18 August 2017

News Flash

शुभ्र शत्रू!

पाश्चिमात्यांपेक्षा भारतीय लोकांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार या विकारांचे प्रमाण अधिक आहे.

डॉ. राजेंद्र आगरकर | Updated: March 1, 2017 12:38 PM

साखर, मीठ आणि मैदा.. तीनही पदार्थ शुभ्र रंगाचे! खवय्यांना या तीनही पदार्थापासून तयार होणारे पदार्थ अतिशय आवडीचे. मात्र  शुभ्र रंगाचे हे पदार्थ आरोग्याचे शत्रू आहेत. पांढरा रंग जरी शांतता, निरागसता, पवित्रता यांचे प्रतिक असला तरी हे तीनही पदार्थ आपल्या आरोग्यात अशांततानिर्माण करतात. आरोग्याचे शत्रू असलेल्या या शुभ्र पदार्थाविषयी..

सात मूलभूत रंगांनी एकत्र येऊन निर्माण झालेला आणि शांतता, निरागसता व पवित्रतेचे प्रतीक असलेला दिव्य रंग म्हणजे पांढरा रंग. हा रंग परिधान केलेले आपल्या रोजच्या आहारातील मीठ, साखर आणि मैदा या तीन पदार्थाचे गुण मात्र आरोग्यात ‘अशांतता’ निर्माण करणारे आहेत. गंमत म्हणजे या पदार्थाचे दुर्गुण माहीत असूनही हे पदार्थ अतिशय लोकप्रिय आहेत.

आपण खरच या गोष्टींचा एवढा विचार करण्याची गरज आहे का?

पाश्चिमात्यांपेक्षा भारतीय लोकांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार या विकारांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या १५ ते २० वर्षांत आपल्या देशाची लोकसंख्या दुप्पट झालेली नाही, परंतु उच्च रक्तदाब व मधुमेहींची संख्या दुप्पट झाली आहे. उच्च रक्तदाब व मधुमेह या विकारांवर नियंत्रण आणण्यासाठी फार मोठय़ा प्रमाणात प्रतिबंधक उपाययोजनांची गरज आहे. कुठल्याही रोगाच्या नियंत्रणात ‘प्राथमिक प्रतिबंधक उपाययोजना’ प्रभावी मानली जाते. यात समाजातील रोगाची जोखीम जास्त असलेल्या, परंतु रोगाचा शिरकाव न झालेल्या लोकांमध्ये जोखमीच्या बाबींवर नियंत्रण ठेवून त्यांना रोगापासून दूर ठेवणे हे मुख्य उद्दिष्ट असते. आता मात्र एक पायरी पुढे जाऊन पूर्वप्राथमिक किंवा मूलभूत प्रतिबंधक उपाययोजना राबवायची गरज आहे. मूलभूत प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये ज्या जोखमीच्या बाबींमुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची शक्यता वाढते, त्या गोष्टींवर सर्व लक्ष केंद्रित करून उपाययोजना आखायची असते. असे म्हणतात की, पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी बहुतेक पक्षी मोठय़ा वृक्षांचा, घरटय़ांचा वा कपारीच्या आडोशाचा आश्रय घेतात, परंतु गरुड मात्र ढगांच्या वर जाऊन विहार करतो. मूलभूत प्रतिबंधक उपाययोजना ही गरुडाच्या पद्धतीशी साधम्र्य सांगणारी आहे.

आहारातील ज्या घटकांमुळे या विकारांची शक्यता वाढते, त्या घटकांबद्दल सविस्तर शास्त्रोक्त माहिती प्रत्येकाला असायला हवी.

साखर :

शास्त्रीय भाषेत साखरेला सुक्रोज म्हणतात. सुक्रोजमध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे समप्रमाणात असतात. शरीरातील सर्व पेशी ग्लुकोजचा वापर करू शकतात, परंतु फ्रुक्टोज मात्र यकृताच्या पेशीच हाताळू शकतात. साखर जास्त प्रमाणात वापरल्यास यकृताच्या पेशींना इजा होऊ शकते. मद्यपानामुळे यकृताला ज्या प्रकारची इजा होते, त्याच प्रकारची इजा फ्रुक्टोजमुळे होते, असा अंदाज काहींनी बांधला आहे. याबद्दल वैद्यकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू आहे. यकृत अवांतर फ्रुक्टोजचे रूपांतर चरबीमध्ये करते.

डॉ. रॉबर्ट लस्टिग यांनी आपल्या ‘फॅट चान्स’ या पुस्तकात साखरेला चक्क विषाची उपमा दिली आहे. अर्थात कुठलीही टोकाची भूमिका वादग्रस्त होतेच. याबद्दल कितीही वाद असले तरी जागतिक आरोग्य संस्थेने मात्र साखरेच्या वापरावर अंकुश ठेवण्याबाबत आग्रह धरला आहे. जागतिक आरोग्य संस्थेने सर्वसाधारण प्रौढ व्यक्तीला दिवसाकाठी फक्त २५ ग्रॅम म्हणजे ५ ते ६ चमचे साखर आहारात घेण्याची मुभा दिली आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशन मात्र पुरुषाला ३७.५ गॅ्रम आणि स्त्रियांना २५ गॅ्रम साखर अशी शिफारस करते.

एखाद्या विषयावर वाद निर्माण झाला की बहुतेक जण आपल्याला सोयीची बाजू उचलून धरतात. कुठलेही पोषणमूल्य नसलेल्या साखरेला आपल्या आहारात स्थान असू नये. किमान आपल्या गोडधोड खाण्यावर, आपल्या शीतपेयांवर नक्कीच र्निबध असायला पाहिजे. जगात सर्वाधिक जास्त साखर फस्त करणारा देश अशी आपली ओळख आहे.

मैदा :

आहारात चोथ्याला खूप महत्त्व आहे. मैद्यामध्ये औषधालाही चोथा नतसो. दुर्दैवाने आपल्या आयुष्यात सकाळच्या चहाबरोबरच्या बिस्किटापासून मैदा प्रवेश करतो. त्यानंतर केक, नूडल्स, पास्ता, तंदुरी रोटी, पिझ्झा, वडापाव, बर्गर यांच्या माध्यमातून स्वैर संचार सुरू असतो. आपल्या देत हे सर्व पदार्थ खरे तर इतर पदार्थापेक्षा महाग म्हणून जास्त प्रतिष्ठित समजले गेले आणि पर्यायाने त्याचे आकर्षण वाढले. एका बाजूला भरपूर उष्मांक आणि प्राणिजन्य मेद पण चोथ्याची आणि पौष्टिक तत्त्वांची कमतरता यांमुळे शास्त्रीयदृष्टय़ा बघता या पदार्थाना रोजच्या आहारामध्ये स्थान नाही. दुर्दैवाने या पदार्थाना त्यांच्या चवीमुळे लोकमान्यता मिळाली आणि या पदार्थाचा खप वाढला. कार्यालयात जाणारी कित्येक मंडळी दुपारच्या जेवणासाठी हा फास्टफूड प्रकार पसंद करतात. श्रमकरी मंडळीही वडापावसारख्या देशी बर्गरचा आश्रय घेऊ लागली आहेत. शाळा कॉलेजच्या उपाहारगृहात याच पदार्थाचा खप जास्त होताना दिसून येतो. जी गोष्ट फास्टफूडची तीच गत शीतपेयांची आहे. अमेरिकेत केलेल्या विविध सर्वेक्षणात शीतपेय व फास्टफूड यांचे सेवन करण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये आणि कुमार वयातल्या मुलांमध्ये प्रचंड आढळले.

ज्या पदार्थामध्ये मैदा, पांढरे मक्याचे पीठ, प्राणिजन्य मेद यांचा वापर जास्त प्रमाणात असतो, ते सर्वच पदार्थ आरोग्याला घातक असतात. विशेषत: नियमितपणे व जेवणामधल्या पारंपरिक पदार्थाना पर्याय म्हणून वापरल्यास मैद्यापासून केलेले ब्रेड, पाव, केक, पेस्ट्रीज, बिस्किटे, नान व रोटी या सर्वामध्ये चोथ्याचे प्रमाण अत्यल्प असते.

आपल्या देशात येत्या १० ते १५ वर्षांत मधुमेह, अतिरक्तदाब आणि हृदयविकार यांचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे आरोग्यसेवांवर भरपूर ताण पडणार आहे याबद्दल वाद नाही. या रोगांच्या रुग्णांची संख्या जगभर वाढत असली तरी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे आजार इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात बऱ्याच तरुण वयात उद्भवतात.

साखर, मीठ आणि मैदा या तीनही पदार्थाबाबत जागतिक आरोग्य संस्थेने सावधानतेचा इशारा दिला आहे. पण.. लक्षात कोण घेतो?

मीठ :

मिठाबद्दल असा समज आहे की, मीठ खारट असल्यामुळे गरजेपेक्षा जास्त कुणीच खाणार नाही. प्रथमदर्शनी हे पटणारे विधान आहे, परंतु  जगभरात विविध ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणातून हे दिसून आले आहे की आपण आपल्या गरजेपेक्षा बरेच जास्त मीठ खातो. साधारणपणे ३.५ ते ५ ग्रॅम मीठ आपल्याला पुरेसे असते. आपण मात्र ८ ते १० ग्रॅम मीठ खातो. नेहमीच्या स्वयंपाकापेक्षा लोणची, पापड, खारवलेले मासे, वेफर, फरसाण या प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थावाटे मीठ जास्त शरीरात जाते. शरीरात सोडियम जास्त आणि पोटॅशियम कमी असे व्यस्त प्रमाण उच्च रक्तदाबाला पूरक असते.

मिठामुळेही मेंदूत डोपामिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे मिठाचे व्यसन लागू शकते याला शास्त्रीय आधार मिळतो. जास्त मिठामुळे उच्च रक्तदाबाबरोबरच मूत्रपिंड, मेंदू, त्वचा या अवयवांना अपाय होतो. जास्त मिठामुळे शरीरातील कॅलशियमवर विपरीत परिणाम होतो आणि पर्यायाने हाडांचे आरोग्य बिघडते. मिठामुळे जठराच्या पटलावर अनिष्ट परिणाम होतात.

First Published on February 16, 2017 12:33 am

Web Title: sugar salt maida losses
  1. S
    Soniya
    Feb 16, 2017 at 2:59 am
    Very good article. Thank you. It's a shame that people mostly in metro cities don't ask for water in fast food hotels. Either they are too shy to ask or just ignorant. They are replacing water with harmful cold drinks. All celebrities endorsing cold drinks who are very health conscious themselves should be hated for their lack of integrity. One question...what if I ate sufficient d along with bread?
    Reply