निसर्गाच्या ऋतुचक्राप्रमाणे आपल्या भोवतीचे वातावरणही सतत बदलत असते. आपल्या देशात वर्षभरात एकूण सहा ऋतू अनुभवायला मिळतात. खंडप्राय देश असल्यामुळे एकाच वेळी सर्वत्र सारखे ऋतुमान नसते. किंबहुना ज्यावेळी काश्मीरमध्ये बर्फ पडत असतो, तेव्हा दक्षिणेत २५ अंश सेल्सिअस तापमान असते. मात्र साधारणपणे नोव्हेंबर-डिसेंबर व जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत हिवाळा असतो.

एकंदरीत ऋतुमान, आरोग्य आणि त्यासंबंधित भुकेचा विचार केला तर थंडीच्या मोसमात भूक जास्त लागते. बाहेरील थंडीचा परिणाम शरीराच्या अंतर्गत अवयवांवर होऊ नये, म्हणून त्वचेची सूक्ष्म छिद्रे आकुंचन पावतात. यामुळे शरीरातील उष्णता आत कोंडली जाते व ही उष्णता अधिक भूक लागण्याचे कारण ठरते. या थंड वातावरणात एरवी पचायला जड असलेले पदार्थ सेवन केले तरी ते पचायला सोपे जाते. कमी आहार घेणारी माणसे या दिवसांत अधिक जेवतात आणि ते अन्न चांगल्या रीतीने पचवितात. मात्र या वातावरणात काय खाऊ नये आणि काय खावे किंवा कुठले अन्नपदार्थ थंडीच्या दिवसात पोषक असतात याची माहिती असणे आवश्यक आहे.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Menopause & Perimenopause
मेनोपॉज आणि पेरीमेनोपॉजचा शरीरावर कसा परिणाम होतो? महिलांनी स्वत:ची कशी काळजी घ्यावी?

थंडीच्या मोसमात गारव्याबरोबरच वातावरणात येणाऱ्या कोरडेपणाचाही विचार करणे आवश्यक आहे. आपल्याला काय खावे याची माहिती असते, मात्र काय टाळावे याबद्दल जाणून घेतले तर हिवाळ्यात आरोग्यावर येणारा ताण कमी होऊ शकतो. भारतीय खाद्यपदार्थाबाबत खाण्याच्या पद्धती आणि वेळा याबद्दलचा उल्लेख आयुर्वेदात आहे. यात खाद्यपदार्थ, पेय, कपडे घालण्याच्या पद्धती यावर माहिती देण्यात आली आहे.

’ साधारणपणे एकदल (शूक धान्य) आणि द्विदल (शिम्बी धान्य) धान्य असे दोन प्रकार पडतात. यात एकदल धान्यातील बाजरी, नाचणी, जव आणि द्विदल प्रकारातील मसूर, वाले, वाटाणे, चणे, कुळीथ या धान्यांचा आहारात सातत्याने समावेश असेल तर तो टाळावा. हे सर्व धान्य वात वाढविणारे आहेत. थंडीच्या दिवसात वात प्रकृती असणाऱ्यांनी हे पदार्थ टाळावे. वात हा रुक्ष असून वर देण्यात आलेले धान्य शरीरासाठी रुक्ष असतात. या धान्यांच्या सेवनामुळे शरीराच्या त्वचेपासून ते शरीरातील अंतत्वचेपर्यंत सर्वच घटकांना अनावश्यक कोरडेपणा येतो. साहजिकच त्वचेपासून ते मलाशयातील अंतत्वचेपर्यंत सर्वच घटक कोरडे होण्याची शक्यता असते व यामुळे मलप्रवृत्ती योग्य स्वरूपाची होत नाही. यापेक्षा सुकी मेथी, कारली, वांगी, सूर्यफुलांचे देठ, शेवग्याच्या शेंगा व शेवग्याचा पाला आणि इतर पालेभाज्या खाव्यात.

’ मांसाहारी व्यक्तींनी या काळात रावस, पापलेट असे मोठे मासे खावेत. तर भाज्यांमध्ये कंद वर्गातील मुळा, लसूण, नवलकोल या पदार्थाचे प्रमाण कमी करावे.

’ दुधापासून बनविलेल्या पदार्थापैकी दही थंडीच्या दिवसात फार प्रमाणात घेऊ नये. दह्य़ाचे वर्णन करताना आयुर्वेदाने ‘न नित्यम’ असा इशारा दिला आहे. याचाच अर्थ असा की, अधिक प्रमाणात दह्य़ाचे सेवन किंवा सर्व ऋतूंमध्ये कोणतेही संस्कार न करता खाल्लेले दही यामुळे विविध प्रकारचे त्वचाविकार होण्याची शक्यता असते. यात एक्झिमा, स्राव येणारे विकार, सोरीयासिस हे विकार होण्याची शक्यता असते. अनेकदा दही खावयाचे असल्यास कढीच्या रूपात खाता येऊ शकते. याशिवाय दह्य़ाचे ताक आणि ताकावरील येणारे लोणी खाणे योग्य दह्य़ापासनू बनविले जाणारे लोणी, ताक, तूप हे पदार्थ उपकारक ठरतात. परंतु जमवलेले दही अधिक खाल्ल्यास त्रास होऊ शकतो. त्याशिवाय दह्य़ाने कफ वाढतो. त्यातून पुढे घशाचे आजार, वारंवार सर्दी होऊ शकते. ताक किंवा कमी प्रमाणात दही खाण्याची इच्छा असल्यास दुपारच्या वेळी कमी प्रमाणात सेवन केले तरी चालते.

’ थंड पाणी किंवा थंड पेय यांचे सेवन करू नये. खसखस, लाल मिरची, दालचिनी, राई किंवा राईचे तेल यांचा आहारात समावेश करताना काळजी घ्यावी आणि प्रमाणावर नियंत्रण ठेवावे.

याव्यतिरिक्त उबदार वातावरणात राहण्याचा प्रयत्न करावा. शक्य असल्यास लोकरीचे वस्त्र किंवा उबदार शालीने अंग झाकून घ्यावे. शक्यतो पिण्यास योग्य असेल एवढे गरम पाणी प्यावे. सकाळी किंवा सायंकाळी चहासारखे पेय गरम असताना सेवन करावे.

वैद्य शैलेश नाडकर्णी

vdshailesh@sdindia.com

(शब्दांकन – मीनल गांगुर्डे)