आकाशातून काहीतरी येऊन आपल्यावर आदळेल या भीतीने १९७९ या वर्षांत सर्व जगातील लोक घाबरले होते. नासाने आकाशात पाठवलेली ७० हजार किलो वजनाची स्कायलॅब प्रयोगशाळा खाली कोसळण्याची भीती होती. रेडियोवरून ही बातमी ऐकून लोक मैदानात येऊन आकाशाकडे बघत बसायचे. पृथ्वीच्या वातावरणात ही प्रयोगशाळा विखरून पसरली व नंतर ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम भागात यातील काही तुकडे पडले. अवकाशस्थ कचरा जमिनीवर येण्याची ही पहिली घटना असावी. मात्र आता नेहमीच आकाशात पाहून चालण्याची वेळ जवळ येतेय का यावर सध्या जगभरातल्या नेटीझन्समध्ये चर्चा रंगलीय. त्याला कारणीभूत ठरलीय ती तामिळनाडूतील गेल्या आठवडय़ातील घटना. महाविद्यालयाच्या इमारतीवर आकाशातून उल्कासदृश वस्तू येऊन आदळली आणि त्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला, असे तेथील मुख्यमंत्री जयललिता यांनी जाहीर केले. या ठिकाणी विस्फोट होण्याचे कोणतेही कारण आढळले नाही,
तसेच एक हिरव्या रंगाचा हातात मावेल एवढा दगडाचा तुकडा सापडला, त्यामुळे हा निष्कर्ष काढण्यात आला असला तरी ही उल्कापाताची घटना असल्याबाबत शास्त्रज्ञांना शंका आहे. मात्र या घटनेमुळे आकाशातील उडत्या कचऱ्याचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
कचऱ्याकडे पाहून आपण नाक मुरडत असलो तरी मानवी विकासाचा निदर्शक मानावा इतपत कचरा आणि विकासाचे नाते आहे. विकास जेवढा जास्त, तेवढा कचरा अधिक. विकसनशील देशांपेक्षा विकसित देशांमधील प्रतिमाणशी कचरा निर्माण होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यातही स्वत: स्वत:च्या घरात तयार केलेला कचरा लोकांना दुसऱ्या दिवशी अंगणातही नको असतो. तो पलीकडे इतर कोणाच्या तरी अंगणात टाकला तरी चालेल. त्यातूनच वाद होतात. देवनार कचराभूमीची सध्याची परिस्थिती ही याचाच परिपाक म्हणावी तशी. अर्थात कचरा हा काही केवळ घरापुरता किंवा जमिनीपुरता मर्यादित विषय नाही. पाणी आणि हवा याप्रमाणेच तो सर्व व्यापून उरला आहे. नदी, तलाव, समुद्र, हवा (प्रदूषण) आणि अंतराळातही कचऱ्याचे अस्तित्व आहे. जमिनीवरील कचऱ्याचे नियोजन करतानाच शासनव्यवस्था अपुरी पडत असताना आकाशस्थ कचऱ्याकडे गंभीरपणे लक्षच दिले जात नाही.

आकाशस्थ कचरा येतो कुठून?
कचरा म्हणजे नको असलेली गोष्ट. अवकाशात सोडलेल्या कृत्रिम उपग्रहांचा काम करण्याचा काही कालावधी असतो. दहा वर्षे, पंधरा वर्षे काम करून हे उपग्रह निकामी होतात. या उपग्रहांचे काय करायचे याबाबत कोणत्याही देशाने काही ठरवले नाही आणि त्यामुळे काम संपल्यावरही हे उपग्रह अनेक तुकडय़ांमध्ये आकाशात पृथ्वीभोवती चकरा मारत राहतात. आतापर्यंत अवकाशात तब्बल १५ हजारहून अधिक उपग्रह सोडण्यात आले आहेत. त्यातील सध्या केवळ दीड ते दोन हजार उपग्रह कार्यरत आहेत. याचाच अर्थ तब्बल १३ हजार उपग्रहांचा कचरा आकाशात आहे. हा कचरा थोडाथोडका नाही तर आठ ते दहा हजार टन एवढा आहे. अधिकाधिक देश उपग्रह सोडत असल्याने व त्याआधीच्या उपग्रहांचा कालावधी संपत असल्याने येत्या काही वर्षांत कचऱ्याचे प्रमाण दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे हा कचरा एके ठिकाणी नाही. उपग्रहांचे काही लाख तुकडे इतस्तत: विखरून आकाशात फिरत आहेत. सध्या कार्यकाल सुरू असलेल्या उपग्रहांनाही हे तुकडे आपटण्याच्या घटना घडल्या आहेत. या कचऱ्याची लवकर विल्वेवाट लावली नाही, तर गंभीर घटना होऊ शकते, हे अवकाश संशोधन संस्थांनाही माहिती आहे. मात्र या कचऱ्याची विल्हेवाट लावणे प्रचंड खर्चीक आहे. त्यामुळे या कचऱ्याची जबाबदारी घेण्यास कोणीही फारसे उत्सुक नाही. सामान्य लोक जे करतात, तेच त्यांचे देश करत आहेत. हा कचरा नष्ट करण्यासाठी लागणारी यंत्रणा व खर्च करण्यापेक्षा प्रश्न अगदी गंभीर होईपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करणे आणि इतर देशांनी पुढाकार घेण्याची वाट पाहात दिवस काढले जात आहेत. तामिळनाडूमधील घटनेनंतर ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे आणि त्यासाठी संबंधित देशांनी निर्णय घेण्याचा दबावही वाढतो आहे.
आकाशातून उल्कावर्षांव होण्याच्या घटना अधूनमधून घडत असल्या तरी रशियातील फेब्रुवारी २०१३ मध्ये उल्कावर्षांमुळे १२०० लोक जखमी झालेल्या घटनेचा अपवाद वगळता उल्कांमुळे कोणाचा मृत्यू होण्याची शक्यता अगदी दुर्मीळातील दुर्मीळ आहे. अनेकदा लघुग्रहाचा एखादा तुकडा पृथ्वीजवळून जाणार असल्याची बातमी येते, मात्र आतापर्यंत पृथ्वीला कोणताही धोका निर्माण होईल अशी स्थिती मानवी इतिहासात घडलेली नाही. मात्र आकाशस्थ ग्रहगोल जे करत नाहीत, तेच मानव स्वत:च्या हाताने करून घेत आहे. मानवानेच स्वत:च्या प्रगतीसाठी आकाशात पाठवलेल्या कृत्रिम उपग्रहांचे तुकडे त्याच्यावरच पुन्हा उलटण्याचा काळ जास्त दूर नाही. तामिळनाडूतील घटना कदाचित उल्कापातामुळे झाली नसेलही, मात्र त्यामुळे सुरू झालेली चर्चा निष्कर्षांप्रत आली तर आणखी काय हवे..
प्राजक्ता कासले prajakta.kasale@expressindia.com