साहस ही माणसाची एक मूलभूत प्रेरणा. त्याला जिज्ञासेची जोड मिळाल्यानंतर त्याने जग पालथे घातले. त्यातूनच अनेक साहसी खेळांचा जन्म झाला. त्या डोंगरधारेच्या पलीकडे काय असेल बरे, डोंगरमाथ्यावरून आसमंत कसा दिसत असेल या कुतूहलातून अज्ञाताच्या शोधाचा प्रवास सुरू झाला आणि त्यातूनच गिर्यारोहणाच्या साहसी खेळाची सुरुवात झाली. तीर्थयात्रा, व्यापारउदीम, शेती अशा कारणांव्यतिरिक्त तो डोंगरदऱ्या पालथ्या घालू लागला. त्याच्या शारीरिक, मानसिक क्षमतेचा कस लागणाऱ्या गोष्टी करू लागला. कस पाहणारी ही जोखीमच गिर्यारोहकाच्या जगण्याचा भाग असते. त्यामुळेच १६व्या गिरिमित्र संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना ‘साहसाची परिसीमा’ अशी आहे.

महाराष्ट्रातील तमाम डोंगरभटक्यांचे व्यासपीठ असणारे गिरिमित्र संमेलन दरवर्षी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे आयोजित केले जाते. डोंगरभटक्यांचा हा आनंदसोहळाच असतो. संमेलनाचे यंदाचे हे १६ वे वर्ष आहे. या वर्षीच्या मध्यवर्ती संकल्पनेला अनुसरून संमेलनासाठी तेवढय़ाच तोलामोलाचे व्यक्तिमत्त्व लाभले आहे ते गेरलिण्ड कल्टेनब्रुनर यांच्यामुळे. ऑस्ट्रीयन गिर्यारोहक असलेल्या कल्टेनब्रुनर हिने आजवर गिर्यारोहणात उत्तुंग असे पराक्रम केले आहेत. गिर्यारोहकांच्या जगात मानाचे स्थान असणारी आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंचीची सर्वच्या सर्व १४ हिमशिरांवर कल्टेनब्रुनर हिने वयाच्या २३व्या वर्षीच यशस्वीपणे आरोहण केले आहे. तिची ही सर्वच आरोहणे साहसाची परिसीमा गाठणारी आहेत. कारण अतिउंचावर आरोहण करताना प्राणवायूची कमतरता जाणवते. अशा वेळी कृत्रिम प्राणवायूचा आधार घ्यावाच लागतो. पण कल्टेनब्रुनर हिने या सर्व आरोहणात कृत्रिम प्राणवायूचा आधार घेतला नाही. कल्टेनब्रुनर १६व्या गिरिमित्र संमेलनाच्या मुख्य अतिथी म्हणून भारतात येणार आहेत. संमेलनात त्यांची विशेष मुलाखत तर आहेच, पण त्याचबरोबर त्यांच्या या थरारक आरोहणांचे सादरीकरणदेखील पाहता येईल. तसेच डोंगरभटक्यांना त्यांच्याशी मुक्त संवाद साधण्याची संधी यानिमित्ताने लाभणार आहे. त्याचबरोबर मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रमदेखील संमेलनात असणार आहे. सातपुडा आणि सहय़ाद्रीच्या घाटमाथ्यावरून चालत जाण्याच्या तब्बल ७० दिवसांच्या ‘वॉकिंग ऑन द एज’ या मोहिमेचे विशेष सादरीकरणदेखील होणार आहे. दुर्गसंवर्धन आणि सरकारी यंत्रणा याविषयी राज्याच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गग्रे यांचे विशेष मार्गदर्शन संमेलनात मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे छायाचित्रण स्पर्धा, दृक्श्राव्य सादरीकरण स्पर्धा, अभ्यासपूर्ण सादरीकरण स्पर्धा, ट्रेकर ब्लॉगर स्पर्धा, पोस्टर स्पर्धा अशा अनेक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धाबाबत विस्तृत माहिती संमेलनाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. संमेलनाच्या देणगी प्रवेशिका महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड येथे उपलब्ध आहेत. तर ऑनलाइन प्रवेशिका http://www.girimitra.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क – ९९२०८०६६९९.