उत्सुकता, मित्रांसोबत असताना, सामाजिक दबावापोटी, तणाव घालवण्यासाठी, एकटेपणा, झोप उडाल्याने, वास्तवापासून दूर जाण्यासाठी किंवा सहज उपलब्ध असल्याने.. दारूचा एकच प्याला जवळ करण्यासाठी यातील एक कारणही पुरेसे ठरते. आता तर नवीन वर्षांचे स्वागत करण्याचे निमित्त साधून जंगी पाटर्य़ाचे बेत आखले गेले आहेत. या निमित्ताने आपणही दारू म्हणजे नेमके काय, दारूमधील अल्कोहोलचे प्रमाण व त्यामुळे शरीरावर होणारा नेमका परिणाम याची माहिती घ्यायला काय हरकत आहे?

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स
How Suryanamaskar and pranayama can help you fight spring allergies
तुम्हालाही वारंवार शिंका येतात का? रोज करा ‘हे’ दोन प्रभावी प्राणायाम अन् व्हा अ‍ॅलर्जी फ्री

hlt01

दारू म्हणजे काय?

दारूला रासायनिक भाषेत अल्कोहोल म्हटले जाते. कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन या अणूंनी तयार झालेले अल्कोहोलचे रेणू त्वरेने हवेत मिसळतात. कार्बन आणि हायड्रॉक्साइलच्या साखळ्यांच्या गुंतागुंतीवरून अल्कोहोलचे प्राथमिक व उच्च प्रकार पडतात. मिथेनॉल आणि इथेनॉल हे अल्कोहोलचे प्राथमिक प्रकार. इथेनॉल म्हणजे दारूत वापरले जाणारे अल्कोहोल. उच्च प्रकारातील अल्कोहोल हे इंधन, साठवणुकीसाठी किंवा परफ्युममध्ये वापरले जाते.

मद्यपेयांची बिअर, वाइन आणि स्पिरिट या तीन प्रकारांत विभागणी केली जाते आणि पेयांच्या प्रमाणानुसार ३ ते ४० टक्क्यांपर्यंत मद्याचे प्रमाण असते. बिअरमध्ये कमी प्रमाणात अल्कोहोल असले तरी बिअरचे किती कॅन घशाखाली उतरतात ते महत्त्वाचे. कॅनची संख्या जेवढी अधिक तेवढे अल्कोहोल शरीरात जाण्याचेही प्रमाण अधिक. कितीही कमी प्रमाणात घेतली तरी दारू ही सुरक्षित आहे असे कोणाला छातीठोकपणे सांगता येणार नाही, मात्र शरीरावर गंभीर परिणाम करणारे (हेवी ड्रिंक) दारूचे प्रमाण मात्र निश्चित करण्यात आले आहे. पुरुषांनी दिवसाला तीनहून अधिक व आठवडय़ात १४ युनिटपेक्षा अधिक तर स्त्रियांनी दिवसाला दोनहून अधिक व आठवडय़ाला १० ते १२ युनिटपेक्षा अधिक दारू पिणे जोखमीचे असते. हे युनिट मोजायचे समीकरणही आहे. अल्कोहोलचे टक्क्यातील प्रमाण गुणिले दारूचे मिलिमीटरमधील प्रमाण भागिले १००० म्हणजे युनिटची संख्या. उदा. १३.५ टक्के अल्कोहोल असलेली ७५० मिली वाइन ही १० युनिटएवढी असते. बिअरचे एक कॅन हे दोन युनिटचे असते.

थोडक्यात सांगायचे तर दारूच्या एका युनिटमध्ये दहा मिलिलिटर इथेनॉल असते. एका युनिटमधील दारूवर प्रक्रिया करण्यासाठी शरीराला एक तास लागतो. म्हणजेच एका तासानंतर या दारूचा अंश रक्तात राहत नाही. साधारणपणे बिअरचा एक कॅन रिचवण्यासाठी शरीराला दोन तास लागतात तर वाइनचा एक मोठा ग्लास (२५० मिमी) पचवण्यासाठी तीन तास वाट पाहावी लागते. अर्थात हे प्रमाण प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते.

दारू पचण्याची क्षमता खालील बाबींवर अवलंबून असते.

* वजन

* स्त्री-पुरुष

* वय

* चयापचय क्षमता

* सेवन केलेल्या अन्नाचे प्रमाण

*अल्कोहोलचा प्रकार व दर्जा

*घेत असलेली औषधे

*यकृत नीट काम करते आहे का?

*चयापचयाच्या क्रियेत मद्यामुळे यकृतातील चरबी वाढते.  सतत मद्य पोटात गेल्यामुळे यकृताची क्षमता कमी होते व त्यामुळे लिव्हर सिरॉयसिससारखी गंभीर स्थिती निर्माण होते.

* दारू पिण्याने शरीरातील आजाराची गुंतागुंत वाढते. दारूच्या चयापचयातून निर्माण होणाऱ्या रसायनांमधून अवयव निकामी होतात. हृदयविकार असणाऱ्यांनी दारूपासून दूरच राहावे. यकृताची समस्या असेल तर तातडीने दारू सोडा. दारूमध्ये मोठय़ा प्रमाणात कॅलरीज असल्याने मधुमेही लोकांचे वजन पटकन वाढते. दारूमुळे पोट पुढे येते. वाइनच्या एका ग्लासमध्ये चॉकलेटच्या मोठय़ा बारएवढय़ाच कॅलरी असतात. महत्त्वाचे म्हणजे दारूमुळे नैराश्यातही वाढ होते.

अल्कोहोलचे परिणाम

अल्कोहोलचे प्रमाण आणि व्यक्तीच्या शारीरिक प्रकृतीनुसार दारूचा परिणाम ठरतो.

* अस्पष्ट संवाद

* गुंगी येणे

*मळमळणे किंवा ओकारी येणे

* अतिसार

* डोकेदुखी

* श्वास घेण्यास अडथळा

* दृष्टी आणि ऐकण्यात गोंधळ

* आकलन आणि समन्वयात अडथळे

* दृष्टिदोष

* डोळ्यांपुढे अंधारी येणे : दारूच्या प्रभावाखाली असल्यामुळे व्यक्तीला त्या दरम्यान घडलेल्या घटना आठवत नाही.

दारूमुळे वागणुकीतील बदल किंवा परिणाम

व्हाइट वाइनचा एक ग्लास किंवा एक कॅन सौम्य बिअर (साधारण दोन युनिट)

* बडबड वाढते आणि ताण दूर होतो.

* आत्मविश्वास वाढतो.

*गाडी चालविण्याच्या क्षमतेत मात्र गडबड होते.

व्हाइट वाइनचे दोन ग्लास किंवा सौम्य बिअरचे दोन कॅन (साधारण ४ युनिट)

* रक्तप्रवाहाची गती वाढते.

* लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

*शरीरातील पाणी कमी होते. हँगओव्हरची सुरुवात.

व्हाइट वाइनचे तीन ग्लास किंवा सौम्य बीअरचे तीन कॅन (साधारण ६ युनिट)

*प्रतिक्रिया देण्याची गती मंदावते.

*यकृताला अधिक काम करावे लागते.

* कामवासना वाढण्याची शक्यता असते.

व्हाइट वाइनचे चार ग्लास किंवा सौम्य बिअर (साधारण ८ युनिट)

* मनाचा गोंधळ वाढतो.

*भावुकता वाढते.

*या पातळीवर कामवासना कमी होण्याची शक्यता असते.

हँगओव्हर कसा येतो?

दारू शरीरातील पाणी कमी करते. अल्कोहोल घेतल्यानंतर लघवी होणाच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे जितके अधिक अल्कोहोल घेतले जाते तितके पाणी मूत्रावाटे शरीराबाहेर जात असते. यामुळे शरीरात पाण्याचा अभाव जाणवतो. याचा परिणाम अल्कोहोल घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी दिसतो. डोके दुखणे, मळमळणे, अंगदुखी, पोटदुखी यासारखे परिणाम दिसतात. हा त्रास टाळण्यासाठी उपाशी पोटी दारू पिऊ नये. खाल्ल्यानंतरच दारू प्यावी. कारण अन्न अल्कोहोल शोषून घेते. त्याशिवाय गडद रंगाचे पेय पिणे टाळावे. यात रासायनिक द्रव्यांचा वापर करण्यात येतो आणि हँगओव्हरची तीव्रता वाढून रक्तवाहिन्यांना धोको संभवतो. दारू पीत असताना साधे पाणी पीत राहावे. काबरेनेटेड पेयांमुळे अल्कोहोल जलद गतीने शोषून घेतले जाते. झोपण्यापूर्वीही भरपूर पाणी प्यावे. तहानल्याची भावना होत असेल तर दुसऱ्या दिवशी येणारे हँगओव्हर वाढू शकते. हँगओव्हर कमी करण्यासाठी सकाळी एक पेग अल्कोहोल घ्यावे हा समज चुकीचा आहे. यातून हँगओव्हर कमी होत नाही तर चुकीची सवय लागते.

– डॉ. रेखा भातखंडे, जठरविकारतज्ज्ञ

gastro111@gmail.com