डॉ. अस्मिता सावे, आहारतज्ज्ञ

भारतीय खाद्यपद्धतीत रोजच्या आहारातून सर्व अन्नघटक पुरेशा प्रमाणात मिळतात. त्यामुळे शक्यतो सप्लिमेंट किंवा आहारातील पदार्थाची अदलाबदल करण्याची गरज नसते. काही वर्षांपूर्वी भरपूर व्यायाम करणारे, खेळाडूंमध्ये कृत्रिम जीवनसत्त्वे (सप्लिमेंट) घेण्याचे प्रमाण जास्त होते. मात्र आता विविध डाएटच्या नावाखाली सर्वसामान्यांमध्येही कृत्रिम जीवनसत्त्वांचा वापर वाढला आहे. दैनंदिन आहारात खनिजे, जीवनसत्त्वपूर्ण अन्न असेल तर कृत्रिम जीवनसत्त्वांची आवश्यकता भासत नाही.

Yoga for a healthy liver: Here are 3 asanas that work
यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर; जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत
tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ

कृत्रिम अन्नघटक म्हणजे काय?

प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला अन्नघटकांची आवश्यकता असते. जर हे अन्नघटक रोजच्या आहारातूनच मिळत नसतील तर मात्र वेगळ्या माध्यमातून हे अन्नघटक शरीराला पूरवणे गरजेचे ठरते. अशा वेळी हे अन्नघटक कृत्रिम स्वरूपात शरीराला पोहोचवले जातात. सध्या बाजारात हे कृत्रिम अन्नघटक पावडर, शेक (द्रव्य), औषधांच्या रूपात उपलब्ध आहे.

आपण खाल्लेल्या अन्नातील पोषक घटक लहान आतडय़ांमध्ये शोषून घेतले जातात व शरीरातील इतर अवयवांना पुरविले जातात. मात्र आजारपणात,  शस्त्रक्रिया झाल्यास किंवा लहान आतडय़ातील एखादा भाग निकामी झाल्यामुळे अन्नघटक शोषून घेण्यास अडथळा निर्माण होतो आणि ठरावीक अन्नघटक आपल्या आहारात असूनही शोषून घेतले जाऊ  शकत नाही. अशा वेळी डॉक्टरांकडून पर्यायी अन्नघटक किंवा कृत्रिम अन्नघटक घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र अनेक जण आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी या पर्यायी अन्नघटकांचा वापर करतात. वजन वाढवणे, वजन कमी करणे, स्नायू बळकट करणे यासाठीही कृत्रिम अन्नघटक (सप्लिमेंट)घेतात. यामध्ये प्रथिनयुक्त पावडर, डाएट पिल्स किंवा मील रिप्लेसमेंट शेक हे पर्याय दिले जातात. हे अन्नघटक काही वेळा आरोग्यासाठी फायद्याचे असले तरी याच्या अतिरिक्त वापरामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ  शकतो. अनेकदा डॉक्टर हाडे ठिसूळ झाली असल्यास कॅल्शिअम आणि अ‍ॅनिमिया झाल्यास लोह या जीवनसत्त्वांसाठी कृत्रिम अन्नघटक (सप्लिमेंट) देतात. मात्र यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.

कृत्रिम अन्नघटकाचे दुष्परिणाम

उच्च रक्तदाब, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिडेपणा येणे, निद्रानाश, अतिसार, गुदद्वारावाटे रक्तस्राव, मूत्रपिंड व यकृताचे आजार उद्भवतात. काही संशोधनानुसार कृत्रिम अन्नघटकांच्या अतिरिक्त वापरामुळे काही औषधांच्या उपयुक्ततेत आडकाठी निर्माण होते. उदा. अ‍ॅन्टीऑक्सिडंट सप्लिमेंट म्हणून घेण्यात येणारे जीवनसत्त्व ‘क’ आणि ‘ई’ हे कर्करोगावरील किमोथेरपीच्या परिणामात अडथळा निर्माण करू शकतात.

जीवनसत्त्व ‘क’चे सप्लिमेंट रक्त पातळ करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या काही ठरावीक औषधांचे परिणाम कमी करू शकतात.

वजन वाढवण्यासाठी व स्नायू बळकटीसाठी प्रथिनयुक्त सप्लिमेंटचा वापर केला जातो. याच्या अतिवापराने डोकेदुखी, मळमळ, सतत तहान लागणे, अतिसार, भूक कमी होणे, थकवा असे दुष्परिणाम दिसून येतात.

२०१३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या इंटरनॅशनल स्कॉलरी रिसर्चमध्ये सप्लिमेंटच्या वापराबाबत काही घटक नमूद करण्यात आले आहे. यात दिल्याप्रमाणे शरीरातील प्रथिनांचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त झाले तर कॅल्शिअमचे प्रमाण कमी होऊ  लागते व हाडे ठिसूळ होणे, मूत्राद्वारे कॅल्शिअमचा निचरा होणे असे परिणाम दिसून येतात. यामुळे मूत्रपिंडावरील ताण वाढून मूत्रपिंडाचे आजार, मूतखडा आदी आजारांची लागण होते. या पावडर सप्लिमेंटमध्ये काही खनिजे शरीरासाठी घातक ठरू शकतात. उदा. कॅडमिअम, पारा.

कृत्रिम अन्नघटकातील काही खनिजे पचविण्यासाठी अवघड असतात. त्यातून पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण येतो. या सप्लिमेंटमध्ये मोठय़ा प्रमाणात साखर, कृत्रिम रंग, चवीसाठी विशिष्ट रसायने यांचा समावेश असतो.

अनेकदा यात अन्नघटक कमी व उष्मांक जास्त असतो. ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. परंतु शरीराला उपयुक्त असे काही मिळत नाही. याला एम्प्टी कॅलरीज फूड असे म्हटले जाते. सप्लिमेंट तयार करणाऱ्या कंपन्या या कृत्रिम अन्नघटकात नैसर्गिक अन्नघटकांचा वापर केल्याचा दावा करतात. मात्र कोणतेही नैसर्गिक अन्नघटक प्रक्रिया केल्याशिवाय अनेक महिने टिकू शकत नाहीत. हे अन्नघटक टिकून ठेवण्यासाठी अनेकदा रासायनिक प्रक्रिया करण्यात येते.

उपाययोजना

योग्य प्रमाणात व वेळेवर आहार घेतल्यास आपल्याकडील अन्नपदार्थातून शरीराला आवश्यक असलेले सर्व अन्नघटक मिळू शकतात. चौकस आहाराबरोबर शरीराला मुबलक पाण्याचीही गरज असते. याव्यतिरिक्त झोप, व्यायाम याची काळजी घेतल्यास आरोग्य चांगले राहते.

अन्नपदार्थातून मिळणारे जीवनसत्त्वे

  • कॅल्शिअम – दूध, दही, बदाम, भेंडी, चीज
  • फॉलिक अ‍ॅसिड – पालेभाज्या त्यातही पालक, संत्री, द्राक्ष, केळे, पपई, स्ट्रॉबेरी, कडधान्य, शेंगदाणे, वाटाणे
  • लोह – पालकसारख्या गडद हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा, शेवग्याच्या शेंगा, कडधान्य, काही ठरावीक मासे
  • जीवनसत्त्व ‘क’ – आंबट फळे, संत्रे, मोसंबी, स्ट्रॉबेरी, पालेभाज्या, टॉमेटो.
  • फॅटी अ‍ॅसिड – अक्रोड, सोयाबीन
  • जीवनसत्त्वे ‘अ’ – रताळे, पालेभाज्या, गाजर, टोमॅटो
  • जीवनसत्त्वे ‘ब’ – अंडी, मासे, सोयाबीन, कडधान्य, बदाम, पालेभाज्या
  • जीवनसत्त्वे ‘ई’ – शेंदगाणे, बदाम, सूर्यफुलाच्या बिया, गव्हाचा अंकुर, रताळे, पालेभाज्या
  • प्रथिने – दूध, दूधाचे पदार्थ. सोयाबीन, अंडी, मासे, मासांहारी पदार्थ, कडधान्य, दाळी, खजूर, डाळिंब, फणस, कलिंगड, संत्री

कृत्रिम अन्नघटक किंवा सप्लिमेंट खरेदी करण्याचा तुम्ही विचार करता तेव्हा याची गरज काय, असा प्रश्न स्वत:ला विचारावा. आपल्या खाण्याच्या पद्धती व पदार्थ आरोग्य चांगले राखण्यासाठी पुरेसे आहेत. मात्र काही कारणास्तव कृत्रिम अन्नघटक घेण्याची आवश्यकता वाटत असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.