आजची तरूण पिढी लग्नाच्याबाबतीत जुन्या परंपरा आणि पूर्वापार चालत आलेल्या सामाजिक चालीरितींपलीकडे जाऊन विचार करत असल्याचे, एका सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहे. भारतामधील आजच्या अनेक तरूण-तरूणींना लग्नानंतर आपल्या जोडीदाराबरोबर स्वतंत्र संसार थाटावासा वाटत असल्याची, मुख्य बाब या सर्वेक्षणातून निदर्शनास आली. देशातील अविवाहित युवक-युवतींची विचार करण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी ‘शादी डॉट कॉम’ या आघाडीच्या मॅर्टिमोनिअल संकेतस्थळाने हे सर्वेक्षण केले होते. यामध्ये २४ ते ३४ वयोगटातील ४,६१७ स्त्रिया आणि ३,९५२ पुरूष अशी ८,५०० जणांची मते विचारात घेण्यात आली होती. यामध्ये महिलांना तुम्हाला लग्नानंतर कुठे राहायला आवडेल, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर ६४.१ टक्के महिलांनी लग्नानंतर नवऱ्याबरोबर स्वतंत्र राहायला आवडेल, असे सांगितले. तर, २९.६ टक्के मुली या नवऱ्याच्या कुटुंबियांबरोबर राहण्यास तयार असून ६.३ टक्के मुलींनी मात्र लग्नानंतरही स्वत:च्या आई-वडिलांबरोबरच राहायला आवडेल, असे सांगितले.
हाच प्रश्न जेव्हा तरूणांना विचारण्यात आला तेव्हा ४३.९ टक्के पुरूषांनी स्वत:चा वेगळा संसार थाटायला आवडेल, असे उत्तर दिले. मात्र, ५४.३ टक्के तरूणांना लग्नानंतर स्वत:च्या पालकांबरोबरच रहायचे आहे. तर फक्त १.८ टक्के पुरूषांनी मुलीच्या कुटुंबियांबरोबर राहण्याची तयारी दाखविली.
लग्नानंतर तुमचा पती तुमच्या पालकांबरोबर रहायला आल्यास आवडेल का, असा प्रश्नही या सर्वेक्षणादरम्यान तरूणींना विचारण्यात आला होता. यावर २७.३ टक्के मुलींनी आपल्याला हा पर्याय आवडेल असे सांगितले. तर, ३०.१ टक्के मुलींनी या प्रस्तावाला नकार दिला. मात्र, ४२.६ टक्के मुली स्वत:च्या नवऱ्याला घरजावई करून घेण्यासंदर्भात साशंक दिसल्या. त्यांनी हा पर्याय कदाचित आवडेल, असे उत्तर दिले.
जेव्हा पुरूषांना घरजावई होण्यासंदर्भात विचारण्यात आले तेव्हा, यासाठी केवळ ४.७ टक्के तरूण तयार झाले. ७३.५ टक्के तरूणांनी या प्रस्तावाला नकार दिला. तर २१.८ टक्के तरूणांनी विचार करायला हरकत नाही असे उत्तर दिले.
शादी डॉट कॉमच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाला योग्य जोडीदार मिळावा, यासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे भारतातील तरूणांची ही बदललेली मानसिकता पाहणे आमच्यासाठी वेगळा अनुभव असल्याचे शादी डॉट कॉमचे सीओओ गौरव रक्षित यांनी सांगितले.