तुर्कस्तानातील कप्पाडोकिया हा प्रदेश पर्यटकांना विस्मयचकित करतो. लहान-मोठे दगडी डोंगर आणि त्यातून डोकावणारे उंच दगडी सुळके पाहताना पर्यटकांचे भान हरपून जाते. सुरेल संगीत आणि तालबद्ध ठेक्यावर चालणारा सेमा हा तेथील उपासना विधीही पर्यटकांना अनुभवसमृद्ध बनवतो.

तुर्कस्तानात माऊंट इर्सएिस आणि माऊंट टॉरस या दोन ज्वालामुखी पर्वतांच्या राशी आहेत. ठिसूळ दगडांचे लहानमोठे असे अनेक डोंगर आणि त्यातून वर डोकावणारे उंचच्या उंच, निमुळते दगडी सुळके असा हा प्रदेश आहे. त्यास ‘कप्पाडोकिया’ असे म्हणतात. शतकानुशतके झालेल्या ज्वालामुखींच्या उद्रेकांमुळे या पहाडी सुळक्यांचे आकार गिरण्यांच्या उंच धुराडय़ांसारखे झालेले आहेत. तिथे या पहाडी सुळक्यांचा उल्लेख ‘पऱ्यांची धुराडी’ असा केला जातो.

भूमध्य समुद्र आणि काळा समुद्र यांच्या मधोमध असलेल्या या प्रदेशावर अगदी आदिम काळापासून हित्ती, पíशयन, ग्रीक, रोमन,बायझॅन्टिन, ओटोमान अशी वेगवेगळी साम्राज्ये एकापाठोपाठ एक अशी नांदून गेली. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून या प्रदेशावर चहूबाजूंनी अनेक आक्रमणे झाली. अशा प्रत्येक आक्रमणाच्या वेळी इथल्या स्थानिक लोकांनी आपापल्या गावांतून पळ काढून कप्पाडोकियाच्या या धुराडेवजा सुळक्यांचा आधार घेतलेला होता, असे इथला इतिहास सांगतो. इथल्या लोकांनी कैक वर्षे कप्पाडोकियाच्या शंभर चौरस मलांच्या दगडी पहाडांत प्रचंड खोदकामे करून तिथे शेकडो भुयारी वस्त्या तयार केल्या. पहाडांत बोगदे खणून तिथल्या जमिनीखाली ओबडधोबड पण मजबूत अशा शेकडो निवासी गुंफा निर्माण केल्या. अशा पुरातन निवाऱ्याच्या जागा, झोपण्याचे कट्टे, तसेच स्नानाच्या आणि स्वयंपाकाच्या खोल्या आणि प्रार्थनेच्या गुहा कप्पाडोकियामध्ये आजही पाहायला मिळतात.

आज तुर्कस्तान जिथे आहे त्या नर्ऋत्य आशियाई भागात चौथ्या शतकात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला होता. त्यानंतर पाचव्या आणि सहाव्या शतकात शेजारच्या सीरिया आणि मेसोपोटेमिया (इराक) या देशांतून येणाऱ्या अनेक अरबी टोळ्यांनी तिथे हल्ले सुरू केले. त्या वेळी तिथले मूळचे हित्ती रहिवासी आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारलेले ख्रिश्चन लोक हे तिथून पळून जाऊन कप्पाडोकियाच्या पहाडी गुंफांमध्ये अज्ञातवासात राहू लागले. पुढे ११ व्या शतकात मध्य आशियातून आलेल्या सेल्जुक तुर्की लोकांनी तत्कालीन बायझ्ॉन्टिक सत्ताधाऱ्यांचा पराभव करून तुर्कस्तानच्या निर्मितीचा पाया घातला. १४ व्या शतकात ओटोमान (उस्मान) वंशाच्या सुलतानांनी आग्नेय युरोप, पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका इथपर्यंत तुर्कस्तानची व्याप्ती वाढवली. १५ व्या शतकात अत्यंत ‘महान’ मानल्या गेलेल्या ‘सुलेमान’ या ओटोमान सम्राटाने तुर्कस्तानला एका समर्थ राष्ट्राचा दर्जा प्राप्त करून दिला. या साऱ्या स्थित्यंतरांच्या काळात अगदी दुसऱ्या शतकापासून तिथल्या स्थानिक हित्ती, ख्रिश्चन आणि ग्रीक लोकांनी कप्पाडोकियाच्या त्या पहाडी गुंफाचा वापर आपत्कालीन निवारा म्हणून केलेला होता. अशा या ऐतिहासिक गुंफा ‘याचि देही, याचि डोळा’ पाहून आम्ही खरोखरच विस्मयचकित झालो.

मध्ययुगीन काळात भारतातून अरबस्तान आणि तुर्कस्तानकडे जाणारा एक व्यापारमार्ग होता. त्या मार्गास इंग्रजीत ‘सिल्क रूट’ असे म्हणत. भारतात तयार होणारे रेशमी कापड आणि चंदन याच मार्गाने तिकडे रवाना केले जात असे. या व्यापाराच्या वस्तू उंटांच्या पाठीवर लादून त्या उंटांचे तांडे (कारवे) सिल्क रूटवरून अरबस्तानात नेले जात. या खुश्कीच्या मार्गावर जागोजागी व्यापाऱ्यांच्या आणि उंटांच्या विसाव्यासाठी ‘कारवाँ सराया’ बांधलेल्या असत. प्रत्येक कारवाँ सराईमध्ये पाहुण्या व्यापाऱ्यांच्या खाण्या-पिण्याची आणि विश्रांतीची सोय असे. या प्रदीर्घ वाटेवर जर कुठे एखाद्या व्यापाऱ्याची लुटालूट झालेली असेल, तर त्याला कारवाँ सराईमध्ये नुकसानभरपाईसुद्धा दिली जात असे. अशा सरायांमध्ये हकीम, मौलवी, सुतार, लोहार, खाद्यपेयांचे विक्रेते, उंटांसाठीचे पशुवैद्य यांच्या सेवाही व्यापाऱ्यांना दिल्या जात. अरबस्तान-तुर्कस्तानात आजही अशा काही कारवाँ-सराया आहेत; परंतु त्यांचे स्वरूप मात्र आता कालानुरूप बदललेले आहे.

कप्पाडोकियानजीकच्या गोरेम गावाजवळची आम्ही पाहिलेली कारवाँ-सराई ही आता एक प्रकारे सार्वजनिक उपासनेची जागा बनलेली आहे. या कारवाँ-सराईचे नाव ‘सरीहाँ’ असे होते. तिकडच्या ज्वालामुखी पर्वतातील दगडांपासून बांधलेली ही वास्तू वर्तुळाकार असून तिच्या मध्यभागी एक मोठे रिंगण होते. या रिंगणाभोवती चहू बाजूंनी खुर्च्याच्या तीन-चार वर्तुळाकार रांगा होत्या. तिथे प्रवेशासाठी प्रत्येकी ३५ युरो मोजून तिकीट काढावे लागते. थोडय़ाच वेळात मध्यभागीच्या रिंगणात तुर्की दरवेशींचा ‘सेमा’ हा उपासना विधी सुरू झाला. हा विधी पार पाडण्यासाठी चार-पाच दरवेशी त्या रिंगणात येतात. शुभ्र पांढरा पायघोळ अंगरखा, पांढरी तुमान आणि डोक्यावर करडय़ा रंगाची उंच, गोल रुमी टोपी असा त्यांचा वेश होता. या दरवेशींना आपण ‘घुमणारे दरवेशी’ म्हणू या. कारण त्या वर्तुळाकार जागेत हात फैलावून भिंगरीसारखे गोल गोल घुमत रिंगण करून ते दरवेशी त्यांचा उपासना विधी पार पाडत होते. तिथे रिंगणाबाहेर बसलेले मोजके गायक-वादक अत्यंत आर्त, परंतु सुरेल स्वरांत ईश्वराला आवाहन करणारे एक गीत गायला सुरुवात करतात. सुरुवातीला प्रेषित महंमदाची प्रशंसा करणारे ‘नात-ए-शरीफ’ हे गीत गायले जाते. महंमदाची प्रशंसा ही ईश्वराचीच प्रशंसा असे तुर्की लोक मानतात. त्यानंतर आपल्याकडच्या संबळींसारख्या काही तालवाद्यांवर ठेका धरून काही काळ सर्वाना टाळ्या पिटायचा मोह होतो. जमलेल्या श्रोत्यांना जागे करून ईश्वरापुढे नतमस्तक होण्याचे आवाहन करण्यासाठी या टाळ्या पिटल्या जातात, असे आम्हाला नंतर कळाले. त्यानंतर ‘सेमा’ हा विधी सुरू होतो. या विधीचे चार टप्पे असतात. शाश्वत सत्याचा जन्म, विश्वनिर्मितीचा प्रत्यय, वैश्विक प्रेमाचा व त्यागाचा संदेश आणि विश्वाच्या अद्भुत रचनेचा साक्षात्कार असे ते चार टप्पे होत. सुरेल संगीताच्या आणि तालबद्ध ठेक्याच्या पाश्र्वभूमीवर सुमारे दोन तास हा सेमा विधी सुरू असतो. गायल्या जाणाऱ्या धीरगंभीर गीताच्या लयीवर रिंगणातले दरवेशी दोन्ही बाहू फैलावून स्वत:भोवती गोलगोल फिरत वर्तुळाकार घुमू लागले. प्रत्येकाचा चेहरा आकाशाकडे वळलेला होता आणि नेत्र अर्धोन्मिलित होते. हातांचे उजवे तळवे आकाशाकडे वळवलेले होते, तर डावे तळवे जमिनीकडे वळलेले होते. परमेश्वर अनुग्रह म्हणून जे काही देईल ते घेण्यासाठी उजवा तळवा आकाशाकडे वळवावा आणि त्याने जे काही दिलेले असेल त्याचा जमेल तेवढा अंश गरिबांना देण्यासाठी डावा हात जमिनीकडे वळवावा, हे त्यामागचे तत्त्वज्ञान. या दरवेशींच्या डोक्यांवर असणारी उंच रुमी टोपी ही स्वार्थभावनेच्या समाधीचे प्रतीक होय आणि त्यांचा सफेद पायघोळ झगा म्हणजे दांभिकतेला रोखणारे आवरण होय, अशी त्यांची धारणा आहे. हा सारा खटाटोप सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्यासाठी करायचा असतो, असेही ते म्हणतात. हे अवघे विश्व स्वत:भोवती फिरत असते, आपली पृथ्वीही स्वत:भोवती फिरते आणि चंद्रादी ग्रहदेखील स्वत:भोवती फिरत असतात. त्यामुळे नामस्मरण करीत स्वत:भोवती फिरत राहणे हाच ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग होय, अशी या रुमी दरवेशींची श्रद्धा आहे. सुरुवातीला प्रखर दिव्यांच्या प्रकाशात हा सेमा विधी सुरू असतो, पण जसजसा तो अंतिम टप्प्यावर पोहोचतो तसतसे सभागृहातले दिवे मंदावत जातात. मग धूसर प्रकाशात आकाशाकडे डोळे लावून उन्मनी अवस्थेत गिरक्या घेणारे ते रुमी दरवेशी आणि त्यांचे आर्त, अनाहत असे संगीत यांचा अत्यंत गूढगंभीर परिणाम तिथल्या वातावरणात पसरतो. शेवटच्या चौथ्या टप्प्यात त्या दरवेशींच्या धर्मप्रमुखाचा- शेखचा- रिंगणात प्रवेश होतो. अवकाशातल्या ग्रहांप्रमाणे गिरक्या घेणाऱ्या दरवेशींच्या रिंगणात तो अगदी मधोमध सूर्यासारखा उभा राहतो आणि मग तो विधी संपतो.

तुर्की लोकांच्या सांगण्यानुसार सुमारे सातशे वर्षांपासून तुर्कस्तानात सुरू असलेल्या या सेमा विधीमध्ये मानवी स्वभावाच्या तीन मूलभूत घटकांचा अंतर्भाव केलेला असतो. मन, भावना आणि आत्मा हेच ते तीन घटक होत. या तिन्हींचा समन्वय साधून त्यांना शुद्धतेच्या जवळ नेण्यातच जगाचे आणि मानवतेचे कल्याण आहे असे सेमा तत्त्वज्ञान सांगते. वस्तुत: तुर्कस्तानात असताना आम्ही तिथले अनेक पुरातन अवशेष, ऐतिहासिक मशिदी, राजवाडे, महाल वगैरे बघितले. पण तिथल्या संस्कृतीत कालपरत्वे महत्त्व पावलेली कप्पाडोकियातील पऱ्यांची धुराडी आणि रुमी दरवेशांचा सेमा विधी या दोन गोष्टी मात्र आमच्या कायम स्मरणात राहिल्या.

विजय दिवाण vijdiw@gmail.com