विपणन व्यवस्थापक (मार्केटिंग मॅनेजर) म्हणून काम करणाऱ्या ४५ वर्षांच्या एका कर्तबगार माणसाची ही कहाणी पाहू. अजित त्याच्या कार्यालयात वरच्या हुद्दय़ावर आहे. घरी त्याची पत्नी अमृता (ही स्वत: एक कर्तबगार अभियंता आहे.) आणि दोन मुले आहेत-अनिकेत (वय वर्षे १०) आणि अस्मिता (वय वर्षे पाच). अजितच्या हुशारीबद्दल सगळीकडे बोलबाला आहे. सर्वाना त्याचं कौतुक आहे. त्याच्या संपूर्ण व्यक्तित्वाला गालबोट लावणारी एकमात्र गोष्ट म्हणजे त्याचा राग. त्याचा संताप अनावर झाला की इतरांना, विशेषत: घरी सगळ्यांना फार त्रास होतो. मुलं तर त्याला घाबरून असतात. रागावल्यावर काय करतो याचं त्याला अजिबात भान नसतं.

गेले काही दिवस त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला आहे. त्यासाठी त्याला रोज एक गोळी घ्यावी लागते. त्याच्या कामाचा ताण वाढला आहे. त्याबरोबर त्याचा रागही. दोन-तीनदा अमृताने त्याला सौम्यपणे मानसोपचाराचा सल्ला घेण्याबद्दल विचारून पाहिलं. त्याने ते उडवून लावलं. त्याचं म्हणणं एकच. मला सध्या खूप ताण आहे, शिवाय रक्तदाबाचा त्रास आहे, इतपत चिडचिड होणारच. मानसोपचाराने काय होणार? आपल्याला कारण माहीत आहे. तुम्ही मला सांभाळून घ्यायला हवं. त्याच्या या युक्तिवादापुढे अमृतानेही शरणागती पत्करली आहे.

गेल्या महिन्यातील घटना. एके दिवशी अजित कार्यालयातून घरी आला. त्याचं डोकं भणभणत होतं. तेवढय़ात अनिकेतचं आणि अस्मिताचं कशावरून तरी छोटंसं भांडण झालं. अजितने आवाज चढवून अनिकेतला सांगितलं, ‘सोड आधी तिला. ती लहान आहे तुझ्यापेक्षा. कळत नाही का तुला?’ अजितचा पारा चढला. त्याने अनिकेतला खस्सकन ओढलं आणि ढकलून दिलं. अनिकेतचं डोकं भिंतीवर आपटलं. त्याला खोक पडली. अमृताने शांतपणे त्याला डॉक्टरकडे नेऊन टाके घालून आणलं. त्यानंतरचे दोन दिवस अजित खिन्न होता. अनिकेतच्या डोक्याचं ड्रेसिंग बघून त्याला कसंतरीच होत होतं. त्याने अनिकेतला सॉरी म्हणण्यासाठी जवळ घेतलं आणि त्याला रडू अनावर झालं. या घटनेनंतर मात्र अजित मानसोपचारासाठी तयार झाला.

अजितची बुद्धिमत्ता सरासरीपेक्षा जास्त असल्याचे मानसोपचाराच्या दृष्टीने फायदा असा की त्याला कुठलीही गोष्ट पटकन समजते आणि तोटा असा की ती स्वीकारताना त्याचा अहंकार आड येतो. अहंकाराची गंमत अशी की तो अनुभव नाकारू शकत नाही. म्हणूनच अजितच्या उपचारात सर्वप्रथम त्याच्या रागाच्या प्रत्यक्ष अनुभवाशी (रागाच्या कारणमीमांसेशी नव्हे) त्याला जोडणं महत्त्वाचं आहे. अजित जेव्हा रागावतो तेव्हा शरीरभर त्याला वेगवेगळ्या संवेदना जाणवतात. त्याच्या मुठी आवळल्या जातात. कपाळ आठय़ांनी आक्रसतं. रक्तप्रवास जोराने उसळत असतो. स्नायूंमधील ताण प्रचंड वाढतो. आक्रमकता वाढते. ही अवस्था संपूर्णपणे अजितच्या शरीरात निर्माण होणारी अवस्था आहे. अजित जेव्हा रागावतो, तेव्हा त्याचं लक्ष त्याला राग आणणाऱ्या घटनांकडे असतं, स्वत:च्या आता घडणाऱ्या घटनांकडे नसतं. साहजिकच माझं बरोबर, इतरांचं चूक या विचाराबरोबरच तो वाहवत जातो आणि त्याचा राग वाढत जातो. रागावलेल्या अजितने जर त्या क्षणी स्वत:च्या शरीराकडे लक्ष दिलं तर त्याला एक गोष्ट कळेल, माझा राग हा माझ्या आतून येतो. बाहेरच्या घटना माझ्या रागाला जबाबदार नाहीत, त्या केवळ निमित्तमात्र आहेत आणि ही बातमी अजितसाठी चांगली आहे. कारण याचा अर्थ असा की तो स्वत: त्याच्या रागाचं व्यवस्थापन करण्यासाठी निश्चितपणे ठोस असं काहीतरी करू शकतो. जेव्हा आपण स्वत:च्या रागाची जबाबदारी स्वीकारतो, तेव्हा आपला अहंकार बायपास झालेला असतो.