‘‘वासातिक्ता कटु। शीता कासघ्नी रक्तपित्तजित्।

कामलाकफपित्तास्त्र ज्वर श्वासक्षयापहा॥’’ रा. नि.

वासक, आटरुष अशा विविध नावांनी अडुळसा ओळखला जातो. अडुळशाचे क्षुप सर्वत्र होते. यास हिवाळ्यांत पांढरी फुले येतात. याच्या पानावर ठिपके नसतात. फांद्यांची पेरे फुगलेली असतात; पाने सुमारे फूटभर लांब व चार बोटे रुंद असून टोकदार असतात. याची ताजी पाने, फुले व मुळे औषधात वापरतात. पाने जून पण हिरवी वापरावीत. आपल्या आसपास मोकळी जागा असल्यास, आपण आवर्जून अडुळशाच्या बोटभर जाडीच्या व सहा इंच लांबीच्या काडय़ा लावाव्यात. त्याची उगवण चांगली असते. विशेषत: पावसाळ्यात त्याची वाढ भरपूर होते. आसपास डासांचे प्रमाण कमी राहते. अडुळशाच्या पानांना गुरे अजिबात तोंड लावत नाहीत हा एक विशेष फायदा आहे. भारतात चार हजार फूट उंचीपर्यंत अडुळसा सर्वत्र सहज उगवतो.

अडुळशाच्या फुलात एक गोडसर मध असतो. त्याकरिता भुंगे आवर्जून फुलांच्या आतमध्ये जाऊन मध खात असतात. मग असा भुंग्यांना आवडणारा अडुळसा तुम्हाला अनेकानेक विकारांत सत्वर गुण देईल यात नवल ते काय?

‘वासायां विद्यमानायामाशायां जीवितस्य च।

रक्तपित्ती क्षयी कासी किमर्थमवसीदति॥’

अडुळशाच्या पानात व सालीत वासकिन नावाचे द्रव्य असते. वासकिन चिंचाम्लाशी मिसळते. वासकिनमुळे सर्व हलके जीवजंतू, बुरशीजन्य किडे लवकरात लवकर नष्ट होतात. त्यांची वाढ अजिबात खुंटते.

अडुळसा उत्कृष्ट उत्तेजक, श्लेष्मनि:सारक व संकोचविकास प्रतिबंधक आहे. याची क्रिया एपिकॅकुआनासारखी होत असते. पाने, फुले व मूळ यांच्या धर्मात थोडा फरक पडतो. फुले तिक्त, कटू, ज्वरघ्न, मूत्रजनन, रक्ताची उष्णता कमी करणारी आहेत. फुलांचा ज्वरघ्न धर्म चढ-उतार होणाऱ्या ज्वरात चांगला नजरेस येतो. मूळ ज्वरघ्न, मूत्रजनन, श्लेष्मानिस्सारक, नियतकालिक ज्वरप्रतिबंधक, कृमिघ्न आहे. पाने व मुळे यापेक्षा फुलात संकोचविकास प्रतिबंधक धर्म जास्त आहे. पानांपेक्षा मुळात श्लेष्मनि:सारक धर्म जास्त आहे. पानांची क्रिया त्वचेवर विशेष होत असते. म्हणून पाने स्वेदजनन आहेत. कफ पातळ करणे व खोकल्याचे झटके कमी करणे हे दोन अडुळशाचे प्रधानधर्म आहेत.

माझ्याकडे वर्षांनुवर्षे आपली लहानगी मुले घेऊन भांबावलेले पालक येत असतात. ‘आमच्या बाळाचा खोकला कफ कशानेही थांबत नाही; त्याला स्ट्राँग औषध चालत नाही.’ असे ऐकल्यानंतर मी माझ्या हाताशी असलेल्या वासापाक या अल्पमोली पण झटपट गुण देणाऱ्या किंवा कफमिक्श्चर या सायरपचा वापर करावयास सांगतो. त्यासोबत ज्वरांकुश व दमागोळी आवर्जून देतो. या दोन औषधांखेरीज खोकला काढा या महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणाऱ्या औषधातील अडुळसा हे एक प्रमुख घटकद्रव्य आहे. कृश व्यक्तींना विविध प्राणवह स्रोतसांच्या विकारामुळे काही वेळा स्ट्राँग औषधे दिली जातात. त्या औषधांची रिअ‍ॅक्शन येते. अशा वेळेस अडुळसा स्वरसापासून सिद्ध केलेले वासाघृत अवश्य वापरावे. अडुळसा हा एकाच वेळेला कफनि:सारण व रक्तवर्धनाचे काम करतो. एक काळ खेडोपाडी चिलमीमध्ये अडुळसा पानांचे चूर्ण मिसळून चिलीम ओढण्याचा प्रघात होता. असो. इति वासा पुराण!