अभ्यंग हे एक ‘पूर्वकर्म’ आहे. शरीराला सुखावह वाटेल, सहन होईल इतके गरम, सुगंधी आणि वातघ्न असे तेल घेऊन ते शरीराला वरून खाली अशा गतीने हळूहळू चोळणे म्हणजे अभ्यंग. अभ्यंगासाठी तेल निवडताना ऋतूचा आणि दोषाचाही विचार केला जातो. आयुर्वेदात सांगितलेले अभ्यंगाचे फायदे आणि अभ्यंगाचे तेल सिद्ध करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या द्रव्यांविषयी माहिती घेऊ या.

पंचकर्मातील प्रमुख कर्माच्या आधी केल्या जाणाऱ्या पूर्वकर्मापैकी एक म्हणजे अभ्यंग. पण अभ्यंगाचे स्वतंत्रपणेही अनेक फायदे आहेत. आपल्या आजूबाजूला अनेक रूपांत अभ्यंग दिसतो. केशकर्तनालयात डोक्याला तेल लावून मसाज करतात तो शिरोअभ्यंगाचाच एक प्रकार! पंचतारांकित हॉटेल्स आणि ‘स्पा’मध्ये केला जाणारा ‘फुल बॉडी मसाज’देखील तसाच. केरळमध्ये ‘पिजिचिल’ (पिंडस्वेद) या नावाने केल्या जाणाऱ्या अभ्यंगात लाकडाच्या मोठय़ा भांडय़ात व्यक्तीस झोपवून शिजवलेल्या भाताची कापडात पुरचुंडी बांधून त्याच्या साहाय्याने तेल अंगात जिरवतात. अगदी लग्नाळू मुलींच्या ‘ब्रायडल पॅकेज’मध्येही ‘फेस मसाज’, ‘फुल बॉडी मसाज’च्या जाहिराती पाहायला मिळतातच. हे सगळे अभ्यंगाचेच वेगवेगळे प्रकार म्हणायला हवेत. अर्थात अभ्यंग करून घेताना ते योग्य प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीकडूनच करून घेणे चांगले. शिवाय त्या व्यक्तीस कोणत्या कारणासाठी आणि प्रकृतीसाठी कोणत्या द्रव्यांनी सिद्ध केलेले तेल वापरावे याची जाण असेल तर अभ्यंगाचा आणखी फायदा होऊ शकतो.

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा
gondwana supercontinent overview interesting facts about gondwana supercontinent
भूगोलाचा इतिहास : गोंडवाना के भुईया मा..

आयुर्वेदात नमूद केलेले अभ्यंगाचे फायदे..

‘जराहर’

म्हातारपण लांबवणारा अभ्यंग. वृद्धत्व हा वाताचा काळ समजला जातो. या वाताला नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना तेलाच्या अभ्यंगाचा फायदा होऊ शकतो. खास जराहर अभ्यंगासाठी अश्वगंधा, शतावरी, बला (मुळी) या वनस्पतींची सिद्ध केलेले तेल वापरले जाते.

‘श्रमहर’

श्रम, थकवा कमी करणारा अभ्यंग. पूर्वी कामगार वस्त्यांमध्ये मालिशवाले असत. अजूनही काही ठिकाणी ते दिसतात. तो श्रमहर अभ्यंगाचाच एक प्रकार. श्रमहर अभ्यंगाने शारीरिक कष्ट कमी होऊन आराम वाटतो. पुष्करमूळ, गोक्षूर या वनस्पतींनी सिद्ध केलेले तेल या अभ्यंगासाठी वापरले जाते.

‘वातहर’

वाताचा नाश करणारा अभ्यंग. संधिवात, आमवात, अर्धागवात अशा वाताच्या आजारांकरिता बाजारात अनेक तेले मिळतात. वातहरणासाठी अभ्यंग करण्याचा चांगला उपयोग होतो. स्निग्धता ही वाताच्या विरोधी काम करते. त्यात अभ्यंगाचे तेल वातहर वनस्पतींनी सिद्ध केलेले असेल तर आणखी चांगले. दशमूळ, निर्गुडी या वनस्पती वातहर द्रव्यांमध्ये येतात.

‘दृष्टीप्रसादन’

डोळ्यांसाठी हितकर असलेला अभ्यंग. यात शिरोअभ्यंगाचा समावेश होतो. शिरोअभ्यंगात डोक्याला बदाम तेल किंवा खोबरेल तेल लावले तर डोळ्यांनाही चांगले वाटते. शिरोअभ्यंग करताना डोळ्यांच्या मागे असलेले स्नायू सैलावतात. बदाम किंवा त्रिफळाने सिद्ध केलेले तेल अशा प्रकारच्या अभ्यंगासाठी चांगले.

‘आयुष्कर’

आयुष्य वाढवणारा अभ्यंग! आपल्या शरीराची झीज सतत सुरू असते. ही झीज कमी करणारे अभ्यंग म्हणजे आयुष्कर अभ्यंग. ‘जीवनीय गण’ या गटातील वनस्पती व ज्येष्ठमध या अभ्यंगाचे तेल सिद्ध करण्यासाठी वापरतात.

‘स्वप्नकर’

झोप चांगली येण्यासाठी अभ्यंग. लहान बाळांना मालिश केल्यावर बाळ गाढ झोपते हे आपण पाहतो. तिथे अभ्यंगाचा ‘स्वप्नकर’ अर्थात शांत झोप देण्याचा परिणाम दिसून येतो. या अभ्यंगातही शरीर सैल (‘रीलॅक्स’) होते. झोप कमी येण्याची तक्रार असलेल्यांना रात्री झोपण्यापूर्वी असा छान मसाज करून घेतल्याचा उपयोग होऊ शकेल. जटांमासी, वाळा, चंदन या वनस्पतींनी सिद्ध केलेल्या तेलामुळे चांगली झोप येण्यास मदत होते.

‘क्लेशसहत्व’

क्लेश सहन करण्याची ताकद देणारा, शरीरातील लवचीकता वाढवणारा अभ्यंग. खेळाडूंमध्ये लवचीकता अपेक्षित असते. अशा ठिकाणी ‘स्पोर्टस् मेडिसिन’चा एक भाग म्हणून अभ्यंगाचा उपयोग करून घेता येईल. या प्रकारच्या अभ्यंगासाठी रास्ना वनस्पती, लाख (लाक्षा) ही द्रव्ये हितकर समजली जातात.

‘अभिघात सहत्व’

अभिघात सहन करण्याची ताकद देणारा अभ्यंग. कुस्ती, मुष्टियुद्ध, कराटे यात एकमेकांच्या शरीरावर आघात होत असतात. असे अभिघात सहन करण्याची ताकद अभ्यंगामुळे वाढू शकते. कुस्तीच्या तालमींमध्ये मल्लांना कुस्तीनंतर मालिश करण्याची पद्धत आहे, ती यासाठीच.

‘कफवातविरोधी’

अभ्यंगामुळे कफ व वात नियंत्रणात राहतो. कफ हा मेदरोगास- म्हणजे स्थूलतेस कारणीभूत ठरतो. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांना अभ्यंगाचा उपयोग होऊ शकतो. यासाठी करण्यात येणाऱ्या अभ्यंगात सैंधव मीठ, पिंपळी ही द्रव्ये तेल सिद्ध करण्यासाठी वापरली जातात.

‘वर्णबलप्रद’

अभ्यंगाने त्वचा शुद्ध होते आणि प्रसन्न दिसते. त्वचेस मृदुता येते. मंजिष्ठा, सारिवा ही द्रव्ये अशा अभ्यंगासाठीचे तेल सिद्ध करण्यासाठी वापरल्यास ते त्वचेसाठी ‘टॉनिक’ ठरू शकते.

‘पुष्टिकर’

पुष्टी करणारा अभ्यंग. तरुण व आजारी नसलेल्या लोकांमध्ये अभ्यंग आरोग्यरक्षणाचे तसेच उत्साह प्रदान करण्याचे काम करते. यासाठीच्या अभ्यंगात उडीद, खाजकुयलीची बी अशा द्रव्यांनी तेल सिद्ध करतात.

अभ्यंग कधी, कुठे, कसे?

शरीरावर अभ्यंग कुठे करावा म्हणजे कुठे चोळणे अधिक चांगले हेही सांगण्यात आले आहे. त्यानुसार डोक्याला केला जाणारा अभ्यंग (शिरोअभ्यंग) हा ज्ञानेंद्रियांच्या पोषणासाठी चांगला. तसेच पाय व कान हे वाताचे स्थान मानले गेले आहे. त्यामुळे पायांचा अभ्यंग चांगलाच. कानात तेल घालण्यास हल्ली विरोध केला जातो, परंतु आयुर्वेदात कानातही काही थेंब तेल टाकण्याचा उल्लेख आहे. अभ्यंग कसा करावा यासाठी ‘अनुलोम पद्धतीने’ हे साधे उत्तर आहे. यात वरून खाली अशा पद्धतीने तेल चोळतात. साध्यांच्या जागी मात्र वर्तुळाकार पद्धतीने अभ्यंग करावा. सकाळी अभ्यंग चांगलाच; परंतु अभ्यंग कशासाठी केला जाणार आहे त्यानुसार त्याची वेळ बदलू शकते. पादाभ्यंग किंवा शिरोअभ्यंगासाठी निश्चित वेळ नाही. झोपेसाठी करण्यात येणारा अभ्यंग अर्थातच रात्री करणे योग्य.

वैद्य राहुल सराफ

शब्दांकन- संपदा सोवनी