मासिकपाळीच्या अनियमितपणानंतर लक्ष देण्यास हवे ते त्या कालावधीत होणाऱ्या रक्तस्रावाकडे. हा रक्तस्राव तीन ते पाच दिवस राहणे आरोग्यदायी, परंतु अधिक दिवस असेल तर अर्थातच लक्ष देण्यास हवे. तसेच या कालावधीत होणाऱ्या रक्तस्रावासाठी जर दिवसागणिक तीन ते चार सॅनिटरी नॅपकीन बदलण्याऐवजी ती संख्या अधिक होत असेल तर रक्तस्राव नक्कीच विचार करण्यास लावतो.
मुलीनं वयात येणं हा कालावधी ९ ते ११ वष्रे समजला जातो. यात येणारी मासिकपाळी काही वेळेस एका वर्षांत नियमित होते वा त्यानंतर होणारा रक्तस्राव अधिक होऊ शकतो. मासिकपाळीच्या वेळी होणारा असा अतिरक्तस्राव हा संप्रेरकाच्या (हार्मोन्स) असंतुलनामुळे होतो, कारण सुरुवातीची काही वष्रे अंडकोशातून अंडनिर्मिती होत नसते ( अनओव्ह्युलेटरी सायकल) परंतु अशा वेळेस दुर्लक्ष करून चालत नाही.
अतिरक्तस्रावाची अनेक कारणे आहेत. त्यात सर्वात जास्त कारण आढळते ते अपुऱ्या हिमोग्लोबिनचे. तसेच रक्तातील काही घटकांची कमतरता. उदा. हिमोफिलिया, व्हिटॅमिन-केची कमतरता, थॅलेसेमिया मेजर इत्यादी, अंडकोशाची गुल्मे (सिस्ट), कर्करोग, काही वेळेस शारीरिक इजा झाल्याने तर शस्त्राने योनीमार्गात केलेल्या जखमेमुळे (बकेट हॅन्डल टीयर) वा गर्भधारणा राहिल्यानंतर झालेल्या गर्भपातामुळे रक्तस्राव होऊ शकतो.
मासिकपाळी प्रथम येऊन गेल्यानंतर नियमितपणे योग्य रक्तस्राव होणे हे हायपोथॅलॅमस, पिटय़ुटरी, अ‍ॅड्रिनल, ओव्हेरियन यांच्या कार्यसंतुलनावर अवलंबून आहे. यात थॉयरॉइड ग्रंथीचाही समावेश आहे. म्हणूनच अधिक रक्तस्राव होत असल्यास स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला वेळीच घ्यावा. मासिकपाळी प्रारंभ झाल्यानंतर जसं रक्तस्रावाकडे लक्ष द्यायला हवे तसेच मुले झाल्यानंतर वयाच्या चाळिशीच्या आसपास होणारा रक्तस्राव हा नानाविध कारणांनी होऊ शकतो. तसेच मासिकपाळी बंद झाल्यानंतर म्हणजेच रजोनिवृत्तीनंतर काही वर्षांनी अचानकपणे उद्भवलेला रक्तस्राव ही गंभीर बाब असू शकते. याबद्दल आपण नंतर माहिती घेऊ.
मासिकपाळी सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच जेव्हा अधिक रक्तस्राव होतो, त्याचे प्रमाण सर्वसाधारणपणे ५ ते २० टक्के आढळून येते. काही वेळेस रक्तघटकातील हिमोग्लोबिन द्रव्याची कमतरता, तर काही रक्तघटकांची कमतरता उदा. हिमोफिलिया, परप्युरा, रक्त गोठण्याच्या क्रियेतील घटकांची कमतरता ही रक्ततपासणीअंती आढळून आली आहे. याची योग्य तपासणी होऊन त्यावर योग्य तो उपचार त्वरित झाल्यास रक्तस्राव कमी करता येतो. वयाच्या आठव्या वर्षी येणारी मासिकपाळी ही अनियमित होऊन त्या मुलीस संप्रेरकाच्या (हार्मोन्सच्या) असंतुलनामुळे अतिरक्तस्रावास सामोरे जावे लागते. अशावेळेस हार्मोन्स वा संप्रेरके द्यावीत वा न द्यावीत यावर योग्य तो विचार करावा लागतो.
हल्ली अल्ट्रासोनोग्राफीमुळे जननेंद्रियांची तपासणी करता येते. गर्भाशयाच्या आवरणाच्या जाडीवर कोणते औषध किती प्रमाणात द्यावयाचे ते ठरविता येते. काहीवेळेस नाइलाजाने अगदी कमी प्रमाणातील इस्ट्रोजेन-प्रोजेस्टेरॉन ही द्रव्ये द्यावी लागतात. तसेच नवनवीन संशोधनाने रक्तस्राव कमी करण्यास इंजेक्शन्स व गोळ्या उपयोगी पडतात.वयाच्या २८ ते ४५व्या वर्षांच्या कालावधीतील वा त्यापेक्षा अधिक कालावधीतील रक्तस्रावाचे निदान गर्भाशयाचे आवरण तपासणीसाठी पाठविल्यास कळू शकते. यालाच पिशवी साफ करणे वा डायलटेशन व क्युरेटाज म्हणतात. रजोनिवृत्तीनंतर येणारी पाळी हे कर्करोगाचे निदान करते, तसेच स्त्रीला अतिरक्तस्राव मासिकपाळीदरम्यान होत असल्यास अडिनोमायोसिस, अंडकोशाची गुल्मे, गर्भाशयावरील गाठी, गर्भाशयाचा वा ग्रीवेचा कर्करोग, क्षयासारखी व्याधी वा थॉयरॉइड ग्रंथीचा त्रास आहे किंवा नाही हे पडताळून पाहणे आवश्यक आहे.
संगणकाद्वारे मिळणारी योग्य माहिती प्रत्येक स्त्रीरुग्णास माहितीपूर्ण ठरेल असे नाही. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाखाली रक्ततपासणी, शारीरिक तपासणी उपचारासाठी उपयुक्त ठरते. योग्य निदान झाल्यास मासिकपाळीदरम्यान होणारा अतिरक्तस्राव आटोक्यात येऊन त्याचे विपरीत परिणाम टाळता येतात.
rashmifadnavis46@gmail.com

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
MHADA e-auction shops Mumbai
म्हाडाच्या मुंबईतील १७३ दुकानांचा ई लिलाव लांबणीवर; नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला ५ जूनपर्यंत मुदतवाढ