17 October 2017

News Flash

पिंपळपान : बिब्बा

औषधात बिपर्टी, गोडांब्या व बिब्बे वापरतात.

वैद्य प. य. वैद्य खडीवाले | Updated: June 15, 2017 12:48 AM

‘‘भल्लातकानि तीक्ष्णानि

पाकीन्यग्निसमानि च।

भवन्त्यमृतकल्पानि प्रयुक्तानि यथाविधि।।’’

‘‘कफजो न स रोगोऽस्ति न

विबन्धोऽस्ति कश्चन।

यं न भल्लातकं हन्याच्छीघ्रमाग्नि बलप्रदम्।।’’

तुम्ही-आम्ही सामान्य लोक सुवर्ण, चांदी, वंग व आवळा, आस्कंद, शतावरी अशा द्रव्यांना खूप गुणवान रसायन म्हणून मानाचे स्थान देतो, पण प्राचीन काळापासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विशेषत: कोकणात विविध रोगांसाठी तात्काळ गुण देणारे बिब्ब्यासारखे दुसरे रसायन, औषध नाही, अशी सर्वाचीच परम श्रद्धा होती. हा मोठा वृक्ष आहे. पाने दडस व मोठी असतात. बिब्ब्याच्या फळाचा देठ मोठा होऊन काजूच्या बोंडाप्रमाणे दिसतो. सुकलेल्या बोंडास बिबुटय़ा किंवा बिंपटी म्हणतात. बिब्ब्यातील गरास गोडांब्या म्हणतात. औषधात बिपर्टी, गोडांब्या व बिब्बे वापरतात.

बिब्बा, भल्लातक, आरूषकर (संस्कृत), भिलावा (हिंदी), हब्बुल्कल्ब (फारसी) अशा विविध नावांनी ओळखला जातो. बिब्ब्याच्या वरच्या भागात अत्यंत दाहक पण विलक्षण गुणकारी तेल असते, ते खूप दाहजनक आहे. बिब्ब्याच्या आतल्या बीमध्ये असलेल्या गोडांबीत खूप पौष्टिक द्रव्ये आहेत. त्याच्या वापराने पुरुषांचे वीर्य चटकन वाढते. बिब्बा हा कटाक्षाने उष्ण प्रकृतीकरिता कदापि वापरू नये. जेव्हा नाइलाजाने बिब्बा किंवा बिब्बा घटकद्रव्य असलेले औषध वापरायचे असेल, त्यांनी आदल्या दिवशी, त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी जेवणातील मीठ संपूर्णपणे टाळावे, म्हणजे बिब्ब्यातील दाहक तेलाचे दुष्परिणाम होत नाहीत, त्रास होत नाहीत. बिब्ब्याचे औषध घेत असताना कटाक्षाने तूप योग्य प्रमाणात घेतले तर बिब्बा चांगला मानवतो.

बिब्बा दाभणास टोचून गोडय़ा तेलाच्या दिव्यावर धरल्याने जी पेटलेल्या तेलांची टिपे पडतात, त्यास बिब्ब्याची फुले म्हणतात. ही टिपे दुधात धरून हळद व खडीसाखर मिसळून पिण्यास देतात. प्रारंभी एक फूल व मग दोन-चार दिवसांनी दोन फुले रात्री निजताना देतात. हा प्रकार फुफ्फुसाच्याा रोगात देतात. दम्यात याने फार चांगला गुण येतो. थोर शास्त्रकारांनी दुर्धर कफविकाराकरिता वर्धमान बिब्ब्याचा आवर्जून प्रयोग सांगितला आहे. हा प्रयोग ७ ते २१ दिवसांपर्यंत आपल्या ताकदीप्रमाणे करावा. पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दोन याप्रमाणे तिसऱ्या दिवशी तीन, चौथ्या दिवशी चार आणि पुन्हा उतरत्या क्रमाने चार, तीन, दोन, एक असा प्रयोग हिवाळ्यात करावा. चांगले पोसलेले बिब्बे ग्रीष्म ऋतूत धान्याच्या राशीत पुरून ठेवावे. हेमंत ऋतूत मधुर स्निग्ध व थंड पदार्थ खाऊन शरीर सक्षम झाल्यावर वरील प्रमाणे भल्लातक रसायन प्रयोग करावा.

बिब्ब्याचे तेल पातालयंत्राच्या साहाय्याने जमिनीत मडके पुरून काळजीपूर्वक काढावे, त्याकरिता मंदाग्नीच वापरावा. त्याकरिता गोवऱ्यांची मदत घ्यावी. आमच्या लहानपणी माझे वडील आम्हा मुलांना पावसाळ्यात कटाक्षाने एका रविवारी तरी बिब्ब्याचे शेवते देत असे. एक पुष्ट बिब्बा कदापि पोट बिघडू देत नसे.

एखाद्या रुग्णाला डोक्यात चाई झाल्यास त्या भागाच्या बाजूला सभोवताली भरपूर तूप लावून चाई असलेल्या भागास बिब्ब्याचे तेल लावल्यास दोन ते चार दिवसांत खात्रीने नवीन केस येतात. ज्या मंडळींना शौचास चिकट होत असेल, त्यांनी मिठाचे पथ्यपाणी पाळून भल्लातकहरीतकी चूर्ण रात्री घ्यावे. ज्यांना कायम दूषित पाणी नाइलाजाने प्यावे लागते, त्यांनी भोजनोत्तर भल्लातकासव घ्यावे. पावसाळय़ात खराब पाणी नाइलाजाने प्यावे लागल्यास बिब्बा हे घटकद्रव्य असलेल्या संजीवनी गोळ्या भोजनोत्तर घ्याव्यात.

First Published on June 15, 2017 12:48 am

Web Title: article on bibba