डॉ. अमोल अन्नदाते१० वर्षांची समा पोट धरून विव्हळतच केबिनमध्ये आली. आईचा चेहरा चिंताक्रांत. ‘डॉक्टर, अहो गेली वर्षभर हिचं हे पोट दुखणं अधूनमधून सुरू आहे. आधी साधारण एका दिवसात बरं वाटायचं. मागे तुम्हाला एकदा दाखवलं तर तुम्हीही काही नाही, असं सांगितलं. पण आज मात्र कहर झाला. एका तासापासून एवढी ओरडते आहे की विचारूच नका. जरा नीट बघा आणि एकदा काय ते नीट निदान करा.’ सुरुवातीला समाला बघून मीही जरा काळजीत पडलो. पण पोटदुखीच्या तपासणीतले नेहमीचे महत्त्वाचे प्रश्न आधी विचारू, असे ठरवले. सगळ्यात आधी समाला विचारले, एका बोटाने कुठे दुखते ते नक्की दाखव. समा पूर्ण हात ठेवून दाखवू लागली. मी समाला परत बजावून सांगितले. फक्त एका बोटाने दाखव. तिने बोट नेमके बेंबीजवळ ठेवले. पोटदुखीच्या निदानामधील या साध्या प्रश्नाचे महत्त्व मी समाच्या आईला समजावून सांगितले. मुलं जितके  बेंबीजवळ पोटदुखी दाखवते तितके ते मनोकायिक म्हणजे आमच्या वैद्यकीय भाषेत फंक्शनल असते आणि जितके  बेंबीपासून लांब दाखवते तितके ते काळजी करण्यासारखे असते. त्यातच बेंबीपासून खाली उजव्या बाजूला अपेंडिक्स असते आणि तिथे बोटाने दाखवल्यास अपेंडिसायटिस असू शकतो. दुसरा प्रश्न- उलटय़ा किंवा मळमळ, जुलाब अशी लक्षणे आहेत का? ‘मुळीच नाही.’ आईच्या या उत्तराने निदानाचा मार्ग अजून मोकळा झाला. बघ परत हे नसणे म्हणजे साध्या पोटदुखीचं लक्षण आहे. हिचे जेवण कसे आहे? ‘अधूनमधून पोट दुखते तो दिवस सोडला तर जेवण अगदी नॉर्मल आहे.’ ही खेळते का आणि खेळत असताना पोट दुखते म्हणून कधी खेळणे सोडून परत येते का? आईने ठामपणे ‘नाही’ सांगितले. रात्री शांत झोपते का आणि पोट दुखते म्हणून रात्री कधी झोपेतून उठून बसली आहे का? आईने नीट आठवून सांगितले- ‘नाही. तिची झोप अगदी शांत आहे.’ सकाळची शौचाची सवय नियमित आहे की बद्धकोष्ठतेचा त्रास आहे? ‘नाही, तो त्रास तिला कधीच होत नाही.’ फक्त एक गोष्ट विचारायची राहून गेली. कधी शाळेत जाताना सकाळी पोट दुखले का? ‘हो एक-दोन वेळा झाले आहे असे.’

पोटाची तपासणी करूनही विशेष काही आढळले नाही. मी समाला थोडा वेळ बाहेर थांबायला सांगितले. आईला निदान नीट समजून सांगणे गरजेचे होते. हे पहा, विशेष काळजी करण्यासारखे काही नाही. याला आम्ही फंक्शनल पेन असे म्हणतो.

म्हणजे डॉक्टर, ती नाटक करते आहे का?’

नाही, ती नाटक करते आहे, असेही म्हणता येत नाही. पण ही पोटदुखी तिच्या तनात नसून मनात आहे, असे म्हणता येईल. आपण मोठय़ा व्यक्ती आपल्याला येणारा ताण व्यक्त करतो. पण या वयात अजून व्यक्त होण्याची क्षमता नसते आणि मुळात आपल्याला काही ताण आहे हे समजण्याचीही क्षमता नसते. तेव्हा असे पोट दुखणे, डोके दुखणे अशा समस्या मुलांमध्ये दिसून येतात. बऱ्याचदा काही गोष्टी टाळण्यासाठीही मुलांकडून अजाणतेपणाने अशी लक्षणे व्यक्त होतात. यासाठी मी तिला फारतर जंताचे औषध देतो, पण इतर काही उपचारांची गरज वाटत नाही. समाला बोलावून- तुला काही झालेले नाही गं- म्हणून समजावून सांगितलं. याच्यासाठी एकच उपचार आहे समा, भरपूर खेळायचं. हे ऐकल्यावर मात्र समा गालातल्या गालात हसू लागली. मग माझ्या निदानावर शिक्कामोर्तब झाले. ‘डॉक्टर काही तपासण्या?’ मी समजावून सांगितले. तशी तपासण्यांची काही गरज नाही, पण तरी करायच्याच असतील तर लघवीची तपासणी आणि पोटाची सोनोग्राफी. कारण मी विचारलेले प्रश्नच मुख्य तपासणी होती.

amolaannadate@yahoo.co.in