नदीच्या काठाने मानवी संस्कृती वसली आणि फुलली. या नद्यांनी मानवी जीवनाला सुजलाम् सुफलाम् केलं. वर्षभर पिण्याच्या पाण्याबरोबर आजुबाजूचा परिसर हिरवागार केला. असंच एक उदाहरण आहे नाशिक जिल्ह्यतलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिकच्या कळवण तालुक्यातील पुनद नदीवरील असाच एक नयनरम्य जलाशय आहे अर्जुनसागर. तब्बल ६१० दशलक्ष घनमीटर  पाण्याची साठवण क्षमता असलेल्या या धरण परिसराचा परीघ दाट जंगलाने वेढलेला आहे. डोंगर-दऱ्यांनी व्यापलेल्या या क्षेत्रावर निसर्गदेवतेने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. आपण सर्वजण निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी आतुर असतो. कधी दाट वृक्षराजीतून तर कधी गवताळ माळरानातून भटकण्याची मजा काही औरच असते. अर्जुनसागर क्षेत्रात जलाशयाच्या भोवती वनपर्यटन करताना फुलं, पक्षी आणि प्राण्यांच्या अद्भुत दुनियेची सफर घडते. विशेषत: इथला वर्षांविहार निसर्ग भटक्यांना विलक्षण अनुभती देऊन जातो. या पुनद अर्जुनसागर निसर्ग पर्यटन क्षेत्रात प्रतापनगर, उंबरदे, सुपले दिगर ही वनक्षेत्रे येतात. धरणालगतचे हे वनक्षेत्र एकूण १३०० हेक्टर क्षेत्रफळाचे आहे. या आदिवासीबहुल क्षेत्रात कोकणा, महादेव कोळी, भिल्ल आणि इतर समाजाचे लोक त्यांच्या स्थानिक संस्कृतीसह सण-उत्सव साजरे करताना आणि लोककला आणि लोकसंस्कृतीचे जतन करताना दिसतात. धरणाच्या पाण्यामुळे इथला शेतकरीही सुखावलेला आहे. वन विभागातर्फे संयुक्त वन व्यवस्थापन समितीची इथे स्थापना करण्यात आली असून त्यांच्यामार्फत विविध विकासकामांना चालना देण्यात आली आहे. पथमार्ग, निवाराशेड, पॅगोडा, रेिलग, निरीक्षण मनोरे, बोटिंग यासारख्या सुविधा इथे निर्माण करून देण्यात आल्या आहेत. निसर्ग पर्यटन केंद्रामुळे स्थानिक लोकांना मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे. येणाऱ्या पर्यटकांना इथल्या ग्रामीण जीवनाबरोबर आदिवासी पदार्थाची चवदेखील चाखता येते. पर्यटकांसाठी अर्जुनसागर निसर्ग पर्यटन केंद्र म्हणजे पर्यटनाचा मनमुराद आनंद देणारं  केंद्र असंच त्याचं वर्णन करावं लागेल.

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arjun sagar dam on punand river near nashik
First published on: 04-10-2017 at 02:49 IST