‘‘इक्षवो मधुरा मधुरविपाका गुरव: शीता: स्निग्धा बल्या वृष्या

मूत्रला रक्तपित्तप्ररामना: कृमिकराश्चेति!’’

(सु. सू. अ. ४५)

वेदकालाच्या पहाटेपासून सर्व जगभर मानवी उत्क्रांती सातत्याने घडत आहे. मानवाच्या पहिल्यावहिल्या काहीशे वर्षांत प्रथम विविध प्रकारचे गवत किंवा तृण असे. वेगवेगळ्या निमित्ताने त्याचा वापर होत असे. यातील एक गोड चवीच्या गवताचा प्रवास म्हणजे आजचा ऊस होय, असे मानववंश शास्त्रज्ञ म्हणतात. उसाचा मूलनिवास भारतच आहे, असे जगनमान्य सत्य आहे. चारही वेदात तसेच चरक सुश्रुत संहितांमध्ये उसाच्या अनेकानेक प्रकारांचे विस्ताराने केलेले वर्णन वाचून तुम्ही अचंबित होऊन जाऊ शकता.

श्री चरकाचार्यानी पौंङ्गिक  व वंशक असे दोन प्रकारचे ऊस सांगितले आहेत. श्री सुश्रुताचार्यानी याचे अधिक भेद करून बारा प्रकारचे वर्णन केले आहेत. पौंङ्गिक, भीरूक, वंशक, शतघोरक, कान्तार, तापस, काष्ठेक्षु, सूचीपत्रक, नैपाली, दीर्घपत्र, नीलपोर व कोशकार. उत्तर प्रदेशात हे सर्व प्रकारचे ऊस पाहायला मिळतात. यांच्या नावांमध्ये पुढीलप्रमाणे बदल झालेला दिसतो. सफेद ईख, अगरील, काला पौंडा, लाल पौंडा, देहरादूनी पौंडा, सहारनपुरी पौंडा, देशी ईख, सागरी पौंडा, काली अगरौल, नीली ईख, घौल ईख, चीन ईख इत्यादी. यातील काही दातांनी चुसण्याच्या कामात येतात आणि इतर कठीण ऊस साखर, गूळ, काकवी तयार करण्यासाठी वापरतात. या सर्वात सहरानपूरचा सफेद, सागरी गन्ना अधिक कोमल व श्रेष्ठ समजतात.

आपल्या महाराष्ट्रात कोकण आदी भागांत निपाणी नावाची जात आहे. या उसाची जाडी, उंची भरपूर असते आणि तो परिपूर्ण असतो. दक्षिण भारतात एक बेडा ऊस नावाची जात विविध बगिच्यांमध्ये व सागरी किनारपट्टी भागात पाहायला मिळते. याची उंची लगभर दोन ते अडीच फूटच असते. याचा उपयोग तांत्रिक औषधी प्रयोगांकरिता केला जातो. १९व्या शतकाच्या अखेपर्यंत जुनेजाणते वैद्य हकीम या उसाचा तंत्रविद्या प्रयोगासाठी व मंथरसारख्या अवघर ज्वर विकारात करत असत. या प्रकारच्या उसाला तुलनेने कमी पाणी लागते.

महाराष्ट्रातील उसाची लागवड, साखर कारखान्यांमध्ये उसाचा भरपूर वापर आणि त्यासाठी पाण्याचा प्रचंड गैरवापर याबद्दल शेतीतज्ज्ञांमध्ये खूप मतभेद आहेत. उत्तर भारतात उसापासून प्रामुख्याने कच्ची साखर बनवली जाते. महाराष्ट्रात मात्र पक्की साखर सर्वत्र तयार केली जाते. उसाचा आणखी वापर गूळ, खडीसाखर व काकवीसाठी होतो. काकवी सौम्य रेचक आहे. काकवी इतर पदार्थामध्ये मिसळली असता त्या पदार्थास सडू देत नाही. ‘मला क्वचित खूप थकवा आल्यास साखरेचे पाच-दहा कण तोंडात ठेवल्यास बरे वाटते. तोंडात व घशात ओलावा येतो.’ आवाज सुटतो. बालकांस खूप उचकी लागल्यास साखर तोंडात टाकल्याबरोबर उचकी बंद होते. साखरेमुळे दारू व अन्य अमली पदार्थाचा कैफ लगेच उतरतो. बेचैनी साखरपाण्याने लगेच संपते. मूत्राचे प्रमाण कमी असल्यास चमचाभर साखर घ्यावी, लघवी वाढते. मुखपाकासाठी तोंडात साखर धरल्यास सत्वर फायदा होतो. साखरेने हृदयास पुष्टी मिळते, असे जरी असले तरी मधुमेहग्रस्त रुग्णांनी साखरेपासून लांब राहावे. साखरेपेक्षा गूळ केव्हाही चांगला हे सर्वमान्य सत्य आहे.