‘मी हीसुद्धा नोकरी सोडणार असं दिसतंय.. माझे साहेब माझ्यावर जी टीका करतात, ती मी नाही सहन करू शकत. कोण एवढं ऐकून घेईल? मागच्या नोकरीतही हेच झालं म्हणून माझी नोकरी गेली. तेही साहेब मला खूप बोलायचे. मलाच ही अशी माणसं कशी भेटतात कोण जाणे. माझे पूर्वीचे साहेब माझ्या कामातल्या चुका काढायचे. चुकलेलं दाखवून देण्यात त्यांना मोठेपणा वाटायचा. आताचे साहेब तर कशावरूनही बोलतात. अगदी कपडे, बोलण्याची पद्धत, कामातल्या चुका तर झालंच. एकदा तर माझ्या दिसण्यावरून बोलले. आता माझं दिसणं माझ्या हातात आहे का? असं मी त्यांना विचारल्यावर – नीट राहत जा जरा. म्हणजे बरा दिसशील. हे मी का म्हणून सहन करायचं? मी त्यांना सरळ सांगणार आहे, तुम्हाला पटत नसेल तर मी सोडतो नोकरी. माझी आई म्हणते की तुला नोकरीची गरज आहे, साहेबांना नाही. ती मला असंही सांगते की, सारख्या नोकऱ्या बदलून प्रश्न कसा मिटेल? तिचं म्हणणं मी टीका सहन करायला शिकायला हवं. पण मला जे सहन होतंच नाही ते मी सहन कसं करू? माझं बरोबर असताना मी साहेबांचं ऐकून तरी का घेऊ?’

२८ वर्षांचा तरुण आपली कैफियत मांडत होता. त्याच्या भावनेबद्दल आदर बाळगूनही काही गोष्टी स्पष्टपणे दिसत होत्या. त्याला नोकरीची गरज होती. आहे त्या परिस्थितीत त्याने जुळवून घेणं आवश्यक होतं. हे करण्याच्या आड त्याचा अहंकार येत होता. अहंकाराची एक गंमत असते. त्याला ‘माझंच बरोबर आहे’ हे सांगून सांगून थकायला झालं की तो ‘आपल्याला किती त्रास होतोय’ हे सांगायला सुरुवात करतो. या मुलाची आई म्हणते त्याप्रमाणे त्याला टीका ‘सहन करायला शिकणं’ शक्य आहे का?

ही गोष्ट त्याला अशक्य वाटते कारण तो फक्त ‘चूक आणि बरोबर’ मध्ये अडकला आहे. पण त्याच्या ‘बरोबर’ असण्याच्या धारणेमुळे त्याला किती त्रास होतोय हे त्याच्या लक्षात येतच नाही, अशी परिस्थिती आहे. त्याचा स्वत:शी संवाद असा होत असणार – ‘माझी काहीही चूक नसताना मी का म्हणून ऐकून घ्यायचं? मी का म्हणून सहन करायचं? माझ्या साहेबांनी बदलायला हवं आहे, मी नाही. मी एक वेळ नोकरी सोडेन पण साहेबांचं ऐकून घेणार नाही. मोडेन पण वाकणार नाही.’ वगैरे, वगैरे.. या  स्वगताची तो पुन:पुन्हा उजळणी करतो आहे. त्यातून त्याचा त्रास वाढत चालला आहे.

सर्वात प्रथम त्याने ही वस्तुस्थिती स्वीकारायला हवी आहे की माझे साहेब माझ्यावर टीका करू शकतात. ‘ते असं करूच कसं शकतात?’ हा प्रश्न अप्रस्तुत आहे. साहेब टीका करतात ती जरी त्याच्यावर असली तरी ती त्यांच्या आतून आलेली आहे. त्यामुळे त्या टीकेमागच्या भावनेला, टीकेच्या शब्दांना सर्वस्वी ते जबाबदार आहेत. टीका करण्यासाठी तो निमित्त ठरतो आहे एवढंच. तो दुखावला जाणं  स्वाभाविक असलं तरी त्याने स्वत:चं संरक्षण करणं तेवढंच आवश्यक आहे. ते जेव्हा टीका करतात तेव्हा ‘ते टीका करताहेत, मला त्याच्याकडे थोडंसं अंतर ठेवून बघायला हवं,’ अशी भूमिका त्याने घेतली तर त्याची स्वसंरक्षणाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही.

साहेब जे बोलताहेत, त्यात काहीतरी तथ्य आहे का ते त्याला तपासून पाहता येईल. त्यांच्या बोलण्यात कदाचित थोडंसं तथ्य, थोडंसं सत्त्व असेलही. ते जर त्याने मान्य करून त्यानुसार त्याबाबतीत बदल केला तर त्याच्यात सुधारणा होईल. त्याने त्याचा आत्मविश्वास वाढेल. जे तथ्य नाही ते त्याने जाणीवपूर्वक फोलपटासारखं टाकून द्यायला हवं. हे आपण करू शकतो यामुळेही त्याचा आत्मविश्वास वाढेल. ते जे बोलताहेत त्यातलं सगळं मान्य करून स्वत:ला दोष देणे आणि ते बोलताहेत ते सगळं चूकच धरून स्वत:चा बचाव करू

पाहणं ही दोन्ही टोकं त्याने टाळायला हवीत. हवं ते घेऊन, नको ते टाळायला जर तो शिकला तर तो टीका ‘सहन करायला’ न शिकता टीका ‘स्वीकारायला’ शिकेल. ‘काय चूक- काय बरोबर’पेक्षासुद्धा ‘काय उपयोगी-  काय निरुपयोगी’, ‘सत्त्व कुठलं आणि फोलपटं कुठली’ हे ओळखणं महत्त्वाचं!

drmanoj2610@gmail.com