कडक उन्हामुळे अंगाची अक्षरश: लाही-लाही होण्यास सुरुवात झाली आहे. बाहेर पडल्यावर कडक ऊन आणि घरामध्येही घमाच्या धारा अशी परिस्थिती आहे. अशा गरम वातावरणात आहार-विहार कसा असावा याविषयी आयुर्वेद काय म्हणतो ते पाहूया-
काय करावे-काय टाळावे?
* उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतू. या दिवसांत सूर्याची तीव्र उष्णता शरीरातील स्निग्धता कमी करते. त्यामुळे कडक उन्हाचा त्वचेशी थेट येणारा संपर्क टाळायला हवा. या दिवसांत खूप घाम येत असल्याने कमी कपडे घालण्याकडे सर्वाचा कल असतो. पण विशेषत: बाहेर पडताना त्वचा कपडय़ांनी झाकणे गरजेचे आहे. पण अंगभर कपडे घातले तरी त्वचेच्या उष्णता बाहेर टाकण्याच्या कार्यात अडथळा येता कामा नये अशा प्रकारचे कपडे असावेत. ‘सिंथेटिक’ कापडाचे कपडे टाळावेत. ते उष्णता कोंडून ठेवतात. त्याऐवजी सुती, खादीचे किंवा कोणतेही नैसर्गिक कापडाचे कपडे वापरा.
* शीतल जलाने स्नान करा, असेही सांगितले गेले आहे. शरीराचे तापमान कमी ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
* ग्रीष्म ऋतूत दिवसा झोपावे असेही सांगितले आहे. इतर वेळी दिवसाची झोप अयोग्य समजली जाते. पण या दिवसांत थंड खोलीत दुपारीही थोडा वेळ झोपले तर चालू शकते. तर रात्री चांदण्यात झोपण्याचा सल्ला आयुर्वेदात आढळतो.
* या ऋतूची आणखी एक वेगळी बाब अशी, की या दिवसांत व्यायाम कमी करावा. अति व्यायामाने नुकसान होण्याची शक्यता अधिक. त्यामुळे हलका (मॉडरेट) व्यायाम या दिवसांत चांगला.
अन्न-पाणी कसे असावे?
* आंबट, खारट आणि तिखट पदार्थ या ऋतूत शक्यतो टाळावेत. त्याच्या उलट- म्हणजे मधुर, कडू आणि कषाय (तुरट) द्रव्यांचे सेवन अधिक करावे. – फार जड व पचनशक्तीवर ताण पडेल असे काही खाऊ नये.
* ग्रीष्मात पांढरा तांदूळ खावा. पांढरा- म्हणजे चांगला पॉलिश केलेला तांदूळ. खरे तर इतर वेळी आपण पॉलिशचा तांदूळ नकोच, असे म्हणतो. पण उन्हाळ्यात तो चालेल.
* आहार घेताना दर दोन तासांनी खा असे सर्रास सांगितले जाते. उन्हाळ्यात मात्र ते फायदेशीर ठरेलच असे नाही. पचायला सोपा, हलका आहार घ्यावा, तसेच वारंवार न खाता ठरलेल्या २-३ वेळांना आहार घ्यावा, असे सांगितले जाते.
* रात्री झोपताना म्हशीचे दूध प्यावे असा उल्लेख आयुर्वेदात आढळतो. म्हशीच्या दुधात स्निग्धता अधिक असते. साखर ज्यांना चालते त्यांनी साखरयुक्त दूध प्यायले तरी चालेल.
* या ऋतूत मद्यपान शक्यतो वज्र्य असावे.
* पिण्याच्या पाण्याबाबत आयुर्वेदात ‘सुगंधी सलीला’चे सेवन करा, असा उल्लेख आहे. सुगंधी सलील म्हणजे नवीन माठातले मोगरा किंवा चंपासारखी ताजी सुगंधी फुले घातलेले पाणी प्यावे.
* पुरेसे पाणी पिणे व नेहमी बरोबर पाणी बाळगणेही गरजेचे.
काही महत्त्वाचे-
* आयुर्वेदात शरीरातील ‘र्मम’ सांगितली गेली आहेत. ही र्मम म्हणजे शरीरातील नाजूक ठिकाणे. त्यांना इजा पोहोचू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. डोके हे त्यातील महत्त्वाचे मर्म. उन्हात बाहेर जाताना डोके झाकलेले हवे असे म्हणतात ते त्यासाठीच. आपला मेंदू आणि डोळे हे खूप महत्त्वाचे अवयव आहेत. मेंदूत एकाच वेळी विविध प्रकारच्या रासायनिक क्रिया सुरू असतात. मेंदूची स्वत:ची एक प्रकारची उष्णता तिथे असते आणि शरीराचे तापमान नियंत्रित करणारे केंद्रही मेंदूतच आहे. उष्माघाताच्या वेळी या केंद्राच्या कामात बिघाड होतो. कदाचित त्यामुळेच आपल्या देशात विविध प्रकारची शिरस्त्राणे वापरत असावेत.
* ऊन वाईट नाही. लहान मुलांची उंची वाढते, चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी कोवळ्या उन्हाचा उपयोग होतो, शरीरातील ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता व हाडांची झीज टाळण्यासाठीही त्वचेवर कोवळे ऊन पडणे चांगलेच. शिवाय ऊन हे जंतूंचा नाश करणारे आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे उन्हाळा वाईट नाही. कडक उन्हापासून मात्र काळजी घ्यायलाच हवी.
* मराठवाडा, विदर्भ, खान्देशात दिवसा बाहेर जाताना किंवा बाहेरून आल्यावर हातापायांना कांद्याचा रस चोळणे हा पिढय़ान्पिढय़ा चालत आलेला उपाय आहे. खूप ऊन असलेल्या देशांमध्ये पाहिले तरी अंगभर कपडे, सुती कपडे, डोके झाकणे या पद्धती दिसतात. नामिबियामधील आदिवासींमध्ये तर गेरू व लोणी एकत्र करून उन्हापासून संरक्षणासाठी त्वचेवर त्याचा लेप घालण्याची पद्धतही दिसते.
वैद्य राहुल सराफ
(शब्दांकन- संपदा सोवनी)

Heat wave again in Vidarbha Akola recorded the highest temperature on Friday
विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट? जाणून घ्या, अकोल्यात पारा कुठे पोहचला
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
Recipes of raw mango mango sauce recipe in marathi
वाळवण विशेष! घरगुती मसाल्यासह बनवा कैरीचा वर्षभर टिकणारा सॉस; लहान मुलंही खातील आवडीनं
jaljeera powder
उन्हाळ्यात प्या थंडगार जलजीरा! घरीच बनवा ३ महिने टिकेल अशी जलजीरा पावडर, नोट करा रेसिपी