लहान बाळाला जुलाब होऊ लागले किंवा बाळ आजारी पडले की पालकांचा पहिला प्रश्न असतो, ‘बाळाला दात येत आहेत का?’.. दुधाचे दात येताना बाळांना ताप येतो, अतिसार होतो, झटके येतात, प्रसंगी मृत्यूही ओढवू शकतो, अशा काही दंतकथा सांगितल्या जातात. वास्तविक, बाळाला दात येणे ही त्याच्या (किंवा तिच्या) शारीरिक विकासाची एक सामान्य प्रक्रिया असते. बाळाची उंची जशी दिवसेंदिवस वाढत जाते तसेच दात येणे ही पण एक फिजिओलॉजिकलक्रिया आहे. त्यामुळे खरे तर  कोणत्याही आरोग्य समस्या निर्माण होत नाहीत

दुधाचे दात येताना बाळाच्या हिरडय़ा सळसळ करतात आणि त्यामुळे ते चिडचिडे बनते, तऱ्हेवाईकपणा करते, अन्न नाकारते, हे मात्र खरे. पहिला दात येताना ही अस्वस्थता सर्वाधिक असते. बाळ चावा घेण्याचा वा कुरतडण्याचा प्रयत्न करते, त्याची लाळ गळते, ते सतत बोटं किंवा काहीतरी वस्तू तोंडात घालू लागते. लाळ गळल्यामुळे बाळाच्या तोंडावर हनुवटीवरच्या त्वचेवर पुरळ येते किंवा ती त्वचा कोरडीही पडू शकते. काही लहान मुले दात येताना स्वत:चे कान ओढताना दिसतात. कारण दात येतानाच्या वेदना कानाकडे संदर्भित होत असतात.

Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : २४ तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब, एका महिन्यात मिळणार भरघोस पैसा अन् यश
Gold price bounced in four hours on Gudi Padwa 2024
गुढी पाडव्याच्या दिवशीच चार तासात सोन्याच्या दरात उसळी; ‘हे’ आहे आजचे विक्रमी दर…
1st April Marathi Rashi Bhavishya
१ एप्रिल पंचांग: महिन्याचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल? ‘या’ राशींच्या लोकांसाठी धन व प्रगतीचे संकेत
April 2024 Monthly Horoscope in Marathi
३० एप्रिलपर्यंत सोन्याचे दिन; १२ राशींपैकी कुणासाठी गुढीपाडवा ठरेल गोड व कुणाला लाभेल रामनवमी? वाचा राशी भविष्य

काही बाळांना जन्मत:च दात असतो. अनेक जण उगाचच त्याला अपशकुन मानतात. असा दात जर हलत असेल, ढिला झाला असेल तर मात्र तो फुप्फुसात जाऊ नये म्हणून काढला जातो.

साधारणत: दुधाचे दात वयाच्या सहा ते नऊ महिन्यांत येऊ लागतात. कधी कधी ते बाळाच्या पहिल्या वर्ष वाढदिवसापर्यंत किंवा त्यानंतरही येतात. सुदृढ बाळांमध्ये उशिरा दात येण्याचे कारण बहुतांशी आनुवांशिक असते. परंतु काही बाळांमध्ये मुडदूस झाल्यामुळे, हायपो थायरॉयडिझममुळे किंवा पिटय़ुटरी ग्रंथीच्या संप्रेरकांच्या आजारामुळे असे होण्याची शक्यता असते.

दात येताना बाळाला ताप येत नाही आणि जुलाबही होत नाहीत. त्यामुळे हे समज चुकीचे आहेत. मात्र काही बाळांमध्ये शौचास होण्याची वारंवारता वाढू शकते. बाळ रोज १-२ वेळा शोच करत असेल, तर त्याला ३-४ वेळा शौचास होऊ शकते. शौचाचा रंग हिरवा असू शकतो. दात येताना होणाऱ्या ‘डिसकंफर्ट’मुळे मूल रात्री झोपेतून उठते. त्यावेळी त्याला कुरवाळून त्याला आराम मिळेल अशा प्रकारे झोपवण्याची गरज असते.

दात येण्याची ही प्रक्रिया अगदी अडीच वर्षे वयापर्यंत सुरू राहते. दोन-अडीच वर्षांची चौकस आणि अस्थिर मुले अस्वच्छ हात वा अस्वच्छ खेळणी तोंडात घालतात, त्यांना दिलेला एखादा कडक खाऊचा अन्नपदार्थ कुरतडतात. या दरम्यान बाळाला संसर्ग होऊन जुलाब (डायरिया) होऊ शकतात. त्यामुळे बाळ आजारी असेल तर प्रत्येक वेळी त्याचा संबंध दात येण्याशी लावणे चुकीचे आहे.

उपाय

दात येणे सुलभ होण्यासाठी किंवा त्यामुळे बाळाला त्रास होऊ नये यासाठी खरे तर कोणतेही औषध उपलब्ध नाही. असे असले तरी जवळपास सर्व माता बाळांना होमिओपॅथीचे एक विशिष्ट औषध कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय देताना बघायला मिळते. दात येताना बाळाला देण्यासाठीच्या जाहिराती केल्या जाणाऱ्या किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांच्या उपयुक्ततेला व्यापक संशोधन अभ्यासाचा आधार नाही.

दात येण्याच्या काळात बाळाला शक्तिवर्धक पूरक आहार मिळणे गरजेचे असते. त्याच्या आहारात कॅल्शियमयुक्त नैसर्गिक अन्नपदार्थ, योग्य प्रमाणात चरबी (फॅटस्), ‘अ’ जीवनसत्त्वयुक्त हिरव्या पालेभाज्या, पिवळ्या व केशरी रंगाची फळे यांचा समावेश आहारात हवा.

दात येण्याच्या वयातील मुले रबरी रिंग वा प्लॅस्टिकची खेळणी चावत राहतात. या मुलांना सहज तुटू शकणारी किंवा छोटे भाग अलग होतील अशी खेळणी देणे पालकांनी टाळावे. चावताना खेळण्याचा एखादा भाग तोंडात जाऊन तो बाळाच्या फुफ्फुसात जाऊ शकतो. अशा वेळी बाळांच्या हातात कडक बिस्किटाचा मोठा तुकडा, खुसखुशीत पावाचा हातात बसेल असा तुकडा, किंवा साल काढलेले गाजर देता येईल. बाळ फारच तापट असेल तर पॅरॅसिटॅमॉलसारखे औषध वेदना कमी करण्यासाठी देता येऊ शकते. आपल्या बाळासाठी ते नेमके कधी व किती प्रमाणात देता येईल याविषयी आपल्या बालरोगतज्ज्ञाशी बोलून घेणे गरजेचे. तसेच बाळांच्या हिरडय़ांना लावायच्या जेलच्या स्वरूपातही वेदनाशामक औषधे मिळतात. ही औषधे लावण्यापूर्वी पालकांनी आधी हात स्वच्छ धुवून तर्जनीवर हे जेल घेऊन हिरडय़ांना हलका मसाज करत लावायचे असते. या औषधाविषयीही आपल्या डॉक्टरांना आधीच विचारून घेणे चांगले. मग प्रत्येक वेळी दुधाचे दात येताना होणाऱ्या त्रासासाठी बाळाला डॉक्टरांकडे नेण्याची गरज भासत नाही. हसऱ्या बाळाच्या तोंडात नव्याने आलेले दोन पिटुकले मोत्यासारखे दात पाहण्याचा आनंद काही औरच!

  • दुधाचे दात पांढऱ्या रंगाचे असतात. बाळाला दूध पाजल्यानंतर वा खाणे दिल्यानंतर दात स्वच्छ कापसाने (गॉजने) वा ओलसर कापडाने पुसून स्वच्छ ठेवावेत.
  • बाळ झोपल्यावर त्याला बाटलीने दूध वा फळांचा रस देऊ नये.
  • मूल दोन वर्षांचे झाल्यावर रोज दोन वेळा बेबी ब्रशने दात घासावेत.
  • दुधाचे दात किडण्याकडे दुर्लक्ष नको. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर व दातांच्या रचनेवरही कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे योग्य वेळी दंतरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतलेला बरा.

dr.sanjayjanwale@rediffmail.com