‘जिम’ डोळ्यांसमोर आणली की सर्वात आधी ‘ट्रेडमिल’वर वेगाने चालणारे लोक आठवतात. मातीच्या मैदानावर चालणे सगळ्यात उत्तम असले तरी अनेकांसाठी ते प्रत्यक्षात शक्य होणारे नसते. अशा वेळी ट्रेडमिलवरील व्यायाम फायद्याचा ठरतो.
‘ट्रेडमिल’वर चालण्या-पळण्याच्या व्यायामाचा उगम परदेशात-स्कँडिनेव्हियन देशांत झाला. वर्षांतील अनेक महिने बर्फ पडत असताना जॉगिंग करणे, पळणे असे व्यायाम शक्यच नाहीत. हळूहळू त्यातून ट्रेडमिलवर घरीच व्यायाम करणे रूढ होऊ लागले. आपल्याकडे मात्र तशी काही परिस्थिती नाही. त्यामुळे शक्यतो मऊ मातीच्या मैदानावर खुल्या हवेत चालणे व पळणे उत्तम. हल्ली जिममध्ये ट्रेडमिललाच छोटा टीव्ही जोडलेली मशिन्स असतात. अशा ‘फॅन्सी’ मशीनवर व्यायाम करण्याचा मोह होणे साहजिक आहे, पण मातीवर चालण्याचेही स्वत:चे काही फायदे आहेत.
‘प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते,’ हा न्यूटनचा नियम आठवा. मातीवर पळताना पाय आपटला गेला की निर्माण होणारी प्रतिक्रिया कमी असते. मातीच ‘शॉक अब्जॉर्बर’ म्हणून काम करते. त्यामुळे मातीवर चालणे व पळणे यात पावले व गुडघ्यांवर ताण तुलनेने कमी येतो. त्यामुळे त्यास प्राधान्य द्यावे. काही जणांना मात्र बाहेर जाऊन मैदानावर पळणे शक्यच नसते, तिथे ट्रेडमिल वापरण्यास हरकत नसावी.
‘ट्रेडमिल’मध्येही दोन प्रमुख प्रकार आहेत. व्यक्तीच्या वजनानुसार ५० किलोपर्यंत वजन घेऊ शकणारी व पुढे १०० किलोपर्यंत वजन घेऊ शकणाऱ्या ट्रेडमिल आपल्याकडे वापरात आहेत. जिममध्ये साधारणत: १०० किलोपर्यंतचे वजन घेऊ शकणाऱ्या ट्रेडमिल दिसतात. परदेशात १०० किलोहूनही अधिक वजनाच्या व्यक्तींसाठी आणखी वेगळ्या ट्रेडमिल वापरल्या जातात. त्यामुळे आपल्या वजनानुसार ट्रेडमिल असायला हवी.
ट्रेडमिलवरील व्यायाम खरे तर कुणालाही करता येण्यासारखा आहे. ज्यांना व्यायामासाठी बाहेर जाता येत नाही वा शक्य नाही त्यांच्यासाठी आणि अगदी मधुमेही व हृदयविकाराच्या रुग्णांनाही ट्रेडमिल वापरता येते. मधुमेह्य़ांना जेवणानंतर अर्धा-पाऊण तास व्यायाम केला तर साखर जाळण्यासाठी त्याची मदत होते. त्यासाठी ‘स्टॅटिक सायकलिंग’चा (मशीनवरील सायकल चालवणे) व्यायाम सुचवला जातो, तसाच ट्रेडमिलवरील व्यायामही उपयुक्त ठरतो. ‘बायपास’ वा ‘अँजिओप्लास्टी’ झालेल्या हृदयरुग्णांनाही स्टॅटिक सायकलिंगचा फायदा होतो. हे रुग्णही शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी पुरेशा विश्रांतीनंतर ट्रेडमिल वापरू शकतील. चालण्याच्या हलक्या व्यायामासाठी या रुग्णांनी ट्रेडमिलचा वेग कमी ठेवलेला चांगला. दृष्टिहीन मंडळी, दृष्टी अधू झालेले लोक, घराबाहेर न फिरू शकणारे वृद्ध वा या दिवसांत प्रचंड पावसामुळे बाहेर फिरणे शक्य नसलेली मंडळी ट्रेडमिलवर चांगला व्यायाम करू शकतील. मात्र मधुमेह, हृदयविकार वा इतर काही आजार असेल किंवा एखादी शस्त्रक्रिया झाली असेल तर आपल्या प्रकृतीला झेपण्याच्या दृष्टीने व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच हवा.
मधुमेही वा हृदयरोग्यांनी ट्रेडमिलवर चालताना वा पळताना जवळ साखर बाळगणे गरजेचे आहे. पळणे जास्त झाले व चक्कर येऊ लागली तर त्याचा उपयोग होतो. हृदयरोग्यांनी व्यायामावेळी जवळपास दुसरे कुणी आहे ना, हे पाहणे गरजेचे आहे. एकदम पळण्यामुळे या रुग्णांच्या छातीत दुखू शकते. अशा वेळी लगेच ट्रेडमिलचा वेग कमी करून थांबायला हवे व गरज भासल्यास वैद्यकीय मदतही घ्यायला हवी. त्यामुळे कोणत्याही रुग्णांने व्यायामात एकदम मोठे धाडस करणे टाळलेले बरे. आपल्या शरीराच्या क्षमतेनुसारच व्यायाम वाढवत नेणे केव्हाही चांगले असते.
ट्रेडमिलवर चालताना फिरणाऱ्या पट्टय़ाचा वेग आणि त्याचा चढ (इन्क्लिनेशन/कोन) या दोन गोष्टी पाहाव्या लागतात. ४० ते ६० या वयोगटातील व्यक्तीनी किमान आठवडाभर ट्रेडमिलचा वेग मध्यम ठेवून व्यायाम करून पहावा. एका वेळी १५-२० मिनिटेच व्यायाम करावा व थोडी विश्रांती घ्यावी. उत्साह टिकून असेल तर अजून १५-२० मिनिटे व्यायाम करावा. एकदम खूप वेळाचा सलग व्यायाम टाळावा. काही आजार नसल्यास ट्रेडमिलचा वेग फार सावकाश ठेवू नका. मध्यम स्वरूपाचा व्यायाम बरा.
ट्रेडमिल मशीनवर ‘इमर्जन्सी स्टॉप’चे एक बटण असते. चालणारा ट्रेडमिलचा पट्टा चटकन थांबवण्यासाठी ते वापरतात. ते बटण सुरू आहे ना हे आधी पहावे. चालताना वा पळताना एकदम चक्कर आली किंवा पडायला झाले, पट्टय़ात चुकून पाय वा हात गेला तर हे बटण वापरून लगेच मशीन बंद करता आले पाहिजे.
ट्रेडमिलवर वेग जास्त असताना वा ट्रेडमिलला चढ ठेवलेला असताना उलटे चालू नका. काहींना यात चक्कर येऊ शकते.
ट्रेडमिलच्या दोन्ही बाजूला असलेल्या रेलिंगला धरून चालले तर चांगले.
जसे मैदानावर चालताना चांगल्या प्रतीचे शूज घालणे आवश्यक असते, तसेच ट्रेडमिलवरही घालणे बरे. ट्रेडमिलवर अनवाणी चालल्यास घर्षणामुळे पायाला फोड येऊ शकतात.
ट्रेडमिलवर चालण्याचा व्यायाम करताना वेग फार नको. त्याने घोटय़ाचे दुखणे उद्भवू शकते.
डॉ. अभिजीत जोशी – dr.abhijit@gmail.com

शब्दांकन- संपदा सोवनी

Anant Ambani and Radhika Marchant pri Wedding
Video : जामनगरमध्ये व्हीआयपी पाहुण्यांसाठी अंबानी कुटुंबाने उभारले आलिशान तंबू, आतील सोयी बघून तुम्हीही व्हाल थक्क
knight frank wealth report 2024
अग्रलेख : अधिक की व्यापक?
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार
Gutkha smuggler Israr Mansoori in police custody nashik
गुटखा तस्कर इसरार मन्सुरी यास पोलीस कोठडी