बाहेरील आवरण

१ कप मैदा, पाव चमचा मीठ, २ चमचे तेल

सारण

१ कप उकळलेले (बॉईल) नुडल्स, पाव कप बारीक तुकडे केलेले पनीर, अर्धा कप चिरलेली कोबी, पाव कप हिरवा मटार, पाव कप चिरलेली भोपळी मिर्ची, २ ते ३ चमचे कोथिंबीर, १ ते २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिर्च्या, अर्धा चमचा अल पेस्ट, १ चमचा विनेगर अथवा लिंबाचा रस, १ चमचा सोया सॉस, पाव चमचा काळी मिरपूड, चविनूसार मीठ, तेल – सारण बनविण्यासाठी आणि ‘स्प्रिंग रोल’ तळण्यासाठी

 

कृती
एका भांड्यात मैदा घ्या. त्यात तेल आणि मीठ घाला. थोडे थोडे कोमट पाणी घालून चांगले मळून घ्या. मळून झालेला मैद्याचा गोळा व्यवस्थित सेट होण्यासाठी १० ते १५ मिनिटे बाजूला सारून ठेवा.

सारणाची कृती

कढईत एक चमचा तेल घालून गरम करून घ्या. यात आल पेस्ट, हिरवी मिर्ची घालून थोड्यावेळ ढवळा. आता हिरवा मटार घालून पुन्हा दोन मिनिटासाठी ढवळा, भोपळी मिर्ची, कोबी घालून एक ते दीड मिनिटे ढवळा. पनीर, मीठ, काळी मीरपूड, नुडल्स, सोया सॉस, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून चांगले एकत्र करून काही वेळासाठी व्यव्स्थित ढवळा. तयार झालेले सारण एका भांड्यात काढून घ्या.

spring1

मैद्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. (साधारण १४ गोळे होतील)

एक गोळा घेऊन सुक्या मैद्याचा वापर करून ५ ते ६ इंचाच्या आकाराची गोल पातळ पुरी लाटून घ्या. ही पूरी एका प्लेटमध्ये काढून घ्या. अशाचप्रकारे अजून एक पूरी लाटून घ्या. आता या पूरीवर अर्धा चमचा तेल पसरवून घ्या. अधी तयार केलेली पूरी या पूरीवर ठेवा. हाताने हळूवार दाब देऊन, पुन्हा कडेने लाटून घ्या. ८ ते १० इंचाच्या आकाराची पूरी बनवा. थोडासा गरम असलेल्या तव्यावर ही पूरी दोन्ही बाजूंनी थोडी भाजून घ्या. एका वेळी दोन पूऱ्या तयार होतात. अशाप्रकारे सर्व पूऱ्या करून घ्या.

spring2

spring3

‘स्प्रिंग रोल’ची कृती

सारण आणि आवरण तयार आहे. रोल चिकटविण्यासाठी अर्धा चमचा मैद्याचे घट्ट बॅटर करून घ्या. मगाशी केलेले पूरीचे आवरण एकमेकांपासून वेगळे करून दोन्ही आवरणांची आतली बाजू वर ठेवा. एक आवरण घेऊन यावर दोन चमचे सारण घाला. सारण व्यवस्थित पसरवून घ्या. सारण पसरवताना आवरणाच्या कडा मोकळ्या ठेवा. प्रथम वरच्या बाजूने गुंडाळून घेऊन थोड्याश्या ‘मैदा बॅटर’ने चिकटवून घ्या. मग उजव्या आणि डाव्या बोजूच्या कडा दुमडून रोल करून बाजूनेदेखील चिकटवून घ्या. रोलचा शेवटचा भागदेखील व्यवस्थित चिकटवून घ्या. अशाप्रकारे सर्व रोल गुंडाळून प्लेटमध्ये ठेवा.

spring4

शॅलो फ्राय ‘स्प्रिंग रोल’

एका पसरट भांड्यात दोन चमचे तेल घेऊन गॅसवर गरम करत ठेवा. तीन ते चार रोल अथवा शक्य असतील तितके रोल भांड्यात घालून परतून करून घ्या. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने गोल्डन-ब्राऊन हेईपर्यंत परतून घ्या. परतलेले रोल एका प्लेटमध्ये टिशू पेपरवर काढून घ्या. अशाप्रकारे सर्व रोल परतून घ्या.

spring7

अथवा

डीप फ्राय ‘स्प्रिंग रोल’

‘स्प्रिंग रोल’ डीप फ्राय करण्यासाठी एका भांड्यात तेल घ्या. तेल मध्यम गरम होताच यात तीन ते चार अथवा मावतील तेव्हढे रोल भांड्यात घालून मध्यम आचेवर सर्व बाजूने गोल्डन-ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. तयार झालेले ‘स्प्रिंग रोल’ टिशू पेपरवर काढून घ्या. अशाप्रकारे सर्व ‘स्प्रिंग रोल’ डीप फ्राय करून घ्या.
डीप फ्राय अथवा शॅलो फ्राय केलेले गरमागरम ‘स्प्रिंग रोल’ हिरव्या चटणीबरोबर अथवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.

अन्य

‘नुडल्स स्प्रिंग रोल’ ओव्हनमध्ये बेक करूनदेखील तयार करता येऊ शकतात. यासाठी, ओव्हन २०० डिग्री सेंन्टिग्रेडला प्रिहीट करून घ्या. रोल थोड्याथोड्या अंतरावर बेकिंग ट्रेवर ठेवून, ट्रे ओव्हनमध्ये ठेवा. ओव्हन २०० डिग्री सेंन्टिग्रेडला १० मिनिटासाठी सेट करून ‘स्प्रिंग रोल’ सर्व बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बेक करून घ्या. असं करत असताना मधून मधून लक्ष ठेवा.
(पाककृती – निशा मधुलिका)