‘काळा दमा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसिज’ (सीओपीडी) या फुफ्फुसाच्या आजारांविषयी अनेकांना फारशी माहिती नसते. कधी तरी तरुणपणी विविध कारणांमुळे सुरू होणाऱ्या या आजाराची ठळक लक्षणे दिसण्यासाठी बऱ्याच वर्षांचा वेळ जातो. त्याआधी जी लक्षणे दिसतात त्याकडे बहुतेक वेळा दुर्लक्षच केले जाते. अशा परिस्थितीत मुळात आजार होऊच नये म्हणून सुरुवातीपासून काळजी घेणेच इष्ट.

हवेतील विशिष्ट प्रकारचे घातक कण श्वासोच्छ्वासावाटे शरीरात जाऊन फुफ्फुसाचे होणारे कायमचे नुकसान म्हणजे ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसिज’ (सीओपीडी). त्याला काळा दमा असेही म्हणतात. ‘सीओपीडी’ आजाराबद्दलचा सर्वाधिक अभ्यास धूम्रपानाविषयी झाला आहे. धूम्रपानात अनेक प्रकारची विषारी द्रव्ये असतात. ‘सीओपीडी’च्या देशातील एकूण रुग्णांपैकी जवळपास एकतृतीयांश रुग्णांमध्ये आजाराचे कारण धूम्रपानाशी निगडित आहे; परंतु हा आजार होण्यासाठी आणखी दोन गोष्टीही त्याच प्रकारे कारणीभूत ठरू शकतात. खेडेगावामध्ये चुलीचा वापर मोठय़ा प्रमाणात होतो आणि अशा इंधनाच्या ज्वलनातून मोठय़ा प्रमाणावर धूर आणि कण बाहेर पडत असतात. शहरांमध्ये दाटीवाटीच्या वस्त्यांमध्येही बंब, चूल यांचा वापर होतो. या धुरातील कणांचा सततचा संपर्क आल्यामुळेही फुफ्फुस खराब होते.

world's first self-driven electric
एप्रिल फुल नव्हे, खरचं चालकाशिवाय धावतेय ही दुचाकी! भाविश अग्रवालने केली Ola Soloची घोषणा, पाहा Video
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
Ragging of disabled girl
पुणे : दिव्यांग मुलीची रॅगिंग; रॅगिंग सहन न झाल्याने ब्रेन स्ट्रोक!
Dharavi slum tour
धारावीला ‘झोपडपट्टी टूर’ म्हणत नाव ठेवणाऱ्या परदेशी इन्फ्ल्युएन्सरवर संतापले नेटकरी, म्हणाले, “ही मस्करी करतेय का?”

सर्वसाधारणत: चुलींचा वापर महिलांना मोठय़ा प्रमाणावर करावा लागतो. या महिलांनी विसाव्या वर्षांपासून चूल वापरण्यास सुरुवात केली असेल तर पन्नाशीपर्यंत तिच्या फुफ्फुसाला अकाली वृद्धत्व आलेले असते. मात्र त्याविषयी फारसे बोलले जात नाही.

तिसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे वायुप्रदूषण. वायुप्रदूषणाचा ‘सीओपीडी’शी संबंध जोडता येईल असे अभ्यास आता नव्याने समोर येत आहेत. ज्या व्यक्तींची घरे महामार्गावर असतात त्यांना वायुप्रदूषणास मोठय़ा प्रमाणावर तोंड द्यावे लागते. अशा ठिकाणी ‘सीओपीडी’चेही प्रमाण लक्षणीय दिसत असल्याचे काही ‘ट्रेंड्स’ पुढे येत आहेत. दिवाळीनंतरच्या थंडीच्या दिवसांत दिल्लीतील वायुप्रदूषणाची गंभीररीत्या वाढलेली पातळी आणि त्याबरोबर वाढणारे फुफ्फुसाचे आजार हेही या बाबतीत लक्षात घ्यायला हवेत.

जिथे जिथे ज्वलन, धूर आणि श्वसनावाटे शरीरात कण आहेत अशा विविध व्यवसायांमध्ये फुफ्फुसाच्या आजारांचा धोका असतो. मंदिरातील पुजारी, मोठय़ा प्रमाणावर तळण्याचा व्यवसाय करावे लागणारे आचारी, रेती व्यवसायात काम करणारे लोक हे त्यातील काही व्यवसाय. या आजारांची लक्षणेही साधारणत: ‘सीओपीडी’सारखीच असतात.

लक्षणे

  • ‘सीओपीडी’ हा आजार सुरू झाल्यानंतर खूप काळाने अगदी २०-३० वर्षांनंतर त्याची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. एखाद्या तरुण मुलाने धूम्रपान सुरू केल्यापासून पुढील दहा वर्षे कदाचित त्याला काहीच विशेष लक्षणे जाणवणार नाहीत, पण कालांतराने ती दिसू लागतात. तोपर्यंत थोडाफार खोकला, कफ, थंडीत खोकला वाढणे अशी साधी लक्षणे दिसतात आणि सहसा दुर्लक्षित केली जातात. चुलीवर काम करणाऱ्या महिलांनाही खोकला येतो, पण तो दुर्लक्ष करता येईल अशा प्रकारचा असतो. यामुळे अनेकदा फुफ्फुस निकामी होईपर्यंत कोणतेच उपचार घेतले जात नाहीत.
  • चाळिशीनंतरच्या व्यक्तींमध्ये विशिष्ट अंतर चालल्यानंतर, जिना चढल्यानंतर दम लागणे आणि जुनाट वा वारंवार होणारा खोकला ही ‘सीओपीडी’ची ठळक लक्षणे असून, त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच तपासून घेणे गरजेचे.

 

उपाय

  • ‘सीओपीडी’च्या रुग्णांमध्ये श्वासनलिका मोठय़ा करणे हा एक महत्त्वाचा उपचार असतो. त्याद्वारे श्वास घेणे सुकर करता येते. श्वासावाटे ओढून घेण्याची काही औषधे (इन्हेलर) आहेत. ‘लाँग अ‍ॅक्टिंग बीटा टू अ‍ॅगोनिस्ट’ आणि ‘लाँग अ‍ॅक्टिंग अँटिकोलिनर्जिक्स’ हे औषधांचे दोन गट ‘सीओपीडी’साठी वापरले जातात. या दोन्ही औषधांचे एकत्र मिश्रण असलेला इन्हेलर वापरला तरी रुग्णाचे दैनंदिन जीवन काही प्रमाणात सुसहय़ होऊ शकते.
  • रुग्णांना ‘इन्फ्लूएन्झा’ आणि ‘न्यूमोकोकस’ची प्रतिबंधक लस दिली जाते. या रोगांचा संसर्ग झाल्यावर फुफ्फुसाची झीज होत असते. त्यामुळे हे इतर संसर्ग टाळता आल्यास फुफ्फुसाची अतिरिक्त झीज टाळता येते.
  • अनेकदा ‘सीओपीडी’ झालेल्या रुग्णांमध्ये वजन घटते, हातापायांच्या स्नायूंची ताकद कमी होते. अशा रुग्णांसाठी विशिष्ट व्यायाम प्रकार आहेत. यात चालणे, हातांच्या हालचाली, श्वास घेणे हे विशिष्ट पद्धतीने सूत्रबद्धरीत्या करून घेतले जाते. रुग्णाच्या जगण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी हे उपचारही तितकेच महत्त्वाचे.
  • खाण्यापिण्याविषयीही काही पथ्ये पाळणे इष्ट ठरते. ‘सीओपीडी’च्या रुग्णांनी एका वेळी पोटभर जेवणे टाळावे. पोट फुगल्यास त्यामुळेही त्यांना त्रास होऊ शकतो. आहारात पिष्टमय पदार्थ थोडे कमी असावेत, तसेच प्रथिने योग्य प्रमाणात व स्निग्ध पदार्थ थोडे अधिक घेता येऊ शकतात. त्याबद्दलचा सल्लाही रुग्णाच्या प्रकृतीनुसार दिला जातो.
  • ‘सीओपीडी’च्या रुग्णांच्या दैनंदिन क्रियांवर आजारामुळे मर्यादा येत असल्यामुळे ते अनेकदा निराश होतात. समाजात मिसळणे कमी होणे, सतत कुणाची तरी मदत घ्यावी लागणे, यामुळे रुग्णांना विफलता येऊ शकते. हे नैराश्य दूर करण्यासाठी रुग्णांना समुपदेशनाचीही गरज भासते.
  • आजार अधिक बळावतो तेव्हा घरी ऑक्सिजनचा वापर करूनही रुग्ण अनेक वर्षे चांगल्या प्रकारे जगू शकतो, दैनंदिन कामे करू शकतो, डॉक्टरांकडे ये-जादेखील करू शकतो. याच प्रकारे कृत्रिम श्वासोच्छ्वासाचाही अशाच प्रकारे वापर करता येतो.

‘सीओपीडी’ टाळण्यासाठी सामान्य व्यक्तींनीही ‘अ‍ॅक्टिव्ह’ आणि ‘पॅसिव्ह’ असे दोन्ही प्रकारचे धूम्रपान टाळावे. देशात ‘नॉन स्मोकिंग सीओपीडी’चे प्रमाणही मोठे आहे. धूर निर्माण करणाऱ्या लाकडे, गोवऱ्या, कोळसा व इतर जैविक इंधनांचा वापरही बंद करणेच इष्ट. त्याऐवजी गॅसचा वापर केलेला बरा. जीवनशैली आरोग्यदायी असणे फार गरजेचे आहे. ‘क’ जीवनसत्त्व व ‘अँटिऑक्सिडंट्स’ची कमतरता टाळून योग्य आहार व व्यायाम गरजेचा आहे. जनुकीयमार्गे पुढील पिढीत ‘सीओपीडी’ आजार होण्याचे प्रमाण अगदी कमी आहे, परंतु ज्यांच्या घरात कुणाला तरी ‘सीओपीडी’ आजार आहे त्यांनीही जागरूक राहणे गरजेचे आहे. – डॉ. महावीर मोदी, पल्मोनोलॉजिस्ट

-डॉ. नितीन अभ्यंकर, पल्मोनोलॉजिस्ट

शब्दांकन- संपदा सोवनी