स्तनांचा कर्करोग जरी जगातील सर्व कर्करोगांत पुढे असला तरी कर्करोगाव्यतिरिक्त स्तनांच्या ज्या आजाराकडे लक्ष देण्यास हवे त्याची सुस्पष्टपणे कल्पना आपणास हवी. त्या आजारांची लक्षणे, त्याचा उपचार व स्तनाच्या आलेखाशी त्याचा संबंध जाणून घेणे आवश्यक आहे.
फायब्रोसिस्टिक आजार – सर्वसाधारणपणे ६० टक्के महिलांना हा साधा आजार असू शकतो. हा संपूर्णपणे संप्रेरकाच्या (हार्मोन्सच्या) असंतुलनामुळे होतो. २० ते ५८ पर्यंत कोणत्याही वयाच्या महिलेस हा उद्भवूू शकतो. दोन्ही स्तन जड होतात, हात लागला वा साधा स्पर्श झाला तरी कळ येते. दोन्ही स्तनांचे जडपण मासिकपाळीआधी अधिक जाणवते तर मासिकपाळी येऊन गेल्यानंतर आपोआपच कमी होते. स्तनांचा जडपणा ही अवस्था स्तनांच्या आतील भागास सूज आल्यामुळे, आकारमानात थोडी वाढ झाल्यामुळे होते. हा परिणाम संपूर्णपणे मिथाइल झ्ॉनथिन या द्रव्यामुळे होतो. यात दोन प्रकार येतात. पेशींची वाढ होऊन त्यात पाण्याच्या गाठी बनतात तर काही प्रकारांत पेशींचा आकार वाढून स्तनाग्रांना जोडणाऱ्या नलिकांचीही वाढ होते. यावर उपाय म्हणजे आहारातील मीठ कमी करणे व पाणी भरपूर पिणे.
पेशींची संख्या वाढून वाढणारा स्तनांचा आकार म्हणजेच पॉलीफेरेटिव्ह चेंजेस – यात स्तनाग्रांना जोडणाऱ्या दुग्धनलिकेतील पेशींची संख्या वाढते. यात पेशी समान राहतात, पण जर त्यात तफावत आढळून चाचणीमुळे एटिपिया म्हणजेच पेशींच्या वाढीत असमानता आढळली तर ती कर्करोगपूर्व स्थिती असते. अशा वेळेस तो भाग काढून तपासणीस पाठवून लवकरच इलाज करावेत. साधारण वयाच्या ३० ते ४० वर्षांत काही वेळेस स्तनांच्या पेशीत बदल घडून ‘फायब्रोअ‍ॅडिनोसिस’ ही अवस्था येऊ शकते. ‘पॅपिलोमा’ ही अवस्था आपल्याला समजते ती स्तनाग्रांतून पाझरणाऱ्या द्रव्यामुळे. वरील नमूद केलेला कोणताही प्रकार असो, त्याची नीट मीमांसा करून घेणे महत्त्वाचे ठरते. त्यानुसार आहारातील बदल, व्यवस्थित आकाराप्रमाणे घालावयाची सपोर्टिव्ह ब्रेसियर, ‘अ’ व ‘ई’ जीवनसत्त्वांचे सेवन, आहारातील मिठाचे कमी प्रमाण, काही वेळेस घ्यावी लागणारी संप्रेरके (इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन कमी प्रमाणातील) यांनी हा स्तनांचा आजार ७० ते ९० टक्के कमी होतो.
फायब्रोअ‍ॅडिनोमा – स्वत स्तनांची तपासणी करत असता काही वेळा लहान किंवा मोठय़ा एक वा एकापेक्षा अधिक गाठी जाणवतात. मासिकपाळी ते रजोनिवृत्ती या काळात कधीही याचा उद्भव होऊ शकतो. ही स्तनातील गाठ घट्ट, वलयाकार एखाद्या शेंगदाण्याच्या आकारापासून लिंबाच्या आकारापर्यंत जाणवते, पूर्णपणे सर्व दिशेतून हलणारी व कुठेही न चिकटलेली असली तरी हाताच्या तळव्यांना वा बोटांस ती स्नान करताना वा इतर वेळेस स्तन तपासणी स्वत करताना जाणवते. मॅमोग्राफी करून या गाठीची मीमांसा करणे आवश्यक ठरते. काही वेळेस याची फाइन नीडल बायोप्सी घेतली जाते. त्यात रिपोर्ट साधाच येतो. यातून कर्करोग उद्भवण्याची शक्यता फार कमी असते. ‘फायब्रोअ‍ॅडिनोमा’ आकाराने लहान असल्यास शस्त्रक्रिया जरुरीची नाही. पण काही वेळेस जर तो आकाराने वाढला, वा फाइन नीडल बायोप्सीने काही वेगळ्या पेशींचे निदान झाले वा रुग्णास स्वत त्याची शस्त्रक्रिया करून घेणे इष्ट वाटत असेल तर शस्त्रक्रियेचा इलाज करावा.
फायलॉइड गाठी – हा आजार कमी प्रमाणात आढळतो. कमी वेगाने वाढणारा हा पेशींच्या वाढीचा समूह हा असतो. विशेषत रजोनिवृत्तीपूर्वी काही वेळेस यात स्तन-कर्करोगाची चाहूल असते म्हणूनच याचे संपूर्ण उच्चाटन शस्त्रक्रियेने करणे अधिक हितावह ठरते.
hlt03त्वचेवरील रक्तवाहिन्यांचा संसर्ग (सुपरफिशिअल थंब्रोफ्लेबायटिस) – मँडोर डिसीज ऑफ ब्रेस्ट असेही यास म्हणतात. रुग्णास अतिशय वेदना होतात. त्वचा आत खेचल्यामुळे स्तनावरील रक्तवाहिन्या स्पष्ट दिसू लागतात. अशा स्थितीची कारणमीमांसा म्हणजे स्तनांवर झालेला आघात, शस्त्रक्रिया वा प्रसूतीदशा. फक्त शेकणे, औषधे घेणे याने ही अवस्था तीन आठवडय़ांच्या आत बरी होऊ शकते.
स्तनांचा दाह (मॅस्टाइटिस) – विशेषत स्तनपान करत असताना ही अवस्था जाणवते. पण जर स्तनाग्रांतून चिकट द्रव्य बाहेर येत असेल तर कोणत्याही वयात ही अवस्था जाणवू शकते. यात रोगजंतुसंसर्ग टाळणारी औषधे, दाह कमी होणारी औषधे देऊन ही अवस्था निवळू शकते, परंतु काही वेळेस रोगजंतुसंसर्ग अधिक असल्यास स्तनाच्या त्या भागात पू तयार होतो. मग शस्त्रक्रिया करून तो पू बाहेर काढावा लागतो. काही वेळेस संशयास्पद पेशीची अवस्था वाढल्यास ती बायोप्सी तपासणीस पाठवणे हितावह ठरतं.
डक्ट अ‍ॅक्टेसिया – साधारण वयाच्या ४० ते ६० वर्षांच्या दरम्यान ही अवस्था जाणवते. स्तनाग्रांजवळ येणारी ही गाठ अतिशय कठीण वेदना देणारी असते. यात स्तनाग्रांवरील त्वचेस खाज येणे, ती लाल होणे, स्तनाग्रे आतील बाजूस ओढली जाणे अशी लक्षणे दिसतात. शस्त्रक्रिया हा उपचार ठरतो.
स्तानाग्रांतून पाझरणारा स्राव – याची मीमांसा अतिशय दक्षतापूर्वक करावी. काही वेळेस कर्करोगाची ही पूर्वसूचना असू शकते. योग्य वेळी योग्य उपचार, योग्य अवधान पाळल्यास स्तनांच्या कर्करोगापासून आपण दूर राहू शकतो.
डॉ. रश्मी फडणवीस rashmifadnavis46@gmail.com

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Ananta joshi cap collector
गोष्ट असामान्यांची Video: ३५००पेक्षा जास्त भन्नाट टोप्यांचा खजिना जपणारे अनंत जोशी
Budh Rahu Yuti 2024
१८ वर्षांनी एप्रिलमध्ये २ ग्रहांची महायुती; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी? कोणाला मिळणार भरपूर पैसा?
accused in child sexual abuse case arrest after three years
बाललैंगिक अत्याचारप्रकरणी तीन वर्षांनंतर आरोपीस अटक