मातृत्व ही निसर्गदत्त देणगी. या मातृत्वात अडचणी का व कधी येतात, असा विचार जर वैज्ञानिकदृष्टय़ा केला तर आढळून येईल, जशी अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे, त्यापेक्षा किती तरी अधिक गुंतागुंतीची रासायनिक प्रक्रिया यशस्वीपणे पार पडणे महत्त्वाचे ठरते.

दर महिन्याला ठरावीक कालावधीनंतर चार ते पाच दिवस रक्तस्राव होऊन मासिकपाळी संपते. काही स्त्रियांच्या बाबतीत हे संतुलन गर्भारपणीही पहिल्या तीन महिन्यात आढळते. यामुळेच काही स्त्रियांना गर्भाची जाणीव तज्ज्ञ डॉक्टरने तपासणी केल्याखेरीज समजत नाही. गर्भधारणा राहिल्यानंतर काही वेळेस हे फलित बीज गर्भाशयात येऊन विसावण्याआधी अंडनलिकेतच विसावते. अशा वेळी ही गर्भधारणा तीन महिन्यांहून अधिक वाढूच शकत नाही, गर्भधारणा राहिल्यानंतरही काही वेळेस रक्तस्राव अनियमित होत असेल व पोटात अतिशय दुखत असेल तर योनीमार्गातून केल्या जाणाऱ्या तपासणीसमवेत अल्ट्रासोनोग्राफीतून ही माहिती सुस्पष्टपणे मिळते व त्यानुसार औषधोपचार करून त्या मातेचा जीव वाचू शकतो.

दोन ते तीन महिन्यांची गर्भधारणा राहिल्यानंतर पुन्हा रक्तस्राव होणे हे काळजीचेच. सोनोग्राफीत काही वेळेस गर्भाबरोबर एखादी रक्ताची गुठळीसुद्धा (हिमॅटोमा) दिसते. ही गाठ वाढल्यास काही अंशी गर्भास इजा पोचू शकते. रक्तस्रावाचा वीटकरी रंग गर्भ नीट वाढत नसल्याचे निदान असू शकतो. ही गर्भधारणा गर्भपाताकडे झुकू लागते. तज्ज्ञ डॉक्टरांकडून याबाबत सल्ला घ्यावा. काही स्त्रियांच्या बाबतीत गर्भधारणा अधिक महिन्यांची दिसू लागते. गर्भधारणेच्या बरोबर द्राक्षासारख्या घडांची वाढ दिसून अल्ट्रासोनोग्राफीतून दिसते. याही वेळेस रक्तस्राव होतो. या स्थितीला ‘व्हेसिक्युलर मोल’ असे म्हटले जाते.  यावर त्वरित इलाज करावा लागतो नाहीतर अतिरक्तस्रावाने जिवास धोका पोहोचू शकतो.

काही वेळेस बाळात व्यंग दिसल्यास वा तशी शक्यता असल्यास गर्भाच्या जिवास धोका पोहोचणार नाही अशी काळजी घेऊन अल्ट्रासोनोग्राफीच्या साहाय्याने पेशींचा तुकडा घेऊन जनुकांच्या अभ्यासासाठी (कोरिओनिक व्हिलस सँपिलग) पाठविला जातो. तसेच बाळाच्या सभोवती असलेल्या आवरणातून पाणी काढून ते तपासणीसाठी(एॅमनिओसेंटेसिस) पाठविले जाते. अशा वेळेस रक्तस्राव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रक्तगट निगेटिव्ह असल्यास बाळाची वाढ होता होता कधीतरी अचानक रक्तस्राव होऊ शकतो. अशा वेळी बाळाची व आईची काळजी घेणे आवश्यक आहे.

गर्भधारणा दोन-तीन महिन्यांच्या कालावधीतील या अडचणी. त्यानंतरच्या काळातील रक्तस्राव हा नाळेच्या स्थिरावण्याच्या स्थितीवर अवलंबून असतो. जर नाळेचा बहुतांश भाग गर्भाशयाच्या मुखाच्या अगदी वर असेल तर रक्तस्राव होत नाही, परंतु नाळेचा काही भाग हा गर्भाशयाच्या मुखावर आच्छादित करत असेल तर त्या स्त्रीला गर्भारपणी उठता बसता रक्तस्राव होऊ शकतो.  यासाठी संपूर्ण विश्रांती व डॉक्टरी संवाद आवश्यक आहे.  यात अनेक प्रकार आहेत. काही वेळेस सातव्या महिन्यातच रक्तस्राव सुरू झाला तर मूल व माता या दोघांच्या जिवास हानी पोहोचू शकते. अशा वेळेस सिझरिअनचा पर्याय निवडावा लागतो.

नसíगक प्रसूती वा (सिझेरिअन) अनसíगकरीत्या प्रसूतीदरम्यान रक्तस्राव नेहमीपेक्षा अधिक होतो त्यावेळेस नाळेचा काही भाग गर्भाशयाच्या आवरणात असल्यामुळे हा रक्तस्राव थांबविता येत नाही. अशा वेळेस करावयाची उपाययोजना त्वरित करावी लागते. तसेच काही वेळेस प्रसूतीपूर्व नाळेचा काही भाग गर्भाशयाच्या आवरणापासून सुटा होतो. यामुळे होणारा रक्तस्राव थांबविण्यास प्रसूती लवकर करणे भाग पडते. नाळेच्या स्थितीवर व गर्भाशयाच्या किती आवरणापर्यंत ती व्यापिली आहे हे महत्त्वाचे असून नाळेतून बाळाचे होणारे पोषणही महत्त्वाचे हवे.

रक्तस्राव हा गर्भारपणीच होतो असे नाही तर प्रसूती झाल्यानंतरही सुमारे ४० दिवस चालूच रहातो. परंतु प्रसूती झाल्यानंतर लगेचच अतिरक्तस्राव होत असेल तर त्याची कारणे अनेक व वेगळी असू शकतात. ज्यांना एकापेक्षा अनेक गर्भ असतील त्यांनी विशेष करून लक्ष द्यावे. तसेच प्रसूतीनंतर नाळ पूर्णपणे शरीराबाहेर टाकण्याची क्रियाही २० ते ३० मिनिटांत झाली नाही तर भूल देऊन नाळ तिच्या आवरणांसहित बाहेर काढली जाते.

लोहघटकाचे कमी प्रमाण, आधीच असलेला जंतुसंसर्ग, रक्तघटकांची कमतरता यामुळे काही स्त्रियांना अतिरक्तस्राव होतो व त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. या स्थितीला डी.आय.सी. (डीससेमीनेटेड इन्ट्राव्हॅस्क्युलर कोएॅगोलोपॅथी) म्हणतात. यात होणारी जीवित हानी टाळणे असंभव ठरते. म्हणूनच वेळीच उपाययोजना अवलंबिणे हितकारक असते.

वेगवेगळ्या स्थितीतील गर्भारपणी होणारा रक्तस्राव जाणून घेतल्यानंतर खरंच असं वाटेल की प्रसूती म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्मच. सर्व काही सुरळीत होत असेल तर प्रश्नच नसतो, परंतु प्रसूतीच्या प्रत्येक टप्प्यावर सतर्क राहून त्याप्रमाणेच उपाययोजना योग्य मार्गाने झाल्यास अशा वेगवेगळ्या पद्धतीने, कारणांनी होणारा रक्तस्राव आटोक्यात आणून चांगल्या फलिताचा विचार करू शकतो.

rashmifadnavis46@gmail.com