मद्याचे सेवन करणाऱ्या स्त्रियांच्याबाबतीत आत्महत्येचा धोका अधिक असल्याचे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. विशेष करून मद्य पिणाऱ्या ज्या महिलांना दिवसा थकवा येतो किंवा निद्रानाशासारख्या समस्या जाणवतात, त्यांच्यादृष्टीने ही बाब गंभीर आहे.
अल्कोहोल आणि आत्महत्या यांचा परस्परसंबंध असून निद्रेच्या विकारांमुळे हा धोका अधिक बळावतो, असे ‘मिसिसीपी’ विद्यापीठातील शास्त्रत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे मद्याचे सेवन करणाऱ्या महिलांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी सर्वप्रथम त्यांच्या निद्राविकारांवर उपचार झाले पाहिजेत. या सगळ्याचा परस्परसंबंध नीट समजून घेऊन आत्महत्येचा धोका वाढवणाऱ्या घटकांचा व्यवस्थित अभ्यास केल्यास हे सर्व टाळता येऊ शकते. अमेरिकेतील ३७५ विद्यार्थ्यांनी या संशोधनात भाग घेतला होता. ज्यामध्ये मद्याचे सेवन करणाऱ्यांना निद्रानाश, झोपेत पडणाऱ्या स्वप्नांबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला.