डॉ. बिपिन विभूते

लिव्हर सिऱ्हॉसिसम्हणजे काय?

Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
how to make kala masala at home recipe
Recipe : आजीबाईंनी दिलेल्या प्रमाणाने घरच्याघरी बनवा ‘गोडा मसाला! लिहून घ्या हे प्रमाण
Household Consumption Expenditure Survey 2022-23
भारतीय कशावर किती खर्च करतात माहितीये? HCES च्या अहवालातून आली ११ वर्षांची आकडेवारी समोर!
Monkey torture
माकडाला झाडावर उलटे टांगून अनन्वित अत्याचार; वन्यजीवप्रेमींकडून कारवाईची मागणी

आपल्या आपण नवीन पेशी तयार करून पुन्हा वाढू शकणारा असा यकृत हा शरीरातील विशेष अवयव. पण जेव्हा ही प्रक्रिया यकृताला वारंवार करावी लागते, तेव्हा कधी तरी पेशींची फेरनिर्मिती करण्याची त्याची क्षमता संपते. त्यानंतर यकृताच्या पेशी मृत होत राहिल्या तर अशा पेशींच्या गाठी बनतात. यकृतात जिथे-जिथे असे घडते, तो भाग अशा रीतीने खराब होत जातो. यकृत प्रमाणाबाहेर खराब होऊन त्यात गाठी होणे यालाच वैद्यकीय भाषेत ‘लिव्हर सिऱ्हॉसिस’ असे म्हणतात.

यकृत खराब कशामुळे होते?

यकृत खराब होऊन ‘लिव्हर सिऱ्हॉसिस’ होण्याची अनेक कारणे आहेत. लिव्हर सिऱ्हॉसिसच्या ३० टक्के रुग्णांमध्ये त्याचे कारण दारूचे सातत्याने अतिसेवन हे असते. ३० टक्के लोकांमध्ये हिपेटायटिस ‘बी’, हिपेटायटिस ‘सी’, विषाणुजन्य कावीळ किंवा काही विशिष्ट औषधांमुळे ही प्रक्रिया घडते. पॅरॅसिटॅमॉल किंवा काही पेनकिलर्स आणि इतरही काही औषधे सारखी घेतली गेली तर त्यामुळे यकृत खराब होऊ शकते. काही आयुर्वेदिक औषधेही यात येतात. उर्वरित रुग्णांमध्ये मात्र त्याची निश्चित कारणे सांगता येत नाहीत. तरीही मधुमेह, उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्टेरॉल, थायरॉइडचा त्रास आणि स्थूलता असलेल्या व्यक्तींमध्ये ‘फॅटी लिव्हर’ची समस्या निर्माण होऊ शकते. या समस्येवर वेळीच उपचार केले गेले नाहीत, तर त्याचे पर्यवसान लिव्हर सिऱ्हॉसिसमध्ये होऊ शकते.

लक्षणे कोणती?

रोजच्या जीवनासाठी आपले शरीर यकृताच्या केवळ ३० टक्के क्षमतेचाच वापर करते. उर्वरित ७० टक्के क्षमता नेहमी अतिरिक्त असते, आणि अडीनडीच्या वेळी शरीर ती वापरते. त्यामुळे यकृत जेव्हा ६०-७० टक्के खराब होते तेव्हाच त्याची पहिली लक्षणे दिसू लागतात. अशक्तपणा व थकवा हे यकृत खराब होण्याचे पहिले लक्षण असू शकते. दारूचे व्यसन असणाऱ्यांमध्येही ताजेतवाने न वाटणे, कामात लक्ष न लागणे, रात्री झोप न येणे या तक्रारी प्रामुख्याने दिसतात. यावर उपाय म्हणून अनेकदा ही मंडळी दारूसेवनाचे प्रमाण वाढवतात. पण त्यामुळे यकृताची स्थिती बिघडत जाते. त्यानंतर पायावर सूज येणे, पोट फुगणे, पोटात पाणी होणे, वजन कमी होणे, आणखी पुढच्या टप्प्यात स्नायू सैल पडणे, त्वचा कोरडी व काळसर पडणे, अंगात शक्ती नसल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसतात. रक्ताच्या उलटय़ा होणे, मूत्रपिंडावर ताण येणे, फुप्फुसात पाणी होणे, मेंदूच्या गोंधळलेल्या अवस्थेपासून ‘कोमा’पर्यंतही लिव्हर सिऱ्हॉसिसच्या रुग्णांची लक्षणे जाऊ शकतात.

यकृत खराब झाल्यावर..

यकृत खराब होण्याच्या तीन पातळ्या मानल्या जातात. रुग्ण यापैकी कोणत्या अवस्थेत आहे, त्यावरून त्याच्यासाठीचे उपचार ठरवले जातात. लिव्हर सिऱ्हॉसिसच्या अगदी पहिल्या पातळीत यकृत खराब होऊ लागलेले असते, पण पायावर सूज येणे किंवा पोटात पाणी होण्यासारखी लक्षणे या रुग्णांना नसतात. या अवस्थेत औषधोपचारांनी यकृत आणखी खराब होण्यापासून थांबवता येते. इथे एक लक्षात घ्यायला हवे, की सिऱ्हॉसिस झाल्यानंतर ते पूर्णत: बरे होत नाही, पण औषधांनी त्यावर नियंत्रण मिळवता येते. त्याच्या पुढच्या टप्प्यातल्याही काही निवडक रुग्णांना औषधोपचारांनी फायदा होतो, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या पातळीवर असलेल्या आणि यकृत खूपच खराब झालेल्या रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाचा पर्याय दिला जातो. यकृत प्रत्यारोपण झालेल्यांपैकी जवळपास ९० टक्के रुग्ण सामान्य जीवन जगू शकतात.

प्रतिबंध कसा करावा?

  • आरोग्यदायी जीवनशैली अवलंबणे हाच लिव्हर सिऱ्हॉसिस होऊ नये यासाठीचा उत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे.
  • ज्यांना दारू पिण्याची सवय आहे, त्यांनी कुठे थांबावे याचा वेळीच विचार करणे गरजेचे.
  • मद्यपी व्यक्तींमध्ये वेळोवेळी यकृतासाठीच्या तपासण्या आवश्यक आहेत. लिव्हर सिऱ्हॉसिसच्या दिशेने प्रवास सुरू आहे असे लक्षात आले तर त्यांना यकृत आणखी खराब होणे टाळण्यासाठी दारूचे सेवन थांबवून जीवनशैलीत सकारात्मक बदल करावे लागतात.
  • हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आणि बदललेल्या जीवनशैलीत चाळीस वर्षांवरील व्यक्तींनी पन्नास वर्षांचे होईपर्यंत प्रत्येक तीन वर्षांनी प्रतिबंधक तपासणी करणे, तर पन्नास वर्षांनंतर प्रतिवर्षी तपासणी करून घेणे चांगले. यात काही रक्तचाचण्या व यकृताच्या अल्ट्रासाऊंड चाचणीचा समावेश होतो.
  • हिपेटायटिस ‘बी’ व ‘सी’ झालेला असल्यास त्यावर वैद्यकीय सल्ल्याद्वारे नियंत्रण ठेवता येते.
  • लिव्हर खराब करू शकतील अशी औषधे वैद्यकीय सल्ल्याने घेतलेली बरी.

‘लिव्हर सिऱ्हॉसिस’ हे शब्द घाबरवून टाकणारे आहेतच, पण ते बुचकळ्यात पाडणारेही आहेत. एखाद्याला ‘लिव्हर सिऱ्हॉसिस’ झाला म्हणजे यकृताशी संबंधित काही तरी असणार, यापलीकडे आपल्याला फारसे काही माहीत नसते. हा आजार नेमका आहे तरी काय, तो कसा होतो आणि तो टाळता येऊ शकेल का, याबद्दल थोडेसे..

drbipinvibhute@gmail.com