पावसाला थोडी उघडीप मिळाली असली तरी दऱ्या-डोंगरातले जलप्रपात अजूनही कोसळत आहेत. नेहमीच्या प्रसिद्ध धबधब्यांवर असणारी पर्यटकांची गर्दी टाळायची असेल तर सरत्या पावसाळ्यात जरा वाट वाकडी करून या धबधब्यांत भिजण्याचा आनंद अनुभवायला हवा.

धनगर धबधबा
प्रीती पटेल
बदलापूर स्थानकापासून साधारण आठ-नऊ किलोमीटरवरील कुंडेश्वर शिवस्थानामुळे सर्वश्रुत आहे. पण याच कुंडेश्वरकडे जाण्याच्या वाटेच्या आतल्या बाजूस असलेल्या धनगर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी अगदीच किरकोळ असते.
कुंडेश्वरच्या रस्त्यावर मंदिराच्या साधारण एक किलोमीटर आधी एक छोटी पायवाट डावीकडच्या रानात शिरते. याच पायवाटेने थोडे चालत गेल्यावर वाट ओहोळात उतरते. धनगर धबधब्याला जाण्यासाठी ओहोळाच्या पाण्यातूनच चालत जावे लागते. सतत वाहत्या पाण्यामुळे खडकाला शेवाळे पकडले आहे. त्यामुळे पाण्यातून चालताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. दहा मिनिटांची सोपी चाल आपल्याला धबधब्यापाशी घेऊन जाते. ७० ते ८० फुटांवरून कोसळणारा हा प्रपात झुडुपांच्या आडोशामुळे मुख्य रस्त्यावरून दिसत नाही. त्यामुळे हुल्लडबाजांपासून तसा दूरच आहे. धबधब्याचा तळ उथळ असून थेट प्रपाताखाली उभे राहून भिजता येते. बदलापूर स्थानकाजवळून खासगी रिक्षानेही येथे जाता येते.

gold, gold all time high, gold investment, commodity market, money mantra, bazar article, gold all time high reasons, gold and global economy, gold in india, global economy,
क… कमोडिटीजचा : सोन्याचा ‘गाझा’वाजा
Sakkardara flyover, Nagpur,
नागपूर : भरधाव वाहनांसह अपघाताच्या भीतीचे सावट, सक्करदरा उड्डाण पुलावर मागील वर्षात १३ अपघात
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
holi temprature rise
होळी पौर्णिमेपर्यंत तापमान ४० अंशावर जाणार? तापमानवाढीचा वेग दुप्पट, तज्ज्ञही झाले अवाक!

सवतकडा
कोकणच्या विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे तेथे धबधबेही खूप आहेत. त्यातील बहुतांश दुर्लक्षित आहेत. राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण गावातील सवतकडा हा त्यापैकीच एक. मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरआधी ओणी गाव लागते. ओणीपासून साधारण १० किलोमीटरवर चुनाकोळवणच्या भटवाडीजवळ हा निसर्गरम्य धबधबा आहे. ओणी गावावरून एक रस्ता वडवली गावाकडे जातो. वडवलीआधी लागणाऱ्या कळसवली गावावरून एक रस्ता चुनाकोळवणला जातो. या रस्त्याने भटवाडी गाठायची आणि तिथून काही मिनिटे पायवाटेने गेल्यानंतर समोरच दिसणाऱ्या सवतकडा धबधब्याचे मनोहारी दृश्य पाहून शीणवटा क्षणात दूर होतो. या धबधब्याचे वैशिष्टय़ म्हणजे त्याचा विस्तार आणि डोह. धबधब्याचा विस्तार इतका मोठा की धरणातून पाण्याचा मोठय़ा प्रमाणात समांतर विसर्ग व्हावा, तसा या धबधब्यातून जलप्रपात अखंड कोसळत असतो. धबधब्याच्या तळाशी असलेला डोहही मोठा आहे. त्यामुळे थेट धबधब्यात भिजण्याबरोबरच डोहात डुंबण्याचा आनंदही घेता येतो. इतका मनमोहक आणि हिरव्याकंच गर्द झाडीत असलेला हा धबधबा अल्पपरिचित असल्याने गर्दी फारशी नसतेच. सुट्टीच्या दिवसांव्यतिरिक्त हाताच्या बोटांवर मोजता येतील, इतकेच पर्यटक तेथे दिसतात. त्यामुळे कोणताही गोंगाट, गजबज टाळून धबधब्याच्या एकसुरी आवाजात धबधब्यात ओलेचिंब होण्याची मजा घ्यायची असेल तर तेथे अवश्य जायला हवे.

मेळघाटातील धारखोरा
डॉ. जयंत वडतकर – jayant.wadatkar@yahoo.co.in
सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच ठिकाण म्हणजे अमरावती जिल्ह्य़ातील चिखलदरा. घनदाट व निबिड अरण्य व अंगावर येणारा घाट रस्ता पार करूनच आपण चिखलदरा किंवा मेळघाटच्या जंगलापर्यंत पोहोचू शकतो. घाटवळणाचे रस्ते व त्यांचा अधूनमधून होणारा मेळ, यामुळेच सातपुडय़ातील अमरावती व अकोला जिल्ह्यतील या भागाची ओळख मेळघाट अशी झाली आहे. शुष्क पानगळी प्रकारचे जंगल व उन्हाळ्यात ४५ अंशांपेक्षाही जास्त वाढणारे तापमान यामुळे या काळात येथील जंगल निष्पर्ण होऊन हा प्रदेश मृतवत होऊन जातो.
पावसाळा सुरू झाला की मात्र हा सारा प्रदेश कात टाकून पुन्हा हिरवागार आणि तजेलदार होतो. जंगलातील दऱ्याखोऱ्यातील ओहळ, नाले अन नद्या पूर्ववत वाहू लागतात, पाण्याचे दुर्भिक्ष संपते. जंगल संपन्न होऊन जाते. मेळघाटातील उत्तरेकडे उतरणारे सारे जलप्रवाह मध्य प्रदेशातून येणाऱ्या तापीला मिळतात तर दक्षिणेकडे उतरणारे प्रवाह अमरावती व अकोला जिल्ह्य़ांतील चंद्रभागा व पुढे पूर्णा नदीला मिळतात. दक्षिणेकडे असणाऱ्या पर्वतांच्या अतिउंचीमुळे या दिशेने वाहणाऱ्या नद्या खोल दरीत कोसळतात. अनेक ठिकाणी उंच उंच धबधबे निर्माण झालेले आहेत.
मेळघाटातील उत्तुंग धबधबा धारखोरा हे पर्यटकांचे आवडीचे ठिकाण. परतवाडा हे तालुक्याचे ठिकाण या रस्त्यावरील शेवटचे ठिकाण. येथून काही ठिकाणी अगदी १० ते १५ किमीवर मध्य प्रदेशची सीमा आहे. मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर बैतुल जिल्ह्य़ातील बीच्छन नावाचा एक नदी प्रवाह महाराष्ट्रात प्रवेश करतो व थेट खाली खोल दरीत कोसळतो. हे ठिकाण म्हणजे धारखोरा धबधबा. या ठिकाणी पोहोचण्यासाठी किमान पाच किलोमीटरचे पदभ्रमण करावे लागते. गाडीरस्ता नसल्यामुळे मजामस्ती करणारे पर्यटक फारसे फिरकत नाही.
परतवाडय़ाहून मेळघाटातील सेमाडोह किंवा मध्य प्रदेश सीमेवरील धारणीकडे जाताना साधारण आठ किमी अंतरावर पर्वतरांगांची सुरुवात होते. याच ठिकाणी रस्त्याच्या उजव्या बाजूला म्हणजे पूर्वेला बुरडघाट नावाचे गाव लागते. बुरडघाटास एसटीने जाता येते. तेथून मात्र चालतच जावे लागते. धबधब्याकडे जाणारा रस्ता माहिती नसला तरी नदीकाठाने दिसणाऱ्या व ईशान्य दिशेकडे जाणाऱ्या पायवाटेने नुसते चालत गेलो तरी तुम्ही धबधब्याजवळ पोहोचता. सुरुवातीला गावाजवळच्या शेतातून व पुढे तीनेक किमी सागाच्या जंगलातून नदीच्या जवळून चालावे लागते. पुढे दोन्हीकडील डोंगर हळूहळू जवळ येऊ लागतात व अरुंद दरीबरोबर रस्ता थेट नदीतच सामावून जातो. पुढचे अंतर कधी नदीतील दगडधोंडय़ांवरून तर कधी नदीच्या समांतर चालत जायचे. एका वळणाच्या आधीपासून जलप्रपाताचा आवाज जाणवू लागतो. आणि काही क्षणातच आपण धबधब्याच्या समोर येतो. उंच कडय़ांवरून तीन टप्प्यांत कोसळणारा साधारण ३०० फुटांचा हा जलप्रपात पाहून प्रथम विश्वास बसत नाही. धबधब्याचे मनसोक्त दर्शन अन दुरूनच अंगावर येणारे तुषार झेलताना तंगडतोडीचा थकवा एका क्षणात दूर होतो. धबधब्याच्या भोवताली अर्धगोलाकार उंचच उंच दगडी कडे असून त्यामध्ये मोठाली झाडे आणि मध्ये मध्ये कपारी आहेत. पूर्वी या कपारींमध्ये दुर्मीळ गिधाडांची घरटी होती. आता ही घरटी ओस पडलेली आहेत.
अमरावती किंवा अकोल्यापासून एक दिवसात हे पर्यटन पूर्ण करता येते. येथून पुढे मेळघाटमध्ये जाता येते.

गोव्यातले वझर
मिलिंद आमडेकर
गोवा म्हणजे ‘बेबज्, बिचेस आणि बियर’ या पिकनिकच्या जनमानसात रूढ झालेल्या टिपिकल प्रतिमेला छेद देणारा निसर्ग पाहायचा असेल तर वाट वाकडी करावी लागेल. जरा आडवाटेला गेलात तर मात्र धबधब्यांच्या राज्यात आलो की काय, असे वाटू लागते. मात्र, या धबधब्यांची सैर करायला थोडासा ट्रेकदेखील करायला लागतो.
हा ट्रेक सुरू होतो पणजीपासून ७२ किलोमीटरवरील ठाने-डोंगुर्ली गावापासून. वाळपोईमार्गे तिथे पोहोचायला दोन तास लागतात. ठाने-डोंगुर्ली गावातल्या मल्टिपर्पज हॉलमध्ये सामान ठेवायचं आणि पाच किलोमीटरवरच्या हिवरे गावी यायचे. गावामागच्या डोंगरावरून कोसळणारे तीन वझर आपले लक्ष वेधून घेतात. कोकणी भाषेत वझर म्हणजे धबधबा. जंगलातून जाणाऱ्या वाटेवरून विविध प्रकारचे कीटक, फुलपाखरं, पक्षी पाहण्यात, समजून घेण्यात वेगळाच आनंद असतो. पक्ष्यांचा तो मधुर कुंजारव ऐकत ही जंगलवाट संपूच नये असे वाटते. वाटेत दिसणाऱ्या आंबे हळदीची फुलं, रानजाईचे, नेवाळीचे गुच्छ असं रानाचं पुष्पसौंदर्य तुमचं लक्ष वेधून घेते. पावसाळ्यातच जंगलात फुलणारी आंबेहळदची फुलं गणपतीत गौर सजवताना वापरली जातात. वाटेवर अनेकदा मॉरमॉन जातीची फुलपाखरं अगदी जवळून उडत असतात. पैश्याचा अळ्या किंवा मिलीपिड भरपूर दिसतात. अर्थात तुमचे कपडे जर जंगलाच्या रंगसंगतीला पूरक नसतील, तर मात्र हे सृष्टीतलं सौंदर्य दूरच जाईल.
जंगलवाट तुडवत पहिल्या धबधब्यापाशी पोहोचताच पाठपिशवी बाजूला पडते आणि केव्हा एकदा धबधब्याखाली भिजतो असे होते. जवळपास दीडशे फुटांवरून तीन टप्प्यांत कोसळणारा हा धबधबा कॅमेऱ्याच्या एका फ्रेममध्ये पकडणे अवघड होऊन जाते. पुढे एक एक डोंगरधार ओलांडून आणखीन दोन धबधबे तुमच्या स्वागतासाठी हजर असतात. ते ही १००-१२५ फुटावरून कोसळत असतात. हे सारं आवरेपर्यंत दिवस कलायला लागण्याआधी ठाने-डोंगुर्ली गाठायचं.
रात्रीचा मुक्काम गावात करून दुसऱ्या दिवशी ताज्या दमाने दुसऱ्या डोंगरातला नवा धबधबा पाहायला बाहेर पडायचं. ठाने-डोंगुर्लीच्या अलीकडे असलेल्या पाली गावातून एक वाट डोंगरात शिरते. टिपिकल खेडेगाव म्हणावं असे हे गाव. अनेक घरांसमोर तुळशी वृंदावन आहे. काही हत्तीच्या सोंडेवर तोलून धरलेली तर काही गोमुखांवर. स्वच्छ अशा या गावांतून पाऊण- एक तास डोंगर चढून दोन टप्प्यांत कोसळणाऱ्या धबधब्यासमोर येतो. येथे डोहही जास्त खोल नसल्यामुळे आणि मुख्य रस्ता तसा जवळच असल्यामुळे गर्दी जरा जास्तच होती. मनसोक्त डुंबून बोटांना सुरकुत्या पडून थंडी वाजायला लागल्यावर डोहातून बाहेर यायचं.
पाचवा धबधबा आहे तो शेळपे गावाजवळचा सुळसुळे धबधबा. त्यासाठी ठाने गावासमोरची नदी ओलांडून जंगलात शिरावं लागतं. अळंबी, मॉस, आंबेहळदीची फुलं असं काहीबाही दिसायला लागतं. ब्लॅॅक हुडेड ओरिओल, ट्रि पाय, लिफबर्डचे सुमधुर आवाज साद घालू लागतात. जंगलातील साधारण सहा-सात किलोमीटरची पायपीट केल्यावर एकापाठोपाठ एक असे तीन धबधबे लागतात. तिसऱ्या धबधब्याखालील खडक मोठाले असल्यामुळे तो धोकादायक आहे. तेथून पुढे येतो तो सुळसुळे धबधबा. शेवाळ्यामुळे इथे खूपच निसरडं झालं आहे. त्यामुळेच याला सुळसुळे धबधबा म्हणतात. डोहात उडय़ा मारून डुंबायला मजा येते.
चौथ्या दिवशी वाळपोईच्या पुढे सालेली गाव गाठायचं. येथील डोंगरात हळदीचो वझर आहे. पूर्वी या धबधब्याच्या परिसरात हळदीची खूप झाडं होती. पाण्याला वासही हळदीचा यायचा. त्यामुळेच तो हळदीचो वझर म्हणून ओळखला जातो.
चार दिवस वझरांच्या सान्निध्यात मजेत जातात. गोव्याच्या टिपिकल पिकनिकी वातावरणापासून काहीसं दूर गेल्याचा आनंददेखील मिळतो. गोव्यातले हे वझर केवळ पावसाळ्यातच वाहतात. पणजीहून वाहन करून किंवा स्वत:च्या वाहनाने हे सारं चार दिवसांत पाहणे शक्य आहे. युथ होस्टेलचे गोवा युनिट दरवर्षी असा ट्रेक आयोजित करत असते.

बचाव पथक
सध्या निसर्ग भटकंती, डोंगर भटकंती करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. हे एका चांगल्या व निकोप सामाजिक बदलाचे निदर्शक आहे. परंतु अशा वेळी दुर्गम ठिकाणी अति उत्साहाच्या भरात घडलेल्या एखाद्या दुर्दैवी अपघाताची बातमी सुन्न करून टाकते. दऱ्या डोंगरातील अपघातात अगदी रेस्क्यू करणाऱ्याचे काम सर्वच गिर्यारोहक अगदी निरपेक्ष वृत्तीने करत असतात. पण ही मदत वेळेवर आणि जलद पोहचणे गरजेचे असते. म्हणूनच शोध व बचाव कार्याच्या वैयक्तिक व विविध सरकारी यंत्रणांच्या विखुरलेल्या प्रयत्नांत सुसूत्रता आणण्यासाठी शोध व बचावाची मध्यवर्ती व्यवस्था सुरू करण्यासाठी गाíडयन-गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअिरगने पुढाकार घेतला आहे. राज्यभरात विविध ठिकाणी विखुरलेल्या गिर्यारोहक, गिर्यारोहण संस्था, ग्रामीण भागातील बचाव कार्यकत्रे या माहितीचे संकलन यात होणार आहे. लवकरच महाराष्ट्र माऊंटेनिअरिंग रेस्क्यू को-ऑडीनेशन सेंटरची हेल्पलाइन लवकरच सुरूहोत आहे. तंदुरस्त व प्रशिक्षित गिर्यारोहक अशी यंत्रणा नक्कीच उभी करू शकतात. त्याचा उपयोग नसíगक प्रकोपांदरम्यानच्या मदतकार्यातही होऊ शकेल. याविषयी २८ ऑॅगस्ट रोजी पुणे येथे डॉ.शामराव कलमाडी हायस्कूल सभागृह, येथे खास चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. संपर्क http://www.ggim.in ९०११०७८४२५ / ९८२२३२३१४७.