स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार असून विषाणू एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होऊ  शकतात. एच वन एन वन विषाणूंचा संसर्ग झालेली व्यक्ती शिंकली किंवा खोकली तर त्यातून विषाणू संक्रमित होतात. स्वाइन फ्लू हा इतर फ्लूप्रमाणेच आजार आहे. त्याने घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र मुले, आजारी व्यक्ती व वृद्ध यांची प्रतिकारकक्षमता कमी असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी.

स्वाइन फ्लूच्या विषाणूंचा संसर्ग झाल्यावर साधारण १ ते ४ दिवसांनंतर लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे तीन ते सात दिवस टिकतात, तर काही रुग्णांमध्ये दोन आठवडे किंवा त्याहून अधिक काळापर्यंत ताप, खोकला राहतो.

१२ वर्षांखालील मुलांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने त्यांना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. मुलांमध्ये ताप, घसा दुखणे व अंगदुखी ही लक्षणे दोन दिवसांपेक्षा अधिक दिवस दिसून येत असतील, तर त्वरित डॉक्टरांना भेटावे. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविषयक आजार, सीओपीडी किंवा इतर कोणतेही गंभीर फुप्फुसाचे आजार यांनी पीडित असलेल्या व्यक्तींनाही स्वाइन फ्लू झाल्यास स्थिती गंभीर होण्याची शक्यता असते. त्यामुळे आजारी व्यक्ती व वृद्धांनीही ताप व खोकला अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वृद्धांनी अधिक प्रमाणात प्रवास करणे टाळावे आणि प्रदूषणापासून दूर राहावे. श्वास घेताना त्रास होत असेल किंवा धाप लागत असेल, तर त्वरित वैद्यकीय उपचार करावा.

उपाययोजना

  • पौष्टिक आहार घ्यावा. फळे व उत्तम प्रथिनांचा समावेश असलेला आहार रोगप्रतिकारकशक्ती वाढवतो.
  • भरपूर पाणी प्या आणि चांगली झोप घ्या.
  • शिंकताना किंवा खोकताना नाकातोंडासमोर रुमाल धरा.
  • डोळे, नाक व तोंडाला स्पर्श करणे टाळा, कारण त्यामुळे विषाणू सहजपणे शरीरात प्रवेश करतात.
  • फ्लूसारखी लक्षणे दिसून आली, तर बाहेर जाणे टाळा. घरीच राहून आराम करा, तसेच लक्षणे वाढत असल्यास डॉक्टरांकडे जा.
  • प्रवास करत असाल, तर तोंडाला मास्क लावा, कारण शिंकल्याने किंवा खोकल्याने विषाणूच्या संक्रमणाचा धोका वाढतो.
  • भरपूर पाणी प्या आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेळेवर औषधे घ्या.

डॉ. प्रेयस वैद्य