नयनरम्य समुद्रकिनारे आणि छानछौकी भटकंती अशी बालीची ओळख आहे. पण याच बालीत अनेक ठिकाणं अशी आहेत, जेथे इंडोनेशियाच्या वारशाचं जतन केलेलं आहे. थोडी वाट वाकडी करून ही ठिकाणं पाहिली तर आपल्याला बालीची वेगळी ओळख होऊ शकते.

बाली म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतात ते नयनरम्य चमचमत्या रेतीचे समुद्रकिनारे. किंबहुना पर्यटनाच्या नकाशावरील बालीची ओळख ही अशीच करून दिली जाते. अर्थातच व्यवसायाचा भाग म्हणून बालीची ही पर्यटन ओळख असू शकते. पण जेव्हा आपण परदेशात असतो तेव्हा पर्यटन व्यावसायिकांच्या यादीबाहेरचेदेखील काही पाहायला हवे. कारण त्यातून तेथील कला, परंपरा, इतिहास आणि जनजीवनाची ओळख होऊ शकते.

बालीमधील असेच सुंदर ठिकाण म्हणजे बाली आर्ट सेंटर. नावावरून कलेबिलेच्या संदर्भात काहीबाही करणारी टिपिकल सरकारी संस्था असावी असा आपला समज होऊ शकतो. ही संस्था सरकारीच आहे, पण इतपतच तिचा आणि सरकारचा संदर्भ आहे. बाकी तुम्ही एकदा या वास्तूच्या आवारात शिरलात की तेथील वातावरण तुमची दृष्टीच बदलून टाकते.

देशाची संस्कृती जपण्याची आस असेल तर काय होऊ शकते याचा सुंदर नमुना येथे जिवंत झालेला दिसतो. तब्बल दहा एकरांवर वसलेले हे आर्ट सेंटर बालीतल्या तरुणाईच्या उत्साहाचे प्रतीक आहे. चित्रकला, नृत्य, संगीत अशा कलांची अगदी निगुतीने येथे जपणूक केली आहे. पारंपरिक वाद्य, पेहराव, मौल्यवान चित्रे असे बरेच काही येथे आहेच. पण दर रविवारी सकाळी चार तास येथे अनेक कलांसाठी मोफत वर्ग चालवले जातात. नृत्य, संगीत, चित्रकला शिकण्यासाठी मोठय़ा प्रमाणात लहान मुले-मुली तर येथे येत असतातच, पण नृत्य शिकण्यासाठी अगदी महिलावर्गाचीही हजेरी असते. पारंपरिक इंडोनेशियन नृत्य यातून जोपासले आहे. तर संगीतशाळेतदेखील अशीच गर्दी असते. या सेंटरचे दुसरे एक वैशिष्टय़ नमूद करावे लागेल ते म्हणजे अनेक प्रायोगिक नाटकवाले अनेक ठिकाणी त्यांच्या नाटकाचा सराव करताना दिसतात. साहजिकच यामध्ये तरुणांचा सहभाग अधिक असतो. अर्थातच हे संपूर्ण कलाकेंद्र रविवार सळसळत्या उत्साहाने गजबजून गेलेले असते. पारंपरिक स्थापत्य शैलीचा वापर करून संपूर्ण केंद्र बांधले आहे. खुले सभागृहदेखील आहे. तसेच विविध स्पर्धासाठी बंदिस्त सभागृहदेखील. सुट्टीच्या दिवशी येथे नृत्य, संगीताच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. पारंपरिक आणि पौराणिक अशा पेहरावातील तरुण-तरुणी यामध्ये सहभागी होतात. या संपूर्ण केंद्रामध्ये कॅण्डीड फोटोग्राफीला प्रचंड वाव आहे.

सर्वाधिक जिवंतपणा जाणवतो तो येथील नृत्याच्या वर्गात. एखाद्या कामाशी समरसून गेल्यावर तुमच्या अंगप्रत्यंगात तन्मयतेचे प्रतििबब पडते. चार वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या नृत्याच्या वर्गात सारा जिवंतपणा एकवटलेला असतो. आठ-दहा वर्षांच्या मुलींपासून ते अगदी तिशी-चाळिशीतल्या महिला येथे सलग दोन-चार तास अगदी तन्मयतेने नृत्यसरावात मग्न असतात. पारंपरिक असे हे बाली नृत्य म्हणजे केवळ पदन्यास नसतो तर त्याबरोबर चेहऱ्यावरचे हावभावदेखील महत्त्वाचे असतात. त्या नृत्यात ही नíतका इतकी रममाण झाली होती की, आम्ही कोण आहोत, त्यांची छायाचित्रे का घेत आहोत याचा तिच्यावर कसलाही परिणाम होत नव्हता. राग, लोभ, प्रेम, वात्सल्य अशा भावना तिच्या चेहऱ्यावर इतक्या सहज उमटत असतात की दोन क्षण थांबून राहावे.

प्राचीन वास्तुकला जोपासलेल्या इमारती, वस्तुसंग्रहालय आणि नृत्य-संगीताचा एक सुखावून टाकणारा कलात्म अनुभव येथे मिळत होता.

येथून काही अंतरावर उबूद हा बालीतला आणखीन एक वारसा जोपासणारा भाग आहे. बाली हा इंडोनेशियातील हिंदूबहुल प्रांत. बाली बेटावरील सर्वाधिक मंदिरे ही उबुदलाच आहेत. इंडोनेशियातील मध्य जावातील हिंदू राजे ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर बाराव्या शतकात बालीला स्थलांतरित झाले असे सांगितले जाते. त्याचबरोबर जावा प्रांतातील सत्ताधाऱ्यांपकी एका राजपुत्राला आपले स्वत:चे राज्य असावे या इच्छेमुळे तो बाली बेटावर उबुद येथे स्थिरावला असे स्थानिक सांगतात. उबुदच्या मंदिरांबाबत स्थानिकांकडून जी माहिती मिळते त्याबाबत मार्कण्डय़ा नावाच्या ऋषींचे नाव ऐकायला मिळते. मार्कण्डय़ा ज्या ठिकाणी तपश्चय्रेला बसले ते उबुदमधील सर्वात जुने मंदिर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणाला चंपावूह म्हणतात. म्हणजेच संगमाची जागा. बालीतील मदर टेम्पल सोडले तर इतर सर्व मंदिरे कायम बंद असतात. बाली दिनदíशकेनुसार २१० दिवसांनी सामूहिक उत्सवासाठी ही मंदिरे उघडली जातात. मात्र, आजही अनेक ठिकाणी कर्मठपणा दिसून येतो. पण ही मंदिर स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहेत. पर्यटकांना बाहेरुन मंदिर पाहता येते. त्यामुळेच असेल पण येथे कमालीची स्वच्छता आहे आणि हे स्थापत्य टिकून आहे. उबुदमध्ये तेथील राजाचा प्राचीन वाडा आजही जतन केला आहे. सायंकाळच्या उन्हात त्याचा दरवाजा सोन्याप्रमाणे झळाळून उठतो.

बालीला जाऊन बीचेस पाहणे, तेथील स्पामध्ये जाणे आणि इतर मौजमजा करणे वगरे तर सारेच करतात. पण आर्ट सेंटर, तेथील प्राचीन घरे, मंदिरे पाहताना स्थानिकांशी नाळदेखील जोडता येते. बालीतल्या भटकंतीत एखादा दिवस यासाठी ठेवायला हरकत नाही.

सुहास जोशी suhas.joshi@expressindia.com