डॉ. संजीवनी राजवाडे

पावसाळ्यात आजारी पडण्याचे प्रमाण वाढलेले असते. अनेकदा योग्य आहार नसेल तर विकार होतात. त्यामुळे पावसाळ्यात काय खावे, काय खाऊ नये याचा घेतलेला वेध..

पावसाळ्यात पालेभाज्यांचा वापर शक्यतो कमी करावा. त्यांना चिखल लागलेला असतो किंवा काही वेळा घाण पाणी त्यावर मारले जाते. खाण्यापूर्वी या भाज्या स्वच्छ धुतल्या नाहीत तर त्यामुळे त्रासच होण्याची शक्यता अधिक असते. पालेभाज्या पचवण्यास आपल्या आतडय़ांना अधिक काम करावे लागते व पावसाळ्यात सर्वसाधारणत: पचनशक्ती थोडी कमी झालेली असते. त्यामुळे पालेभाज्या खायच्याच असतील तर कोरडय़ा पाहून घ्याव्यात व शिजवण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घ्याव्यात. कोबी वा फ्लॉवरच्या आतही खराब पाणी जाऊ शकते, त्यामुळे अशा भाज्याही नीट धुऊन वापरणे योग्य.

फळभाज्या व शेंगभाज्या पावसाळ्यात अवश्य खाव्यात. त्यांच्या आत पाणी शिरण्याचा प्रश्न नसतो. फळभाज्यांमध्ये दुधी, घोसाळी (गिलकी), दोडका, तोंडली, लाल भोपळा, पडवळ, कोहळा या भाज्या खाव्यात. गवार, फरसबी, चवळीच्या शेंगा जरूर वापराव्यात.

कोहळा सहसा फारसा खाल्ला जात नाही, परंतु कोहळ्याची भाजी करून या ऋतूत खायला हरकत नाही.

काही विशिष्ट भाज्या केवळ पावसाळ्यात मिळतात. उदा. टाकळ्याची पालेभाजी, अळू इ. त्या ऋतूत एक-दोन वेळा स्वच्छ धुऊन मग वापरण्यास हरकत नाही.

ज्यांना पचनाचे त्रास आहेत त्यांनी शक्यतो भाकरीच खावी. ज्वारी, बाजरी, नाचणी अशी कोणतीही भाकरी चालू शकेल. भाजणीचे थालीपीठही पावसाळ्यातील मधल्या वेळेसाठी उत्तम. भाजणीतील धान्ये भाजली गेली असल्यामुळे ती पचायला हलकी झालेली असते. शिवाय त्यात धणे, जिरे या गोष्टी असल्यामुळे ते पचनास सोपे होते.

मुगाचा वापर या दिवसांत जास्त करावा. चणाडाळीच्या पिठापेक्षा ते वापरले तर उत्तम. भजी, धिरडी, घावन किंवा अगदी भाज्यांना लावण्यासाठीही मुगाचे पीठ वापरता येते.

तिखट पदार्थामध्ये आले व गोड पदार्थात जायफळ आवर्जून घाला. वाटणाच्या मसाल्याच्या रस्साभाज्या करताना वाटणात थोडी खसखस, बडी इलायची व छोटी इलायची जरूर घालाव्यात. पावसाळ्यातील जुलाबाचा होणारा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी खसखशीचा उपयोग होतो. बडी इलायची आतडय़ांच्या निरोगी आरोग्यासाठी मदत करते, तर छोटी इलायली पोटाच्या वरच्या भागावर काम करते. त्यामुळे हे तीन पदार्थ या दिवसांत फायदेशीर ठरतात.

जेवणात आमसुलाची चटणी अवश्य हवी. ती पित्तशामक, पाचक व रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी असते. त्यासाठी आमसुले पाण्यात भिजत घालून त्यात मीठ, लाल तिखट, साखर, जिरेपूड घालून मिक्सरमधून फिरवावे. धिरडे व थालीपिठांबरोबर ही चटणी छान लागते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ‘क’ जीवनसत्त्व व झिंकचा उपयोग होतो. प्लम, पीच ही फळे, टोमॅटो, ताक, आवळ्याचे सरबत यातून ‘क’ जीवनसत्त्व मिळते. तीळ, शेंगदाणे व जवस समप्रमाणात घेऊन त्याची सुकी चटणी करून ठेवली तर त्यातून आवश्यक असलेले ‘झिंक’ मिळते.

रताळी या दिवसांत चांगली मिळतात व या दिवसांत उपवासांचे निमित्तही असते. रताळ्यातही ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्व असते. परंतु रताळे उकडल्यावर त्यातील ‘क’ जीवनसत्त्व नष्ट होते. रताळ्याचा कीस वा थालीपीठ केल्यास अधिक चांगले. त्याबरोबर लिंबाचे लोणचे दिल्यास किंवा वरून लिंबू पिळल्यास नष्ट झालेले ‘क’ जीवनसत्त्व त्या मार्गाने मिळेल.